एकटेपणा घालवण्यासाठी आता ब्रिटनमध्ये मिनिस्टर ऑफ लोनलीनेस!

आजी Image copyright Getty Images

इंग्लंडचे दिवंगत खासदार जो कॉक्स यांचा 'मिनिस्टर ऑफ लोनलीनेस' हा प्रकल्प हाती घेण्याची ब्रिटन सरकारने घोषणा केली आहे.

पिढ्यानपिढ्या येणाऱ्या या आव्हानावर मार्ग काढण्याचं काम माझ्या हाती आलं आहे, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, असं ट्रेसी क्रोच म्हणाल्या. 42 वर्षीय ट्रेसी म्हणाल्या की त्या सगळ्या पक्षांना सोबत घेऊन काम करतील.

इंग्लंडमधले नव्वद लाख लोक एकटेपणाने प्रभावित आहेत.

कॉक्स यांनी कमिशन ऑफ लोनलीनेसची स्थापना केली होती. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी घेण्यात आलेल्या सार्वमताच्या आधी त्यांची हत्या झाली होती.

एकटेपणा धोकादायक

2017 मध्ये आलेल्या एका अहवालानुसार एकटेपणा 15 सिगारेट ओढण्याइतका धोकादायक आहे. एका निवेदनात पंतप्रधान थेरेसा मे म्हणाल्या, "जो कॉक्स यांनी संपूर्ण देशातल्या एकटेपणाचा अभ्यास केला होता आणि जे लोक प्रभावित झाले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं."

त्या म्हणाल्या की ट्रेसी क्रोच नव्या भूमिकेत कॉक्स यांनी केलेलं काम पुढे नेतील. त्यासाठी त्या या आयोगासाठी काम करणारे लोक, उद्योगजगतातील लोक आणि स्वंयेसेवी संस्थांची मदत घेतील.

ट्रेसी क्रोच या 2010 सालापासून शॅटम आणि ऐल्सफोर्डच्या खासदार आहेत. बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमाशी बोलताना त्या म्हणाल्या की लाखों पाऊंडचा एक फंड उभा करून एकटेपणा कसा कमी करता येईल यासाठी धोरण ठरवलं जाईल आणि तशा सुविधा उभारल्या जातील.

स्थानिक प्रशासनानं ग्रंथालय आणि डे केअर सेंटर यांची संख्या कमी केल्यानं ही समस्या उद्भवली आहे का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या म्हणाल्या, की ही सगळी आव्हानं आहेत आणि ही समस्या सोडवण्याचा हा कुठला एक ठराविक उपाय नाही.

डिसेंबर 2017 मध्ये NHS इंग्लंडचे चीफ नर्सिंग ऑफिसर प्रा. जेन कनिंग्स यांनी सांगितलं होतं की, गारठा आणि एकटेपणा थंडीच्या काळात आणखी धोकादायक असतो.

त्या म्हणाल्या की फक्त कोणाची तरी साथ असणं अतिशय महत्त्वाचं असतं.

Image copyright UK Parliament
प्रतिमा मथळा ट्रेसी क्राऊच सांगतात की त्यांना हे काम करायला अत्यंत आनंद होतो आहे.

एका अंदाजानुसार, इंग्लंडमध्ये 75 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाचे अर्ध्याअधिक लोक, म्हणजे जवळजवळ 20 लाख लोक एकटे राहतात. त्यांचं कितीतरी दिवस कोणाशीच काहीही बोलणं होत नाही.

प्रशासनानं घोषणा केली आहे की ते राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून एकटेपणा मोजण्याची पद्धत विकसित केली जाईल आणि ही समस्या सोडवण्यासाठी एक निधी उभा केला जाईल.

जो कॉक्स कमिशनच्या अध्यक्ष रचेल रिव्ह्स आणि सीमा केनेडी यांनी अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर लोकांची ही समस्या सोडवण्यासाठी काम केलं आहे. त्यात Age UK आणि Action for children या संस्थांचा समावेश आहे.

मंत्रालयाकडून एकटेपणाविषयी एक राष्ट्रीय धोरण तयार करण्याबाबत जो पुढाकार घेण्यात आला आहे, त्याचं त्यांनी एका संयुक्त निवेदनात स्वागत केलं आहे.

उतारवयात एकटे असणाऱ्यांना अशी मदत करावी

  • संवाद सुरू करा. थांबून बोला, त्यांना टाळू नका
  • त्यांना मदत करा, बाजारत जाणं, एखादं पत्र पोस्ट करणं, औषधं आणणं, त्यांच्या कुत्र्याला फिरवणं
  • आपला वेळ त्यांना द्या. ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करणाऱ्या तसंच त्यांना भेटी देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करा
  • लाईट बदलणं, फोटो लावणं, कचरा टाकणं अशा कामांमध्ये मदत करा
  • घरी बनवलेलं जेवण त्यांच्यासाठी घेऊन जा

एकट्या असलेल्या तरुणवयातील लोकांना अशी मदत करा

  • घराच्या बाहेर पडा. समोरासमोर बोला किंवा फोनवर बोला
  • थेट किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही स्वरुपाचा संवाद साधण्यासाठी लोकांना उद्युक्त करा
  • त्यांच्याबरोबर कुठेतरी जा किंवा गटागटात एखादा उपक्रम करा.
  • मानसिक विकाराने आजारी असलेल्या लोकांना त्यांच्या स्थानिक भागात उपचार घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या किंवा Elefriends सारख्या ऑनलाईन फोरमची मदत घ्या
  • आधी त्यांचं म्हणणं नीट ऐकून घ्या, पण कोणतंही मत बनवून घेऊ नका. एखादा व्यक्ती कामात व्यस्त किंवा आनंदी दिसत असला तरी ती एकटी असू शकतो

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)