पिझ्झा, पास्ता आवडतो? मग तुम्ही हे वाचाच!

पिझ्झा

फोटो स्रोत, The Washington Post/getty

वीकएंड आला की घरी खायचा कंटाळा येतो. पण एकीकडे वाटतं बाहेरचं खाल्लं की वजन वाढणार. वजन कमी करायचा संकल्प तुम्ही अनेक वेळा केला असेल पण त्याबरोबरच डाएट कसं ठेवायचं याचा विचार तुम्ही केला आहे का?

अनेक वर्षं लो-कार्ब डाएट्सची, म्हणजे कमी कर्बोदकं असणाऱ्या आहाराची सद्दी होती. व्हाईट ब्रेड, भात किंवा पास्ता असे पदार्थ खाल्ल्याने तुमची चरबी वाढते किंवा रक्तातल्या साखरेचं प्रमाण बिघडतं, अशा समजातून हे घडत होतं.

कार्बोहायडड्रेट्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले आणि फायबर म्हणजे तंतूमय पदार्थांचं प्रमाण कमी असलेले पदार्थ तुम्ही खात असाल तर ते रक्तात सहज शोषले जातात. त्यामुळे तुमची रक्तातल्या ग्लुकोजची पातळी वाढते.

तुम्ही व्यायाम करून जोपर्यंत हे ग्लुकोज जाळत नाही, तोपर्यंत तुमची स्वादुपिंड (Pancreas) हॉर्मोन इन्सुलिन सोडून रक्तातली साखरेची पातळी खाली आणण्याचा प्रयत्न करत राहतात.

रक्तातली अतिरिक्त साखर चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. प्रमाणाबाहेर चरबी जमली तर गंभीर व्याधी होऊ शकतात. टाईप-2 मधुमेह हे त्याचं एक उदाहरण.

आपण किती कार्ब्स खात आहोत, याबरोबरच ते कधी खाल्लं जातं, याबद्दलही लोक चिंता करतात. संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणात कार्ब्स खाणं हे न्याहारीसाठी कार्ब्स खाण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे, असं मानतात.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन,

एका प्रयोगातून महत्त्वाचे निष्कर्ष निघाले.

सकाळी तुमचं शरीर अधिक कार्यरत असतं, त्यामुळे कर्बोदकांमधून येणारं ग्लुकोज जाळणं त्याला शक्य असतं. रात्री तुमचं शरीर झोपण्याच्या तयारीत असतं, त्यामुळे त्या कर्बोदकांवर प्रक्रिया करायला त्याला वेळ लागतो.

आता ह्या सगळ्या समजुती आहेत. त्या खऱ्या आहेत का?

कर्बोदकं कधी खाणं बरं?

सर्रे विद्यापीठाच्या डॉ. अॅडम कॉलिन्स यांच्या मदतीने आम्ही 'ट्रस्ट मी, आय अॅम अ डॉक्टर' या कार्यक्रमात एक प्रयोग केला.

काही निरोगी लोकांना हाताशी घेऊन सकाळी किंवा संध्याकाळी कार्ब्स खाल्ल्यावर त्यांचं शरीर त्याच्याशी कसं जुळवून घेतं, याचा आम्ही अभ्यास केला. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या शरीराला त्याची सवय होते का, याचाही आम्ही अभ्यास करून पाहिला.

आम्ही सहभागी झालेल्या सगळ्या लोकांना एका विशिष्ट प्रमाणात कार्ब्स खायला सांगितलं... भाज्या, ब्रेड आणि पास्तासारखे पदार्थ.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

खूप कार्ब्स खाताय?

पहिले पाच दिवस त्यांना बहुतांश कार्ब्स न्याहारीसाठी खायला सांगितले, रात्रीसाठी थोडाच वाटा शिल्लक ठेवला.

त्यानंतरचे पाच दिवस त्यांना नेहमीचं अन्न खायला सांगितलं आणि शेवटच्या पाच दिवसांत त्यांना कमी कर्बोदकं असणारी न्याहारी आणि भरपूर कर्बोदकं असणारं रात्रीचं जेवण असा आहार दिला.

