'मी सर्वांत महान आहे!' : महम्मद अलींचे बॉक्सिंग रिंगबाहेरचे 15 जोरदार पंच

muhammad ali, boxing Image copyright The Stanley Weston Archive
प्रतिमा मथळा लढतीपूर्वी प्रतिस्पर्ध्याला शाब्दिक आव्हान देण्याची सवय

महम्मद अली बॉक्सिंग रिंगचे दादा होते. तिथे त्यांचे जोरदार पंच प्रतिस्पर्ध्यांना गारद करायचे. पण 50 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या वनलाईनर पंचेसनीही अनेकांना नॉकआऊट केलं. आज त्यांच्या 75व्या जन्मदिनी वाचा त्यांचे गाजलेले 15 जोरदार शाब्दिक पंच.

1. अली यांनी 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये लाईट हेविवेट गटात पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर त्यांचं विधान होतं, "अमेरिकेला महान देश बनवणं हे माझं लक्ष्य आहे. त्यासाठी मी रशियन खेळाडू पोलला हरवलं. अमेरिकेसाठी मी सोनं लुटून आणलं. ग्रीक तर म्हणतात, मी पुराणातल्या कॅशिअसपेक्षा वरचढ आहे."

2. 1960 मध्येच ऑलिम्पिक स्पर्धे दरम्यान अली यांनी तेव्हाचे चॅम्पियन फ्लॉईड पॅटरसन यांना म्हटलं होतं, "अरे फ्लॉईड, मी तुझा खेळ बघितला. पण तुला मी हरवेन. मी तुझ्यापेक्षा महान आहे हे विसरू नकोस."

ऑलिम्पिक नंतर लगेचच अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगकडे मोर्चा वळवला. तिथेही त्यांची आक्रमकता कधी लपली नाही. 1964च्या फेब्रुवारीत त्यांचा मुकाबला हेविवेट चॅम्पियन सोनी लिस्टॉनशी होता.

3. या लढतीपूर्वी अली यांनी लिस्टॉनला ललकारलं, "सोनी लिस्टन सामान्य आहे. तो नीट बोलू शकत नाही. तो लढू शकत नाही. त्याला चांगला धडा शिकवण्याची गरज आहे. त्याला बॉक्सिंग शिकवण्याची गरज आहे. तो माझ्याशी लढणार आहे. तेव्हा त्याने हरायला शिकलं पाहिजे."

लढतीपूर्वी अली म्हणाले, "मी लिस्टॉनला चहुबाजूंनी असे काही पंच मारेन की, तो माझ्या पंचेसनी घेरला जाईल."

लढत जिंकल्यानंतर अली यांचं म्हणणं होतं, "मी जग हादरून टाकलं आहे, मी जग हादरवलं."

4. 1965मध्ये तर फ्लॉईट पॅटरसनशी दोन हात करण्यापूर्वी अली म्हणाले होते, "मी त्याला असं हरवेन की त्याला डोक्यावर हॅट चढवायला शूहॉर्नची गरज पडेल."

5. 1966 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या ब्रायन लंडनला हरवल्यानंतर अली यांनी उपहासात्मक टीका अशी केली होती - "त्यांना श्रेय द्यावंच लागेल. दीड राऊंडपर्यंत त्यांनी खिंड लढवली."

Image copyright Press ASSOCIATION
प्रतिमा मथळा अली यांचे रिंग बाहेरचे पंच

6. 1967मध्ये एर्नी ट्रेल यानी त्यांना महम्मद अली असं संबोधण्याचं टाळलं. यावर अली यांनी मोठ्याने त्यांना विचारलं, "मूर्खा, माझं नाव काय आहे? काय आहे माझं नाव?"

1967 मध्ये एर्नी ट्रेल विरुद्धची लढत त्यांनी गमावली. त्यानंतरचं त्यांचं बोलणं मात्र मार्मिक होतं. "मी कधी हरण्याबद्दल विचारच नाही केला. पण आता तसंच घडलंय. आता जे घडलं ते दुरुस्त करायचं आहे. ज्यांनी आतापर्यंत माझ्यावर विश्वास दाखवला त्या सगळ्यांप्रती माझं एक कर्तव्य आहे. पराभव कधी ना कधी होतोच."

