सिंगापूरमध्ये तलावांची निगा राखत आहेत राजहंस रोबो

राजहंस रोबो Image copyright News asia

तलावाची निगा राखण्यासाठी सिंगापूरच्या प्रशासनाने एक नामी युक्ती केली आहे. तलावाचं पाणी स्वच्छ आहे की नाही, हे पाहण्याचं काम करण्यासाठी त्यांनी पाच राजहंसांची नियुक्ती केली आहे.

पण हे राजहंस खरेखुरे राजहंस नसून ते चक्क रोबो आहेत. अगदी हुबेहूब राजहंसासारखे दिसणारे हे रोबो तलावात फिरत असतात आणि पाण्याची गुणवत्ता तपासतात.

सिंगापूर येथील वृत्तवाहिनी न्यूज एशियाने हे वृत्त दिलं आहे. सिंगापूरच्या प्रशासनाने तलावाची निगा राखण्यासाठी आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी SWAN (Smart Water Assesment Network) हा प्रकल्प सुरू केला आहे.

तलावाच्या वातावरणात चपखल बसतील यादृष्टीने या रोबोंची रचना करण्यात आली आहे. अतिशय संथगतीने राजहंसाच्या चालीप्रमाणेच हे रोबो पूर्ण तलावात फिरतात.

पाण्याचे नमुने तपासण्याचे यंत्र त्यांना जोडण्यात आले आहे. वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून इथली राष्ट्रीय पाणी संस्था PUB या तलावाची पाहणी करते.

Image copyright News asia

सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक मंदार चित्रे यांच्या टीमने हे रोबो तयार केले आहेत. "राजहंसाच्या आकारांचे रोबो तयार करण्याआधी आम्ही छोट्या पक्ष्यांच्या आकाराचे रोबो तयार केले होते. पण राजहंसाच्या आकाराचे रोबो अगदी योग्य आहेत. जर तुम्ही सभोवतालचा विचार केला तर हे राजहंस रोबो वातावरणाला अगदी साजेसे वाटतात. तुम्हाला वाटेल की राजहंसच तलावात पोहत आहेत," असं ते म्हणाले.

"हे रोबो स्वयंचलित आहेत. तलावातल्या बोटी आणि छोट्या पक्ष्यांपासून ते स्वतःच रक्षण करू शकतात," असं चित्रे सांगतात.

"पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता PUBला पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी वैज्ञानिक पाठवावे लागत नाही. मोठ्या तलावात हे रोबो मानवी मदतीशिवाय फिरू शकतील, अशी त्यांची आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच, हे रोबो रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करता येतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

"या रोबोंची देखभाल करण्याची आवश्यकता असेल तेव्हा रिमोटचा वापर करून त्यांना तलावाच्या काठावर घेऊन येतो," असं संशोधकांनी सांगितलं.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)