...आणि या कुटुंबाने तीन महिने विमानतळावरच काढले!

बँकॉक विमानतळ Image copyright EPA

आपल्या विमानाला उशीर झाला आणि विमानतळावरच काही काळ झोपावं लागलं तर काय हाल होतात ना? आपण तक्रारींचा पाढा वाचतो. झिम्बाब्वेच्या एका कुटुंबावर ही पाळी आली, आणि काही एक दोन दिवसांसाठी नाही तर तब्बल तीन महिन्यांसाठी!

बुधवारी त्या कुटुंबाने बँकॉक विमानतळ सोडलं खरं, पण अजूनही त्याना मायदेशी झिम्बाब्वेला जाणं दूरच आहे.

मे 2017 मध्ये हे आठ जणांचं कुटुंब बँकॉकला आलं. त्यात 11 वर्षांखालील चार लहान मुलांचाही समावेश आहे.

ऑक्टोबरमध्ये त्यांना स्पेनला जायचं होतं पण योग्य व्हिसा नव्हता. तेव्हापासूनच गोंधळाला सुरुवात झाली.

या कुटुंबाला पुन्हा थायलंडमध्ये प्रवेश नव्हता कारण त्यांच्याकडे असलेल्या टुरिस्ट व्हिसाचा कालावधी संपलेला होता. व्हिसाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ राहिल्यानं त्यांना दंडही झाला. पण झिम्बाब्वेमध्ये छळ होईल या भीतीपोटी तिथंही जाऊ शकत नव्हते, असं त्या कुटुंबाचं म्हणणं होतं.

Image copyright Getty Images

मग हे सगळं लक्षात आलं ते डिसेंबरमध्ये जेव्हा सुवर्णभूमी विमानतळाच्या एका कर्मचाऱ्यानं त्यांतील एका लहान मुलासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. "झिम्बाब्वेमधल्या अस्थिर परिस्थितीमुळे" ही मंडळी विमानतळावरच राहात असल्याचं त्यानं त्या फोटोसोबत म्हटलं होतं.

विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्यांनी युरोपियन इमिग्रेशन कायद्याच्या अडथळ्याला वळसा घालत त्यांना कीव्हमार्गे दुबईला पाठवण्याची व्यवस्था केली, युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या मदतीने.

"पण प्रवासाच्या अंतिम टप्प्यात त्या कुटुंबानं त्यांची तिकीटं रद्द केली आणि त्यांना दुबईहून बँकॉकला परत पाठवण्यात आलं," असं युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइंसच्या प्रवकत्यांनं सांगितलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर झिम्बाब्वेचे दीर्घकालीन राज्यकर्ते रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर आपल्यावर होणाऱ्या संभावित कारवाईच्या भितीनं या कुटुंबानं संयुक्त राष्ट्राकडं (UN) मदत मागितली होती.

Image copyright Getty Images

त्यावेळी त्या कुटुंबाच्या मदतीसाठी आपण पर्याय शोधत असल्याचं UNने सांगितलं होतं. थायलंडमध्ये निर्वासित आणि आश्रितांना कायद्यात मान्यता नाही.

त्यामुळं कुटुंबाला विमानतळावरच राहण्यास भाग पडलं. त्या ठिकाणी राहण्यासाठी एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली.

फिलिपीन्सला रवानागी

अखेर सोमवारी दुपारी कुटुंबाला बँकॉकहून रवाना करून फिलिपीन्सला पाठवण्यात आलं आहे, असं थाई इमिग्रेशन ब्युरोच्या प्रवकत्यानं बीबीसी थाईला सांगितलं.

फिलिपीन्समध्ये संयुक्त राष्ट्रानं निर्वासितांसाठी छावणी (UNHCR Refugee Agency) उभारण्यात आली आहे. पण कुटुंबाच्या कायमस्वरूपी मुक्कामाविषयी कोणतीच माहिती मिळाली नाही.

UNCHR Refugee Agencyच्या महिला प्रवक्त्यानं कोकोनट्स वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही विशिष्ट केसेबद्दल आम्ही वेगळी माहिती देऊ शकत नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)