7. 1974मध्ये 'रम्बल इन द जंगल' असा मुकाबला रंगला होता. त्यांचा प्रतिस्पर्धी जॉर्ज फोरमन काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. पण त्याची संभावना अली यांनी शॅडो बॉक्सर म्हणून केली. "मी जॉर्जला शॅडो बॉक्सिंग करताना बघितलं आहे. तसं खेळूनच तो जिंकतो."

त्याचवेळी ते असंही म्हणाले, "माझं हे एक काम आहे. गवत उगतं, चिमणी उडते, लाटा रेतीला वाहून नेतात. तसंच मी लोकांना हरवत असतो."

8. प्रतिस्पर्धी जो फ्रेझरविषयी बोलताना अली म्हणाले होते, "जो फ्रेझर इतका वाईट दिसतो की, तो रडतो तेव्हा अश्रू रस्ता बदलतात. आणि डोक्याच्या मागून ओघळतात. फ्रेझर यांनी आपला चेहरा US ब्युरो ऑफ वाईल्डलाईफला बहाल करावा."

प्रतिमा मथळा अली यांना लोकमान्यता मिळाली आणि राजमान्यताही

9. 'थ्रिला इन मनिला'मध्ये दो फ्रेझर यांना हरवल्यानंतर महम्मद अली यांनी म्हटलं, "मी ज्यांच्याशी लढतो ते सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करतात. पण फ्रेझर असा खेळाडू आहे जो मला सर्वोत्तम कामगिरी करायला लावतो. ईश्वर त्यांना सही सलामत ठेवो."

10. बॉक्सिंगच्या बाहेरही अली यांची वक्तव्य प्रसिद्ध आहेत. त्यातलं एक असं आहे, "बॉक्सिंगमध्ये तमाम गोरे लोक, कृष्णवर्णीय लोकांना एकमेकांना बडवताना पाहतात."

11. आपलं मूळ नाव बदलताना ते म्हणाले होते, "कॅशिअस क्ले हे एका गुलामाचं नाव आहे. मी ते माझ्यासाठी निवडलं नव्हतं. मला ते आवडत नाही. मी महम्मद अली आहे. हे एक स्वतंत्र नाव आहे. माझं नाव उच्चाराल तेव्हा या नावाने मला बोलवा."

Image copyright PA
प्रतिमा मथळा रिंगमधली आक्रमकता अली यांच्या बोलण्यातही होती

12. अमेरिकन नागरिकांसाठी अनिवार्य असलेलं सैनिकी शिक्षण घेण्याचं त्यांनी नाकारलं. त्यावर बोलताना ते म्हणाले होते, "मला सैन्याचा गणवेश घालून 10 हजार मैल दूर व्हिएतनाममध्ये तिथल्या गहूवर्णीय लोकांवर बॉम्ब आणि गोळीबार करायला पाठवण्याचा त्यांचा इरादा आहे. इथं लुईसव्हिलमध्ये कृष्णवर्णीयांना कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते. मानवी अधिकारही त्यांना दिले जात नाहीत."

13. 1974 च्या गाजलेल्या रंबल इन द जंगल लढतीनंतर ते म्हणाले होते, "Float like a butterfly sting like a bee - his hands can't hit what his eyes can't see. फुलपाखरासारखं उडा. मधमाशीसारखा डंख मारा. असा डंख जो डोळ्यांना दिसतही नाही."

14. असे कितीतरी डायलॉग ऐकवता येतील. पण त्यांचा सगळ्यात लोकप्रिय डायलॉग होता, "मी केवळ सर्वश्रेष्ठ नाही, मी डबल सर्वश्रेष्ठ आहे. मी सर्वांत धाडसी आहे, सर्वाधिक सुंदर, सर्वोत्कृष्ट, सगळ्यांत वैज्ञानिक आणि आज रिंगमधला सर्वांधिक कौशल्य असलेला योद्धा आहे. मी सर्वांत महान आहे."

15. तुम्ही म्हणत असाल की असं कसं कोणी स्वत:ची इतकी प्रशंसा करू शकतं? तर त्याचं उत्तरही महम्मद अली यांनी देऊन टाकलं आहे, "माझ्यासारख्या महान व्यक्तीचं नम्र असणं कठीण आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)