विन्स्टन चर्चिल महात्मा गांधींचा द्वेष करायचे कारण...

चर्चिल, इंग्लंड, भारत, महात्मा गांधी, बंगाल Image copyright PA
प्रतिमा मथळा इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल.

1940 ते 1945 आणि 1951 ते 1955 दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान राहिलेले विन्स्टन चर्चिल यांचा 24 जानेवारी हा स्मृतिदिन. जगाच्या इतिहासातलं हे मोठं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होतं. जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीतील काही नाट्यमय घटना.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान कठीण कालखंडात इंग्लंडला नाझींच्या जर्मनीवर विजय मिळवून देण्यात चर्चिल यांच्या नेतृत्त्वाची भूमिका निर्णायक ठरली होती.

2002 मध्ये इंग्लंडमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वश्रेष्ठ ब्रिटिश म्हणून चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं.

मात्र 70 वर्षांच्या कारकीर्दीत चर्चिल यांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त घडल्या.

चर्चिल यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं. त्यांच्या आयुष्याला विरोधाभासी किनार होती आणि त्याचवेळी समकालीनांच्या तुलनेत त्यांचं व्यक्तिमत्व भव्य भासतं असं चर्चिल अर्काइव्ह सेंटरचे संचालक अॅलन पॅकवूड यांनी सांगितलं.

बंगाल दुष्काळ

ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतात 1943 साली बंगालच्या उत्तरपूर्व प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. जपाननं म्यानमारचं अधिग्रहण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दुष्काळ पडला होता.

या जीवघेण्या दुष्काळात तीन दशलक्ष नागरिकांनी प्राण गमावले. या दुष्काळाच्या वेळी चर्चिल यांनी अवलंबलेलं धोरण टीकेचं लक्ष्य ठरलं होतं.

भारताची गव्हाची मागणी चर्चिल यांनी फेटाळून लावली. मात्र त्याचवेळी तांदुळाच्या निर्यातीवर आम्ही कसा भर दिला हे चर्चिल ठसवत राहिले असं 'चर्चिल सिक्रेट वॉर' पुस्तकाच्या लेखिका मधुश्री मुखर्जी यांनी सांगितलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा बंगाल दुष्काळाचं प्रातिनिधिक छायाचित्र.

"सुटका करण्यात आलेल्या युरोपियन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर गव्हाचा साठा करण्यात यावा अशी मागणी युद्धविषयक कॅबिनेटनं केली होती. भारतातले नागरिक दुष्काळानं होरपळून निघत असताना 1,70,000 किलो ऑस्ट्रेलियन गहू भारताला न देता युरोपीयन समुदायाच्या भविष्यासाठी साठवणूक म्हणून जमा करण्यात आला," 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी मुखर्जी यांनी ही माहिती दिली होती.

चर्चिल यांनी या दुष्काळाचं खापर भारतीयांवरच फोडलं होतं. भारताची लोकसंख्या सश्यांप्रमाणे भसाभस वाढते आहे, अशी खोचक टिप्पणीही चर्चिल यांनी केली होती.

"चर्चिल यांच्या कारकीर्दीला लागलेल्या मोठ्या कलंकांपैकी हा एक कलंक आहे. दुष्काळाच्या प्रश्नाचं गांभीर्य चर्चिल यांना पटवून देणं कठीण होतं. युरोपात जर्मनीशी सुरू असलेल्या लढाईदरम्यान भारतातल्या दुष्काळाचा प्रश्न तीव्र झाला होता. चर्चिल यांना हा प्रश्न अडथळा वाटला. म्हणूनच या प्रश्नाकडे लक्ष देऊन युद्धविषयक गोष्टींना बाजूला सारावं असं त्यांना वाटलं नाही," असं 'चर्चिल एम्पायर'चे लेखक टोये यांनी सांगितलं.

"'चर्चिल द्रष्टे आहेत आणि त्यांना भविष्याची जाण आहे असं म्हटलं जातं असे," असं 'चर्चिल: द एन्ड ऑफ ग्लोरी' पुस्तकाचे लेखक जॉन चार्मले यांनी सांगितलं.

"मात्र बंगाल दुष्काळाच्या वेळी चर्चिल यांचं धोरण फसलं. दुष्काळाचं संकट भयंकर होतं आणि त्याकडे जागतिक महायुद्धाच्या संदर्भात पाहणं आवश्यक होते," असं पॅकवूड यांनी स्पष्ट केलं.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धात चर्चिल यांचा सहभाग होता. अशावेळी प्राधान्यक्रम आणि मागणी यांच्यात समतोल राखणं अवघड असतं. परिस्थिती सातत्यानं बदलून गुंतागुंतीची होत होती. आणि प्रत्येकवेळी चर्चिल यांची भूमिका अचूकच असेल असं नाही.

