इलॉन मस्क आणि इतरांपेक्षाही इतिहासातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती: मनसा मुसा

मनसा मुसा
फोटो कॅप्शन,

मनसा मुसा

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना मागे टाकत नुकतेच इलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

पण जगाच्या पाठीवर असाही एक राजा होऊन गेला तो यांच्यापेक्षा चौपट श्रीमंत होता. या राजाचं नाव आहे सुलतान मनसा मुसा.

माली या देशात 1280 ते 1337 या काळात होऊन गेलेल्या मुस्लीम राजाची ही कथा मनोरंजक अशीच आहे.

मनसा मुसा हा इतिहासातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती होता आणि मनसाच्या संपत्तीचा अंदाज सुद्धा लावता येणार नाही, असं 'मनी' मासिकानं म्हटलं आहे.

आफ्रिकेतल्या समृद्ध माली देशात सोन्याच्या खाणी होत्या आणि त्यांची मालकी मनसाकडेच होती.

फोटो स्रोत, Francois Fortier

फोटो कॅप्शन,

संकोरे मशिदीचं छायाचित्र, डॉक्युमेंटरी फोटोग्राफर फ्रॅंकॉइस एडमंड फोर्टियर यांनी काढलेलं एक छायाचित्र

मुसाचा जन्म 1280मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू 1337मध्ये झाला आहे, असं इतिहास तज्ज्ञ म्हणतात.

पश्चिम आफ्रिकेतल्या बीबीसी पिजिन वेबसाइटनुसार, "मनसाच्या राज्याचं क्षेत्रफळ इतकं मोठं होतं की ते सुरू कुठं होतं आणि कुठं संपतं याचा अंदाज कुणालाच नव्हता."

फोटो कॅप्शन,

कॅटलन अॅटलासमध्ये मुसाच्या राज्याचा समावेश करण्यात आला होता.

मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, बुर्किना फासो, माली, नाइजर, चाड आणि नायजेरिया हे देश मनसाच्या साम्राज्यात होते. मनसा मुसानं अनेक मशिदी बांधल्या होत्या. त्यापैकी काही मशिदी अजूनही अस्तित्वात आहेत.

मनसाची श्रीमंती किती?

मनसा मुसाकडे किती संपत्ती होती आणि आताच्या तुलनेत तिचं मूल्य काय याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. पण इतिहासकारांनी गणितज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांची मदत घेऊन मुसाच्या श्रीमंतीचं आताच्या काळातील मूल्य किती असेल याचा एक अंदाज घेतला आहे.

मुसाच्या संपत्तीचं आताच्या काळातील मूल्य अंदाजे 400 अब्ज डॉलर असावं, असं त्यांनी म्हटलं आहे. याच भारतीय मूल्य अडीच लाख कोटी रुपये इतकं होतं.

टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनी आणि 'स्पेस-एक्स' या कंपनीचेही कर्तेधर्ते असणारे इलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती 185 अब्ज डॉलरांपलीकडे गेली आहे. म्हणजे मुसा इलॉन मस्क यांच्यापेक्षाही श्रीमंत होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मुसाने अनेक मशिदी बांधल्या होत्या.

जर चलनवाढ हा घटक गृहीत धरला नाही तरीसुद्धा मनसा मुसा हा आताच्या श्रीमंतांच्या तुलनेतही श्रीमंत होता यात काहीच शंकाच नाही. अर्थात यावर अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. रिलायंसचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती 30 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजे मनसा मुसा अंबानींपेक्षा कितीतरी पट श्रीमंत होता.

मनसा मुसाचे किस्से

मनसा मुसाच्या भोवती अनेक कहाण्या गुंफलेल्या आहेत. मनसाच्या प्रसिद्ध कहाण्यांपैकी एक कथा आहे त्याच्या मक्का यात्रेची.

1324ला मनसाने मक्काचा प्रवास केला होता. जवळपास 6 हजार किलोमीटरचा प्रवास त्यानं आपल्या नोकरांसोबत केला होता. जवळपास 60 हजार जणांचा तांडा घेऊन तो प्रवासाला गेला होता. यामध्ये 12,000 नोकर तर त्याची वैयक्तिक बडदास्त ठेवण्यासाठी होते असं म्हणतात.

मनसा मुसा ज्या घोड्यावर बसला होता तेव्हा त्याच्या पुढे 500 रक्षक चालत होते. त्यांच्या हातात सोन्याची छडी होती. मुसाचे 500 संदेशवाहकही रेशमी वस्त्रं परिधान करत असत.

या व्यतिरिक्त त्यांच्याकडं 80 उंट होते. प्रत्येकाच्या पाठीवर 136 किलो सोनं लादलेलं असे. मुसा दानशूरही होता. ज्यावेळी तो इजिप्तची तत्कालीन राजधानी काहिरामधून जात होता तेव्हा त्यानं तेथील गरिबांना इतकं दान दिलं की त्या भागातील महागाई वाढली होती.

मनसाच्या या प्रवासाचे किस्से मध्य आशियातच नाही तर युरोपमध्ये देखील पसरले होते. त्यामुळं अनेक लोक मुसाची श्रीमंती पाहण्यासाठी आले होते.

फोटो कॅप्शन,

सोन्याचा मुकूट आणि सोन्याचं नाणं हातात असलेलं मुसाचं रेखाटन

त्याच्या श्रीमंतीची खात्री युरोपियन नागरिकांनाही पटली होती. त्यानंतर त्याची नोंद कॅटलन अॅटलासमध्ये करण्यात आली. कॅटलन अॅटलासमध्ये मुसाच्या राज्याची नोंद स्वतंत्र्यरित्या केली होती.

"जर एखाद्या व्यक्तीकडे इतकी संपत्ती आहे ज्याची मोजणीसुद्धा करता येणं शक्य नाही तर समजावं की ती सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे," असं युनिवर्सिटी ऑफ मिशिगनचे इतिहासाचे प्राध्यापक रुडॉल्फ वेअर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)