सिंगापूरातल्या बापाची व्यथा : 'आपलं बाळही दत्तक घेता येत नाही आणि त्याचा बापही होता येत नाही'

पालकत्व Image copyright PA

चकचकणारं सिंगापूर हे इतर मोठ्या शहरांसारखचं दिसत असलं तरी इथं एका बापाला आपलं बाळ दत्तक घेण्याची परवानगी मिळत नाही. यातून हेच दिसतं की पारंपरिक कौटुंबिक संकल्पना या आधुनिक मूल्यांच्या आड येत आहेत.

त्याच्या पालकांनी त्याचा पहिला आवाज एकला तो जोरात रडतानाचा. सहा तासांच्या प्रसूती कळांनंतर अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये नोएलचा जन्म झाला. दोन आशावादी पालकांच्यावतीनं नोएलला जन्म देणारी ती एक सरोगेट मदर होती.

नोएलची नाळ कापताना ते पालक रडले. बाटलीतून दूध पाजताना ते त्याच्यात भावनिक होऊन गुंतले. नंतर त्याला सिंगापूरला घेऊन जाताना त्या पालकांना अभिमान वाटत होता.

सिंगापूरमध्ये जसं एखादं सामान्य बाळ वाढतं, तसंच नोएलचं आयुष्य होतं. फक्त एकच अडचण होती, सिंगापूरमधील कायद्यानुसार तो एक अनौरस मुलगा होता. ज्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो.

जेम्स आणि शॉन (मुलाची ओळख लपवण्यासाठी नावं बदलली आहेत.) एक दशकापासून एकमेकांचे जोडीदार आहेत. आपल्याला एक मुल हवं, अशी दोघांचीही इच्छा होती.

त्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला. पण लोकांच्या वैयक्तिक अनुभवांवरून त्यांना सांगण्यात आलं की, समलैंगिक पुरूषांसाठी मूल दत्तक घेण्याची घटना तशी दुर्लभ होती.

एकट्या पुरूषाला मूल दत्तक घेण्याची परवानगी असते, पण ते वैयक्तिक अर्ज करू इच्छित नव्हते तसेच स्वतःचं नातंही लपवायची त्यांची इच्छा नव्हती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जेम्स आणि शॉन यांना स्वतःचं मूल असावं असं नेहमी वाटत आलं.

त्यामुळे त्यांना सरोगसीची संकल्पना सुचली. सिंगापूरमध्ये सरोगसी बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. याआधीही अनेक जोडप्यांनी तसं केलं आहे.

एजन्सीच्या माध्यमातून स्त्री बीज दान करणाऱ्या स्त्रीची निवड करण्यात आली. जेम्सच्या शुक्राणूंच्या सह्याने IVF तंत्रज्ञानाद्वारे बीजनिर्मिती करण्यात आली.

सरोगसी प्रक्रियेसाठी त्यांनी तब्बल दोन लाख डॉलर मोजले. नऊ महिन्यानंतर बाळाच्या जन्माप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी ते अमेरीकेला परतले.

"अखेर आमचं स्वतःच मूल आहे हे आमच्यासाठी अविश्वसनीय होतं," जेम्स यांनी बीबीसीला सांगितलं. "प्रेम आणि आनंदाचा वर्षाव होत होता आणि अचानक आमच्या आयुष्याला मोठा अर्थ प्रप्त झाल्याची जाणीव आम्हाला झाली."

परदेशात सरोगसीवर बंदी असलेले विद्यमान कायदे त्यावेळेस माहित नव्हते असे ते म्हणाले.

तो कुठे जाईल?

सिंगापूरला परतल्यानंतर त्यांना वास्तव समजलं.

नोएलच्या आई-वडिलांनी विवाह केलेला नसल्यानं कायद्याच्यादृष्टीनं तो अनौरस मुलगा होता. त्यात पुन्हा त्याची आई परदेशी नागरिक असल्यानं तो सिंगापूरचा नागरिकही होऊ शकत नव्हता.

Image copyright Getty Images

नोएलला सिंगापूरचं नागरिकत्व नाकारलं गेलं. याचा अर्थ त्याला कुठलाही सरकारी लाभ किंवा सहाय्य मिळणार नव्हतं. त्यामुळे त्याला वडिलांपासून काहीही न मिळण्याचा धोका होता.

कायद्यानुसार जेम्स हे नोएलचे वडिल आहेत. त्यामुळं चार वर्षाच्या नोएलला वडिलांसोबत राहण्याची परवानगी आहे.

नोएलला आता एक लाँग टर्म व्हिजीट पास (LTVP) मंजूर करण्यात आला आहे. जो सहा महिन्यासांठी वैध असतो आणि वेळोवेळी अपडेट करावा लागतो.

LTVP केव्हाही रद्द होऊ शकतं आणि तो कायमस्वरूपीचा उपाय ठरत नाही.

"(ते जर रद्द झालं तर) त्याला सिंगापूर सोडावं लागेल. कुठं जाईल तो?" असं जेम्स म्हणाले.

"एकमेव सिंगापूर त्याला माहित आहे. त्याच्या आजी-आजोबांशी, काकू आणि चुलत भावांशी त्याचं एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. हे सगळं आम्हाला उध्वस्त करेल."