'गांधी अँड चर्चिल' या पुस्तकाचे लेखक हरमन यांच्या मते चर्चिल यांच्याविना दुष्काळाचं संकट अधिक गहिरं झालं असतं. दुष्काळाची व्याप्ती लक्षात आल्यानंतर चर्चिल आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटनं युद्ध सुरू असताना देखील दुष्काळाची झळ पोहोचणाऱ्या प्रत्येकाला मदत मिळेल याची काळजी घेतली.

"प्राधान्य कशाला द्याचं हे ठरवण्यात गोंधळ झाल्यानं ही परिस्थिती ओढवली. इंग्लंडच्या यंत्रणेवर ताण पडला हे ओघानं आलंच कारण दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून उपाययोजना अमलात आणल्या नव्हत्या," असं टोये यांनी सांगितलं.

गांधींबद्दलची वक्तव्यं

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल चर्चिल यांची काही ठोस मतं होती आणि वेळोवेळी त्यांनी ती व्यक्तही केली होती.

"गांधींसारखा मिडल टेंपल (इंग्लंडमधील वकिलांशी संबंधित संस्था) मधून वकिली केलेला देशद्रोही माणूस आता अर्धनग्न अवस्थेत व्हाईस रिगल पॅलेस समोर अवतरतो. हे उबग आणणारं तर आहेच पण धोकादायकही," असे उद्गार चर्चिल यांनी 1931 मध्ये गांधींबद्दल काढले होते.

"केवळ उपोषणाची धमकी देतात म्हणून गांधींजींची सुटका व्हायला नको, असं चर्चिल यांनी कॅबिनेटला सांगितलं होतं. साम्राज्याला धोका असणारा हा वाईट मनुष्य उपोषणानेच गेला तर आपली सुटकाच होईल," असं चर्चिल म्हणाले होते.

Image copyright Hulton Archive/Getty Images
प्रतिमा मथळा महात्मा गांधींबद्दल चर्चिल यांचे विचार अनुकूल नव्हते.

स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गानं लढा देण्याच्या गांधीच्या भूमिकेवर आता चर्चाही होत नाही. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये चर्चिल आदरणीय आहेत तसंच गांधी भारतीयांसाठी पूजनीय आहेत. मात्र अनेक वर्ष चर्चिलप्रणित ब्रिटिश साम्राज्याला गांधी प्रमुख धोका होते.

भारतासंदर्भात चर्चिल यांची भूमिका कडव्या उजव्या विचारसरणीची होती असं चार्मले यांनी सांगितलं. कॉन्झर्व्हेटिव्ह, लिबरल्स आणि लेबर या पक्षांचा भारताविषयीची दृष्टिकोन बाजूला ठेऊया. पण 1929 ते 1939 या दरम्यान चर्चिल यांचे भारताविषयीचे विचार घृणास्पद होते.

चर्चिल यांचा गांधींना कडवा विरोध होता, असं टोये यांनी सांगितलं. भारत स्वतंत्र राष्ट्र होऊ नये, त्याचं स्वतंत्र शासन असू नये असं चर्चिल यांना वाटत होतं. यासाठी त्यांनी स्वपक्षीयांचा विरोधही पत्करला. हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांचा विरोध होता.

चर्चिल यांचा पवित्रा एखाद्या हुकूमशहाला शोभण्यासारखा होता असं चार्मले सांगतात. भारतीयांना प्रशासनाचं स्वातंत्र्य देणं म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा ऱ्हास आणि नागरीकरणाचा शेवट असेल अशी प्रचंड भीती चर्चिल व्यक्त करत असत.

1930च्या दशकात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातल्या अँथनी इडनसारख्या युवा नेत्यांचा चर्चिल यांच्यावर विश्वास नव्हता. कारण चर्चिल यांची उजव्या विचारसरणीच्या लोकांशी जवळीक होती.

1930च्या दशकात हिटलरसंदर्भातल्या चर्चिल यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे का लक्ष दिलं गेलं नाही? असा प्रश्न लोक उपस्थित करतात असं चार्मले सांगतात. 1930च्या पूर्वार्धात गांधींनी मांडलेले विचार आणि थोड्या कालावधीनंतर चर्चिल यांनी मांडलेले विचार यात साम्य होतं असं त्याचं थोडक्यात उत्तर आहे.

(बीबीसी न्यूज मॅगझिनच्या टॉम हेडेन यांच्या लेखाचा हा संपादित अंश)

हे वाचलंत का?

हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: सामान्य माणसाच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)