हिंदू धर्म अवयव दानाविषयी काय सांगतो?

आपण अवयवदान करणार का? Image copyright Roberthyrons
प्रतिमा मथळा आपण अवयवदान करणार का?

13 ऑगस्ट, म्हणजे जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने जानेवारीत प्रकाशित झालेला हा लेख पुन्हा प्रसिद्ध करण्यात येत आहे.


UK मधल्या सर्वांत मोठं मंदिराने हिंदूंना अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे. हिंदूंना अवयवदानापासून रोखणारा कोणताही उल्लेख ग्रंथांमध्ये नाही, असं या मंदिराचं म्हणणं आहे. या मोहिमेमागचं कारण म्हणजे, सध्या युकेमधल्या आशियाई लोकांमध्ये अवयवांची मोठी कमतरता भासत आहे.

लंडनमधल्या BAPS श्री स्वामीनारायण मंदिरात 50पेक्षा जास्त लोक जमले होते. ही बैठक कोणत्याही धार्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी नव्हती, तर ती अवयवदानाबद्दल बोलण्यासाठी.

हिंदूंमध्ये अवयदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या मंदिराचे प्रमुख पुजारी साधू योगविवेकदास म्हणाले, "एखाद्याला आयुष्याची भेट देणं किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करणं, याला हिंदू धर्मानं दान म्हटलं आहे."

पण आशियाई लोकांची अवयवदानाप्रतीची मानसिकता लक्षात घेऊन या मंदिरानं या विषयात लक्ष घालण्याची भूमिका घेतली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लंडनमधल स्वामीनारायण मंदिर

लंडनमधल्या फेल्टम परिसरात राहणारे सौजन्य सांगतात, "आम्ही आशियातल्या लोक ग्रंथावर, परंपरांवर खूप विश्वास ठेवतो. त्यांत स्वर्ग-नरक सारख्या संकल्पना आहेत, पण अवयवदानाबद्दल काही दिसत नाही. म्हणून अनेक लोक अवयवदान करत नाहीत."

ही मानसिकता 2017च्या आकडेवारीतूनही पुढं येते. युकेमध्ये जवळपास एक हजार आशियाई लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी फक्त 79 आशियाई लोकांनी किडनीदान केलं, त्यातही 29 जणांनी मृत्यूनंतर अवयवदान केलं.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या आकडेवारीनुसार 2015मध्ये अवयव न मिळाल्याने 466 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीमधून 81 रुग्णांना काढून टाकण्यात आली आहे. त्यापैकी अनेकांचा नंतर मृत्यू झाला.

आणि किडनीसारख्या अवयवांची मागणी तर वांशिक अल्पसंख्याकांमध्ये आणखीनच जास्त दिसून येते.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या 2016-2017च्या आकडेवारीनुसार कृष्णवर्णीय, आशियाई आणि इतर वांशिक अल्पसंख्याक इंग्लंडच्या लोकसंख्येचा 11 टक्के भाग आहेत. तर किडनी प्रत्यारोपणाच्या रुग्णांच्या यादीत 34 टक्के वांशिक गटांमधून आहेत.

पण अवयवदाता आणि अवयवाची आवश्यकता असणारे एकाच वंशाचे असणं आवश्यकता आहे का?

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, "अवयव प्रत्यारोपण यशस्वी व्हायचं असेल तर रक्त आणि ऊती जुळाव्या लागतात. एकाच वांशिक गटांच्या लोकांमध्ये ही शक्यता जास्त असते."

Image copyright AlexRaths

या मोहिमेविषयी जनजागृती करणारे किरीट मोदी यांनी एक घटना सांगितली. काही वर्षांपूर्वी ख्रिसमसदरम्यान मोदी यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. ते सांगतात, "आमच्याकडे दोनच पर्याय होते - एक तर डायलिसिस करणं, किंवा किडनीचं प्रत्यारोपण."

मोदी यांच्या कुटुंबीयांनी एकत्र बसून चर्चा केली. त्यांचा भाऊ आणि पत्नी याची चाचणी पॉजिटिव्ह आली होती, पण भाऊ पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो किडनी प्रत्यार्पण करू शकत नव्हता. मग त्यांच्या पत्नीनेच त्यांना किडनी देण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फारच कठीण होता.

प्रतिमा मथळा मीना यांनी पती किर्ती यांच्यासाठी किडनी दान केली आहे.

मोदी पुढे सांगतात, "अशा प्रकारे किडनी दान करायचं म्हणजे रुग्ण आणि दाता या दोघांवर एकदा शस्त्रक्रिया करावी लागते. कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं तर यात जोखीम असतंच. प्रत्यार्पण यशस्वीच होईल, याचीही खात्री नसते. मृत व्यक्तीची किडनी लावण्यापेक्षा एखाद्या जिवंत आणि तंदुरुस्त व्यक्तीची किडनीचं प्रत्यारोपण करणं चांगलं असतं."

दोघांना शस्त्रक्रियेनंतर बरं होण्यास काही वेळ लागलास. सुदैवाने आता दोघंही आनंदी आणि फिट आहेत.

किरीट मोदी यांच्या पत्नी मीना म्हणाल्या, "किरीटसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे चांगलं होतं, ते आम्ही केलं. माझ्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांपैकी हे एक आहे. याबद्दल मला कधीही पश्चात्ताप होणार नाही."

Image copyright NosUA

त्या म्हणतात, "किरीटला बरं करण्यासाठी जे उत्तम होतं ते आम्ही केलं. अनेक लोक अवयव प्रत्यारोपणाच्या यादीवर 3 ते 4 वर्षं वाट पाहतात. पण तोपर्यंत तुमचं आरोग्य अधिकच खराब झालेलं असतं."

जिवंत असताना तसंच मृत्यूनंतर अवयवदान कसं करावं, या विषयावर मीना आणि किर्ती आता जनजागृती करत आहेत.

मीना म्हणाल्या, "एखाद्या व्यक्तीला जीवनाची भेट देणं ही सर्वांत आनंदाची बाब असते. मला वाटतं मी माझ्या नवऱ्याला दिलेली ते सर्वात चांगलं ख्रिस्मसची प्रेझेंट होतं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)