निरुपयोगी प्रयत्न

अनौरस संतती हा शिक्का पुसून काढण्यासाठी 2014च्या अखेरीस जेम्सनं स्वतःच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

दत्तक घेतल्यानं आपोआप नागरिकत्व मिळेल असं नाही. पण जेम्सचे वकिल इवान चोंग यांच्या मते त्यांचा उद्देश त्यातून सफल होऊ शकेल.

कौटुंबिक न्यायालयातील सुनावणीसाठी त्यांना गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. कारण याचिका फेटाळण्यात आली होती.

जेव्हा हे सार्वजनिक झालं, तेव्हा बऱ्याच लोकांनी दोघांची लैंगिकता आणि त्यांच्यातील नातेसंबंधांवर सरकारचा हा निकाल आहे, असं म्हणून त्याकडे बघितलं.

पुरुषांमधील सेक्स हे सिंगापूरमध्ये बेकायदेशीर आहे. आणि समलैंगिक विवाहाला कायद्यात स्थान नाही. त्या दोन पुरुषांचा मुलगा म्हणून नोएलला कधीच वैधता मिळू शकत नाही.

Image copyright SPL
प्रतिमा मथळा सिंगापूरमध्ये IVFचा वापर तसा कमी आहे.

सिंगापूर इथल्या LGBT कँपेन ग्रुपचे पिंक डॉट यांच्या म्हणण्यानुसार, हा निकाल कुटुंब कसं असाव या कालबाह्य विचारांवर आधारीत होता.

या ग्रुपच्यामते मुलाची स्वतःच्या वडिलांशी वैधता नाकारणे हा क्रूरपणा आहे आणि समाजाच्या जडणघडणीच्या तुलनेत कायदा अजून मागासलेला आहे.

न्यायाधीश शोभा नायर यांनी त्यांच्या निकालात जोर दिला की, एक कुटुंब कसं असलं पाहीजे या दृष्टीकोनावर हा निर्णय अवंलबून नव्हता.

"समान-लिंग पालकत्वाची औपचारिकता किंवा प्रभावीपणा याच्याशी या प्रकरणाचा फार थोडा संबध आहे. हे व्यावसायिक सरोगेसीच्या नैतिकतेबद्दल होतं," असं नायर म्हणाल्या.

त्या जोडप्यानं मुलासाठी दोन लाख डॉलर दिले आहेत. "कायद्याला मुलाच्या दत्तकविधानात पैशांची देवाण-घेवाण नको आहे. एक जीव एकाकडून दुसऱ्याकडे देतांना पैशांच्या वापरास प्रोत्साहन नको," असं त्या म्हणाल्या.

बीबीसीशी बोलताना चोंग यांनी मान्य केलं की, "माझे अशील हे समलैंगिक संबधात असल्यानं अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. हे स्पष्ट आहे."

विवाहातंर्गत पालकत्वास प्रोत्साहित करणं ही आमची भूमिका असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनानं म्हटलं आहे. कोणी एकानं जसं की कायद्याच्या नजरेत जेम्स यांनी नियोजनबद्ध आणि विचारपूर्वक पालकत्वाच्या उलटं केलं आहे.

पश्चाताप नाही

या निकालाविरोधात या जोडप्यानं 4 जानेवारी रोजी अपील दाखल केलं आहे.

त्यांना अद्यापही आशा आहे. पण त्यांना हेही माहित आहे की, दत्तकविधान प्रक्रिया इतकी सोपी नाही.

"न्यायालय आमच्या प्रकरणाचं मेरीट बघेल अशी आम्हाला आशा होती. पण असं झालं नाही. याबद्दल आम्ही दुःखी आणि निराश झालो आहोत," जेम्स म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या, मुलाबाबतीत जेम्सला कायदेशीर अधिकार नाहीत. पण ते अद्यापही त्याचे मूळ पालक असल्यानं नोएलच्या वतीनं सर्व निर्णय घेण्याची त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

अपील नाकारलं गेल्यास ते परदेशात स्थलांतरीत होण्याचा विचार करणार आहेत का? असं विचारल्यावर जेम्स म्हणाले, "सिंगापूर हे आमचं घर आहे. मी आणि माझा जोडीदार, आम्ही दोघं ट्रू-ब्ल्यू सिंगापुरीयन्स आहोत. आमचं शिक्षण इथंच झालं. सिंगापूर सैन्यात आम्ही काम केलं."

"आमचं कुटुंब आणि जीवनाचं मूळ या देशात आहे. आम्हाला कधीही परकेपणा वाटला नाही किंवा आमच्या विरोधात भेदभाव झाला नाही. फक्त प्रशासनाशी व्यवहार करताना जाणवलं."

"सोडून जाणं... हा निर्णय नसेल."

नोएलचं असणं हा त्यांच्यासाठी पश्चाताप नाही.

"या चार वर्षांत माझा मुलगा आमच्या जीवनात जो आनंद घेऊन आला, तो शब्दात मावण्यासारखा नाही. त्याला माहित आहे, त्याला दोन वडील आहेत. तो मला पापा म्हणतो आणि माझ्या जोडीदाराला डॅडी."

"आमचे शेजारी नेहमी त्याचं कौतुक करतात. आणि नेहमी त्याला सांगत असतात की तो किती भाग्यवान आहे. त्याची काळजी घेण्यासाठी दोन वडील आहेत. तो असणं आमच्यासाठी पश्चाताप नाही."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)