'महिलांशी सलगी करणं हा पुरुषांचा हक्क' वक्तव्याची तिनं मागितली माफी

अभिनेत्री कॅथरिन डेन्यूव्ह यांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं आहे. Image copyright AFP
प्रतिमा मथळा अभिनेत्री कॅथरिन डेन्यू यांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं आहे.

फ्रेंच अभिनेत्री कॅथरिन डेन्यू यांनी लैंगिक हिंसाचारानं पीडित झालेल्या व्यक्तींची माफी मागितली आहे. "पुरुषांना महिलांशी लगट करण्याचा हक्क असल्याचं" मत कॅथरिन यांनी व्यक्त केलं होतं.

लैंगिक हिंसाचाराविरुद्धचा प्रचार हा खूप वेगळ्या पातळीवर गेला आहे, अशा आशयाच्या पत्रावर त्यांनी सही केली होती. माझ्या या वक्तव्याने लैंगिक अत्याचारांनी पीडित झालेल्या लोकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागते असं त्या म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात 100 स्त्रियांनी एक खुलं पत्र लिहून लैंगिक अत्याचाराचा प्रचार पुरुषांची तळी उचलून धरली होती. पुरुष स्त्रियांशी लगट करू शकतात, लगेच त्यांना शिक्षा करायला नको, अशा आशयाचं हे पत्र होतं. कॅथरिन या 100 स्त्रियांपैकी महत्त्वाच्या एक होत्या.

मात्र या पत्रामुळे लैंगिक हिंसाचार हसण्यावारी गेल्याचं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

पत्रानं उठलं वादळ

फ्रेंच महिला लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि कलाकारांनी सही केलेलं हे पत्र 'ला मोन्डे' या वर्तमानपत्रानं मागच्या मंगळवारी प्रसिद्ध केलं होतं. त्यातल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी कॅथरिन यांनी 'लिबरटन'मध्ये पत्र लिहिलं.

'लिबरटन' या दैनिकाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका पत्रात कॅथेरिन म्हणतात, "ला मोन्डे या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या या पत्राने पीडितांना त्रास झाला. मी त्यांचा सन्मान करते आणि त्यांची मनापासून माफी मागते."

त्या पुढे लिहितात की, 'ला मोन्डे' या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या पत्रात छळवणुकीचं किंवा अत्याचारांचं कोणत्याही प्रकारचं समर्थन केलेलं नाही. असं असतं तर मी पत्रावर कधीही केली नसती."

हार्वे वेइनस्टाइन या हॉलिवूड निर्मात्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांनंतर अशा सेलेब्रिटींची निषेध करण्याची एक लाट अमेरिकेत आली होती.

अशा सेलेब्रिटींचा निषेध व्हावा यासाठी अमेरिकेत एक स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली होती. अशी मोहीम म्हणजे एक नव्या प्रकारचा नैतिकतावाद आहे असे आरोप या मोहिमेवर झाले.

या प्रकरणात हार्वे विनस्टीन यांनी जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाचा इन्कार केला होता. पण आपल्या त्या वागणुकीमुळे खूप त्रास झाला असंही त्यांनी सांगितलं.

मागच्या आठवड्यात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

हार्वे विनस्टीन प्रकरणाचा जगभरातून निषेध झाला आणि शोषण करणाऱ्या पुरुष सेलेब्रिटींविरोधात ऑनलाईन मोहिमच सुरू झाली. त्याचा प्रतिवाद करणाऱ्यांचाही गट मग कार्यरत झाला. त्याचाच भाग म्हणून जगभरात नुकत्याच उघड झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर उफाळून आलेल्या 'नैतिकतावादा'बाबत सावध करणारं खुलं पत्र फ्रान्समधील 100 महिलांनी लिहिले होतं. कॅथरिन या पत्र लिहिणाऱ्या 100 महिलांपैकी एक होत.

लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं महत्त्व कमी करणाऱ्या या पत्राचा फ्रान्समधल्या स्त्रीवादी महिलांनी निषेध केला.

खुल्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?

फ्रान्समधल्या 'ला मोन्डे' वृत्तपत्रात मंगळवारी इथल्या कलाकार महिला आणि लेखिकांनी एक पत्र प्रसिद्ध केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेतील बडे चित्रपट निर्माते हार्वी विनस्टीन यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत.

