येमेनमध्ये फुटीरतावाद्यांचा एडनवर ताबा : हा संघर्ष थांबणार तरी कसा?

फुटीरतावाद्यांनी पंतप्रधानांना रविवारपर्यंतची मुदत दिली होती.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

फुटीरतावाद्यांनी पंतप्रधानांना रविवारपर्यंतची मुदत दिली होती.

अनेक दिवस येमेन सरकारच्या सैन्याशी संघर्ष केल्यानंतर फुटीरतावाद्यांनी दक्षिण येमेनच्या एडन शहरावर जवळपास पूर्ण ताबा मिळवल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान अहमद बिन दागर आणि मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:ला एडनमधल्या राष्ट्रपती भवनात बंदिस्त करून ठेवल्याचं सांगितलं जात आहे. काही वृत्तांनुसार, याआधी एकत्र आघाडी असलेल्या दक्षिणच्या फुटीरतावादी आणि सरकारी सैन्यामध्ये वाटाघाटीची बातचीत झाली होती.

पण या संघर्षामुळं या आघाडीत फूट पडून येमेनच्या उत्तरेकडील हौदी बंडखोरांविरोधात एक नवीन आघाडी उघडली आहे.

रेड क्रॉसच्या माहितीनुसार, रविवारपासून बुधवारपर्यंत 40 लोकांचा यात मृत्यू झाला आहे.

एडनमधल्या लष्करी तळांवरही फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवल्याची माहिती समोर येत आहे.

2015 साली हौदी बंडखोरांनी येमेनची राजधानी सानावर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अबेदरब्बू मंसूर हादी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राजधानीतून सरकार हलवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकार एडन शहरात स्थलांतरित झालं होतं.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

एडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे.

राजधानी सानावरील हल्ल्यानंतर सौदीने बंडखोरांविरोधात एक बहुराष्ट्रीय लष्करी आघाडी उघडली होती. तेव्हापासून 9,245 नागरिक ठार झाले आणि 30 लाख लोक विस्थापित झाले, असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे.

फुटीरतावादी आणि सरकारमध्ये संघर्ष का?

गेल्या तीन वर्षांपासून युतीमधल्या दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरूच होती. 1990 मध्ये उत्तर येमेनशी विलनीकरणापूर्वी दक्षिण येमेन स्वतंत्र होता. आताही संघर्षाआधी दक्षिण भागात फुटीरतावाद्यांच्या भावना या सर्वोच्च बिंदूवर होत्या.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

2015 पासून येमेनचं सरकार एडन शहरातून कारभार चालवत आहे.

दक्षिण फुटीरतावाद्यांना अशी शंका होती की, राष्ट्रपती हादी दक्षिणेकडून असले तरी उत्तरेसोबतच्या एकतेला पाठिंबा देतील. पण तरीही फुटीरतावाद्यांनी त्यांना पाठिंबा देत हौदी बंडखोरांना दक्षिणेतून पळवून लावलं आणि एडन शहरावर त्यांना ताबा मिळवू दिला नाही.

पण दोन्ही पक्षांमध्ये तणाव मात्र कायम आहे.

पण आता सौदीच्या नेतृत्वाखालील युतीत पडलेल्या फुटीमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. सध्या राष्ट्रपती हादी रियाधमध्ये आहेत आणि त्यांना सौदी अरेबियाचा पाठिंबाही आहे. तर या युतीत महत्त्वाचा सहभाग असलेला संयुक्त अरब अमिरातीची (UAE) फुटीरतावाद्यांशी जवळीक आहे.

एडनमध्ये कसा सुरू झाला संघर्ष?

फुटीरतावाद्यांच्या सदर्न ट्रान्झिशनल कॉन्सिलने (STC) पंतप्रधान बिन दागर यांना हटवण्यासह मंत्रिमंडळात फेरबदलांसाठी रविवारपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यावर फुटीरतावाद्यांच्या रागाचा उद्रेक झाला.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

एडन शहरातील रस्त्यांवर फुटीरतावादी पेट्रोलिंग करताना.

कौन्सिलचे आरोप आहेत की या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारांमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली असून सामाजिक आणि सुरक्षेचे प्रश्न दक्षिणेच्या इतिहासात कधीही इतके बिकट नव्हते.

विमानतळ असलेल्या पूर्वेकडील खोर मक्सर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष झपाट्याने दक्षिणेतल्या क्रेटर जिल्ह्याकडे पसरला, जे राष्ट्रपती भवनापासून जवळ आहे आणि नंतर त्याती धग समुद्री किनाऱ्यालगतच्या पहाडी भागात पसरली.

फोटो स्रोत, AFP

फुटीरतावाद्यांनी सरकारी सुविधा आणि लष्करी तळांचा ताबा मिळवल्यानंतर पंतप्रधान बिन दागर यांनी याला 'उठाव' म्हणत त्याचा निषेध केला. तर रियाधहून राष्ट्रपती हादी यांनी एडन शहराचं रक्षण करण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत.

सद्यस्थिती काय?

राष्ट्रपतींच्या सुरक्षा दलाचा मजबूत गड मानला जाणारा उत्तरेतला दार साद जिल्हा फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेत मंगळवारी बिन दागर राहत असलेल्या राष्ट्रपती भवनाकडे कूच केली आहे.

बीन दागर आणि सहकाऱ्यांना सुरक्षितरीत्या शहर सोडता यावं यासाठी वाटाघाटी सुरू असल्याचं दक्षिणी फुटीरतावाद्यांनी 'रॉयटर्स' वृत्तसंस्थेला सांगितलं. पण पंतप्रधानांचा शहर सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचं एका सरकारी सूत्राने सांगितलं.

फोटो स्रोत, ABDO HYDER/Getty Images

फोटो कॅप्शन,

70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत

दरम्यान, सुरक्षेच्या प्रश्नावरून मानवी सेवापुरवठ्याची कामं थांबविण्यात आल्याचं 'सेव द चिल्ड्रन' संस्थेने जाहीर केलं आहे.

"आमच्या कर्मचाऱ्यांना घरांमध्ये, काही बंकरमध्येच आश्रय घ्यावा लागत आहे, कारण बाहेर युद्ध सुरू आहे," असं येमेनमध्ये या संस्थेचे संचालक तेमेर किरोलोस यांनी माहिती दिली.

संघर्ष थांबवण्यासाठी काय होत आहे?

सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने दोन्ही बाजूंना संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. "एडनमध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी युतीतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील," असं एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

फोटो कॅप्शन,

एडन आणि लगतचा परिसर

हौदी बंडखोरांविरोधात सौदी आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे, तसंच एडनमध्ये सर्व पक्षांनी संवादातून यावर राजकीय समाधान काढण्याचं आवाहन केलं आहे.

"येमेनमधली जनता याआधीच मानवी संघर्षाच्या झळा सोसत आहेत. त्यात पुन्हा विभाजन आणि हिंसचाराची भर पडल्यास त्यांना आणखी त्रास होईल," असंही अमेरिकेनं म्हटलं आहे.

या हिंसेचा दक्षिण येमेनमधल्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचं देशातले संयुक्त राष्ट्राचे समन्वयक स्टीफन अँडरसन यांनी म्हटलं आहे.

या संघर्षामुळे मानवी सेवेचं कार्य थांबवण्यात आलं असून एखाद्याचा जीव वाचवण्यासारखं मोलाचं कार्यही करणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : काय आहे येमेनमधला संघर्ष?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)