विमान धावपट्टीवरून घसरलं, पण समुद्रात पडण्यापासून वाचलं

विमान Image copyright Reuters

तुर्कस्तानच्या ट्रॅबजॉन विमानतळावर एका प्रवासी विमानामध्ये खळबळ उडाली. 168 प्रवासी असलेलं एक विमान धावपट्टीवर सुखरूप उतरलं पण वेगात असतानाच धावपट्टीवरून घसरलं आणि मातीच्या ढिगाऱ्यात अडकलं.

हे विमान आणखी थोडं पुढं गेलं असतं तर ते काळ्या समुद्रात पडलं असतं. या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पेगासस एअरलाइंसचं बोइंग 737-800 या विमानाने अंकारावरुन उड्डाण घेतलं आणि ते ट्रॅबजॉन या शहरातील विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना ही घटना घडली.

Image copyright Getty Images

या विमानाची धावपट्टी समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे. समुद्र सपाटीपासून ही धावपट्टी काही फूट उंचीवर आहे.

विमानाची दिशा बदलल्यामुळं विमान धावपट्टीच्या खाली उतरलं आणि मातीच्या ढिगाऱ्यात अडकलं.

या घटनेनंतर प्रवासी सुरुवातीला घाबरले पण आपण सुरक्षित आहोत हे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Image copyright Getty Images

आम्ही एका बाजूला कललो. विमानाचा एक भाग खालच्या बाजूला होता तर एक बाजू वर होती. या घटनेनंतर सर्वजण खूप घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. असं विमानातील एक प्रवासी फातमा गोर्दू यांनी म्हटलं.

विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती ट्रॅबजॉनचे गव्हर्नर युसेल यावुज यांनी दिली.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गव्हर्नरांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)