डॉ. कॉलिन्स यांच्या टीमने प्रयोगातल्या लोकांच्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवलं. यातून काय निष्कर्ष निघेल असं त्यांना वाटत होतं?

"जर कार्ब्स खाल्ल्यानंतर उरलेला दिवस आपण भरपूर काम करणार असू तर त्यांचं पचन सहज होतं, असंच मी मानत आलो होतो," डॉ. कॉलिन्स यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नाश्त्याला खूप कार्ब्स खाताय?

न्याहारीच्या वेळी अधिकाधिक कार्ब्स खाणं त्यांच्या शरीरासाठी चांगलं ठरेल, असं मला वाटलं होतं. पण नियमितपणे संध्याकाळी कर्बोदकांचा आहार घेतल्यावर काय होतं याची आम्हाला कल्पना नव्हती," डॉ. कॉलिन्स म्हणाले.

"अशा प्रकारचा प्रयोग या आधी केला गेला नव्हता, त्यामुळे मला खूप कुतूहल वाटत आहे," कॉलिन्स म्हणाले.

मग काय निष्कर्ष निघाला?

त्यांना मिळालेलं उत्तर अगदीच स्पष्ट पण अनपेक्षित होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आहाराच्या वेळा नियंत्रित कराव्या का?

मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असणाऱ्या आहाराची साखळी संपल्यानंतर जेव्हा प्रयोगातल्या लोकांची चाचणी केली गेली तेव्हा रक्तातल्या साखरेचं सरासरी प्रमाण 15.9 एकक होतं.

हे अपेक्षितच होतं.

पण कमी प्रमाणात कर्बोदकं असणारी न्याहारी आणि मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असणाऱ्या जेवणाची साखळी झाल्यानंतर त्यांना काय निकाल मिळाले?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पास्ता आणि ब्रेड.

रक्तातल्या साखरेचं सरासरी प्रमाण 10.4 एकक होतं. अर्थातच डॉक्टर कॉलिन्सना अपेक्षित असलेल्या पातळीपेक्षा हे प्रमाण कमी होतं.

नक्की झालं काय?

एक अंदाज असा आहे की तुम्ही केव्हा कार्ब्स खाता यापेक्षाही जेवणाआधी किती काळ तुम्ही कार्ब्सरहित राहता, त्याचा परिणाम जास्त होतो. तुमच्या शेवटच्या कार्ब्ससंपन्न जेवणानंतर बराच वेळ गेला असेल तर कार्ब्सच्या पुढच्या आहारासाठी तुम्ही तयार असाल.

फोटो कॅप्शन,

जीभ चाळवणाऱ्या पदार्थांमध्ये काय काय असतं?

रात्रभर तुम्ही झोपलेले असल्यामुळे आपोआपच मोठा काळ जातो, त्यामुळे तुमचं शरीर सकाळी कार्ब्ससाठी तयार असतं. पण या अभ्यासातून असं दिसून आलं की तुम्ही दिवसभर कार्ब्स खाल्ले नसले तर त्याचाही सारखाच परिणाम होतो.

काही दिवस कमी कार्ब्स असणारा नाश्ता आणि खूप कार्ब्स असणारं रात्रीचं जेवण, असा शिरस्ता ठेवलात तर तुमच्या शरीराला त्याची सवय होते. संध्याकाळी भरपूर कार्ब्स खाल्ली तरी शरीर त्यावर प्रक्रिया करू शकतं.

डॉ. कॉलिन्स आता एक व्यापक प्रयोग करणार आहेत, यातून अधिक स्पष्ट उत्तरं मिळतील.

तुम्ही कार्ब्स कधी खाता याची फार चिंता करू नका, असाच डॉ. कॉलिन्स यांचा तूर्तास सल्ला आहे. नियमितता बाळगा आणि प्रत्येक जेवणात भरमसाठ कार्ब्स खाऊ नका, असं ते म्हणतात.

संध्याकाळी खूप कार्ब्स खाल्लेत तर सकाळी कमी खा, अशा प्रकारे समतोल साधा, असा सल्ला ते देतात.

लक्षात ठेवा, तुम्ही नाश्त्याला जर खूप सारे पोहे खाल्ले असतील तर रात्री भात जरा जपून खा.

हे जरूर वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)