बॉलिवुड, खानपान आणि क्रिकेट : इस्राईलमधल्या मराठी ज्यूंना अजूनही भारताची ओढ

बेने इस्राईली - इस्राईलमधले मराठी भाषिक ज्यू
प्रतिमा मथळा बेने इस्राईली - इस्राईलमधले मराठी भाषिक ज्यू

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत इस्राईल संबंधांचं एक नवं पर्व सुरू झालं आहे. बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी इस्राईलच्या बीरशेवा या शहराला भेट दिली. या शहरात भारतीय वंशाचे अनेक ज्यू लोक इस्राईलच्या स्थापनेनंतर स्थायिक झाले आहेत.

61 वर्षांचे नाओर गुडेकर उत्तम क्रिकेट खेळतात. ते इस्राईलच्या पहिल्या क्रिकेट क्लबचे संचालक आहेत. हा क्लब त्यांच्या सारख्याच स्थलांतरित भारतीयांनी बीरशेवामध्ये सुरू केला होता.

जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा गुडेकर यांच्या निगराणीत एक क्लब टीम सराव करत होती. या वाळवंटी शहकराच्या ज्या भागात हा क्लब आहे, तो शहराचा थोडा चांगला भाग समजला जातो.

वेगवेगळ्या वयोगटातली 20 लोकं तिथे जमली होती. काही लोक तिथे क्रिकेट खेळायला आले होते तर काही लोक तिथे फक्त भेटीगाठींसाठी. ते सगळे लोक बेने इस्रायली, म्हणजे भारतीय वंशाचे इस्रायली होते.

1948 साली इस्राईलची स्थापना झाल्यावर अनेक बेने इस्रायली बीरशेवामध्ये येऊन स्थायिक झाले. तिथल्या एका देऊ केलेल्या भूमीत त्यांच्यासारखे अनेक आलेत, काही लोकांचा तर इथेच जन्म झाला.

'परत मातृभूमीला'

बेने इस्राईली समुदायातले अनेक लोक म्हणजे जवळजवळ 100,000 लोक महाराष्ट्रातून होते. जे लोक 1950च्या किंवा 1960च्या दशकात स्थलांतरित झाले, त्यांना इस्राईलला परतण्याआधीच हिब्रू आणि ज्यू भाषेतल्या प्रार्थना शिकवल्या गेल्या.

पण अनेक लोकांसाठी हा बदल तितका सोपा नव्हता.

गुडेकर सांगतात की कृष्णवर्णीय असल्याने आणि हिब्रू भाषा येत नसल्याने सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर भेदभावही झाला.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा भारतातील अनेक लोक अजुनही इस्राईलमध्ये आहेत.

अस्बेस्टॉस आणि टिनापासून तयार केलेल्या घरात त्यांना आसरा दिला होता. ते सांगतात की त्यांच्या वडिलांना भारतातलं सगळंकाही सोडून इस्राईलमध्ये आल्याचा अनेकदा पश्चात्ताप व्हायचा.

पण ते सांगतात, की मुंबईबरोबरचे सगळे पाश आम्ही तोडले होते. त्यामुळे मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता.

डॉ. शल्वा विल या बेने इस्रायली लोकांवर प्रबंध लिहीत आहेत. त्यांनी या समुदायाबरोबर बराच वेळ घालवला आहे. त्या सांगतात की स्वतंत्र भारतात त्यांना कशी वागणूक मिळेल, याबाबत ते साशंक होते. म्हणून त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला.

"मला वाटतं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर तिथल्या ज्यूंना आपल्या भविष्याची चिंता होती. बेने इस्रायलींना ब्रिटिशांकडून अनेक सवलती मिळायच्या, हे विसरता कामा नये. मला वाटतं, त्यांना फार काळजी वाटत होती. आणि तसंही त्यांना असंच वाटत होतं की इस्राईल हीच त्यांची मातृभूमी आहे."

पण इस्रायलमध्ये आल्यावर त्यांना भेदभाव सहन करावा लागला, या गोष्टीला डॉ. वेल यांनी दुजोरा दिला.

रंग काळा म्हणून काळा ब्रेड

"मला नाही वाटत, 1950च्या दशकात इस्राईलच्या नागरिकांनी भारतीयांना कधी बघितलं होतं. त्या काळात भारतीय सगळ्यांत काळे दिसायचे. ही गोष्ट आज थोडी आश्चर्यकारक वाटते," असं शेल्वा वेल यांनी पुढे सांगितलं.

वेल सांगतात की त्या काळी काही काळ्या लोकांना तर असेही अनुभव आले की दुकानदाराने त्यांना त्यांचं वर्ण पाहून काळ्या ब्रेड दिल्याचा.

"सध्याच्या काळात काळ्या ब्रेडला पांढऱ्या ब्रेडपेक्षा जास्त मागणी आहे, हासुद्धा एक विरोधाभास आहे," त्या पुढे सांगतात.

Image copyright AFP

पण 1962 साली या स्थलांतरितांना मोठा झटका बसला. इस्राईलच्या मुख्य धर्मगुरूंनी बेने इस्रायली लोकांना इतर ज्यू समुदायातल्या लोकांशी लग्न करण्यापासून मनाई केली.

या निर्णयाविरुद्ध बेने इस्रायली समुदायानं आंदोलन छेडल्याचं डॉ. विल यांनी सांगितलं. "ते धर्मगुरूंच्या कार्यालयाच्या बाहेर संप करायचे. त्यांचं म्हणणं होतं की 2000 पेक्षा अधिक वर्षांपासून ते ज्यू धर्मीयच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणं लग्न करू देण्यात यावं."

या मागण्या मान्य होण्यासाठी दोन वर्षं लागली पण त्यांना अखेर यश मिळालं.

पुढच्या पिढीला फारशी आस्था नाही

पण आता सगळं सुरळीत झालं आहे. उदाहरणादाखल, गुडेकर यांच्या पत्नी एलिना रशियन आहेत. आणि ते सांगतात की त्यांच्यामुळे आता तीसुद्धा क्रिकेटची चाहती आहे. त्यांच्या तीनही मुलींनाही क्रिकेटची आवड आहे. एक मुलगी तर स्वत:ला फिरकी गोलंदाज असल्याचं सांगते.

इतकंच नाही तर अनेक जण शासकीय सेवेत किंवा खाजगी नोकरीत उत्तम पदावर कार्यरत आहेत. ते स्थानिक निवडणुकीत भाग घेतात आणि इस्रायली परराष्ट्र धोरणाचे ते समर्थक आहेत.

बेने इस्रायली त्यांच्या मुलांना हिंदी, मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषा शिकवत नाहीत. पण गुडेकरांच्या पिढीतल्या अनेक लोकांना भारताबरोबरची नाळ जोडून ठेवण्याबाबत उत्सुकता आहे.

भारतीय क्रिकेटची जर्सी घालून ते लोक खेळतात. त्यांच्यातले अनेक लोक बॉलिवूडचे चाहते आहेत. तसंच त्यांनी देशभरात भारतीय खाद्यपदार्थ असलेली हॉटेल्सही सुरू केली आहेत.

"आम्ही इस्रायली आणि भारतीय आहोत. भारत ही आमची मातृभूमी आणि इस्राईल आमची पितृभूमी आहे," असं ते गर्वानं सांगतात.

पण आताच्या तरुण पिढीच्या याच भावना असतील अशी खात्री त्यांना नाही.

"बेने इस्रायली हे आता अधिक इस्रायली आहेत. जर तुम्ही तरुणांकडे बघितलं तर ते इस्रायली वाटतात. भारताशी त्यांना फारसं घेणंदेणं नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या