"एखाद्या महिलेला चुकून स्पर्श केल्यानं किंवा चोरून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तर पुरुषांना त्याची लगेच शिक्षा केली जाते. बलात्कार हा गुन्हा आहे. मात्र, एखाद्यानं वारंवार स्त्रीला आकर्षून घेण्यासाठी लगट करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पुरुषांकडून केलेला हल्ला समजू नये," असं पत्रात म्हटलं होतं.

जगात सध्या नव्या प्रकाराचा 'नैतिकतावाद' उफाळून आला असल्याचंही या पत्र लेखिकांनी म्हटलं आहे. एखाद्या पुरुषाकडून होणाऱ्या शक्तीच्या दुरुपयोगाबाबत बोलणं कायद्यानं आवश्यक असलं तरी त्यासाठीच्या निषेधाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे, असं महिलांनी पुढे म्हटलं आहे.

या प्रकारामुळे स्त्रिया दुबळ्या असतात आणि त्या शाश्वत पीडित असतात अशी सामाजिक भावना निर्माण होत आहे, असं या पत्रलेखिकांनी म्हटलं होतं.

महिला म्हणून आम्ही स्वत:ला या प्रकारच्या स्त्रीवादात मोडत नाही. ज्यात शक्तीच्या दुरुपयोगाचा निषेध न करता फक्त पुरुष आणि लैंगिकतेचा तिरस्कार तेवढा केला जातो.

पत्रावर स्वाक्षरी कुणाकुणाची?

कॅथरिन डेन्यू या पत्र लिहिलेल्या महिलांपैकी एक आहेत.

या पत्रावर स्वाक्षरी केलेल्या इतर 99 महिलांमध्ये काही प्रसिद्ध नावांचाही समावेश आहे. यात अभिनेत्री ख्रिश्चिन बोईसन, पत्रकार एलिझाबेथ लेव्ही, 1970च्या पॉर्न स्टार आणि सध्याच्या टॉक-शो होस्ट ब्रिजिट लाहिय, लेखक आणि मासिकाच्या संपादक कॅथरिन मिलेट यांचा समावेश आहे.

मनोरंजन, कला, माध्यम आणि शिक्षण क्षेत्रातील काही नामवंतांचाही यात समावेश होता. पण स्वाक्षरी केलेल्यांत बहुतेक जण असे आहेत ज्यांच्याबद्दल फ्रान्समधल्या सामान्य जनतेला विशेष माहिती नाही.

पत्राला प्रतिसाद कसा मिळाला?

दरम्यान या पत्रामुळे फ्रान्समध्ये वाद निर्माण झाला आहे. मागच्या बुधवारी 30 स्त्रीवाद्यांनी एका निवेदनाद्वारे डेन्यू आणि इतर स्वाक्षरी केलेल्या महिलांवर आरोप केला होता. ज्यात विनस्टीन यांच्यावरील लैंगिक अत्याचारावर या महिला पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं होतं.

सर्व स्त्रिया एकत्र येऊन एकाच आवाजात बोलू शकत नाहीत, याबद्दलची खंत फ्रान्समधल्या एका ट्वीटर युजर्सनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या पत्रासंबंधीची बातमी नसताना तसंच हे पत्र ट्वीटवर ट्रेंड होत नसतानाही त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

जुन्या पिढीतील लोकांमध्ये या पत्राबद्दल खासकरून चर्चा सुरू आहे. 1960 साली मिळालेल्या लैंगिक स्वातंत्र्यावर #Metoo आणि त्यासारख्या मोहीमा म्हणजे धोका आहे, असं त्यांना वाटतं.

याविरुद्धचं मत तरुण कार्यकर्त्यांचं आहे. त्यांना छळवणुकीविरुद्धचा हा लढा म्हणजे महिलांच्या हक्कांसाठीचा नवीन टप्पा आहे, असं वाटतं.

डेन्यू यांची कारकीर्द

महिलांच्या छळवणुकीबद्दल आरोपी ठरवलेल्या पुरुषांविरोधात सोशल मीडियावर चालवलेल्या मोहिमांविरोधात 74 वर्षांच्या डेन्यू मागील वर्षी बोलल्या होत्या.

लैंगिक छळवणूक झालेले जगभरातील महिला आणि पुरुष त्यांचे-त्यांचे अनुभव #MeToo या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

फ्रान्समध्ये ट्वीटर युजर #Balancetonporc ("rat on your dirty old man") या हॅशटॅगचा वापर महिलांना त्यांची छळवणूक करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यास मदत व्हावी यासाठी करत आहेत.

आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या डेन्यू यांना ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. डेन्यू यांनी 1957 साली चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)