अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला : काबुल अॅम्ब्युलन्स बाँब स्फोटात मृतांचा आकडा 95च्यावर

काबूलमधले बाँब हल्ल्याचे ठिकाण Image copyright Reuters
प्रतिमा मथळा आठवडाभरातला तालिबानकडून करण्यात आलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरात अँम्ब्युलन्सचा वापर करून झालेल्या भीषण बाँब हल्ल्यात 95 जण ठार झाले असून 158 नागरिक जखमी झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली.

अफगाणिस्तानच्या जुन्या मंत्रालयाच्या इमारतीजवळ हा स्फोट झाला असून इथून युरोपीयन युनियनचं कार्यालय आणि हाय पीस काऊन्सिल यांचं कार्यालयही जवळ आहे.

तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्फोटकांनी भरलेली एका अॅम्ब्युलन्स हल्लेखोरांनी घटनास्थळी आणून हा भीषण स्फोट घडवून आणला.

गेल्याच आठवड्यात तालिबानी दहशतवाद्यांनी एका तारांकित हॉटेलवर हल्ला केला होता. यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यांतला हा काबुलमधला सगळ्यांत भीषण हल्ला आहे.

Image copyright BBC AFGHAN

या भागात अनेक देशांचे दूतावास असून शहर पोलिसांचं मुख्यालयही इथेच आहे. शनिवारी तिथल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.15 वाजता हा हल्ला झाला. त्यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. काबूल शहरातून या हल्ल्यानंतर निर्माण झालेला धूर दिसत होता.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात अशाच एका आत्मघातकी हल्ल्यात अफगाणिस्तानात 176 जणांचा मृत्यू झाला होता. तर, मे महिन्यात आत्मघातकी हल्ल्यातच 150 जण मरण पावले होते.

Image copyright EPA

जखमींना हॉस्पीटलमध्ये नेण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तालिबान ही कट्टरतावादी मुस्लीम विचारांची संघटना आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात ही संघटना कार्यरत आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)