क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रोंच्या मुलाची नैराश्यातून 'आत्महत्या'

फिडेल कॅस्ट्रोंचा मुलगा Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फिडेल कॅस्ट्रो यांचे पुत्र फिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते.

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाचं गुरुवारी निधन झालं. क्युबाच्या राष्ट्रीय मीडियाने दिलेल्या वृत्तांमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

फिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यावर (डिप्रेशन) उपचार घेत होते.

डियाज-बालार्ट फिडेल कॅस्ट्रोंचे सर्वांत पहिले पुत्र होते. ते 'फिडेलितो' अर्थात 'छोटा फिडेल' या टोपणनावानेही ओळखले जायचे.

फिडेल कॅस्ट्रो यांचं पहिलं लग्न मिर्ता डियाज-बालार्ट यांच्यासोबत झालं होतं, आणि कॅस्ट्रो आणि बालार्ट यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे 'फिदेलेटो'.

देशाच्या राजकारणावर त्यांचे वडील फिडेल कॅस्ट्रो यांचा प्रभाव असूनही डियाज-बालार्ट राजकीय पदांपासून दूर राहिले.

व्यवसायाने ते एक अणुशास्त्रज्ञ होते आणि क्युबाच्या अॅकेडमी ऑफ सायन्सचे उपाध्यक्षही होते.

Image copyright Getty Images

USSRचं विघटन होण्यापूर्वी त्यांनी तिथल्या सुपिरिअर इंस्टिट्यूट ऑफ न्युक्लियर सायन्स अॅंड टेक्नॉलॉजीमधून अण्वस्त्र निर्मितीचं शिक्षण घेतलं होतं.

डियाज बालार्ट (फिदेलेटो) यांचा विवाह मारिया व्हिक्टोरिया बारेरो यांच्यासोबत झाला होता.

त्यांच्यावर हवानामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं कळलं आहे, मात्र त्याची वेळ कुटुंबाने अजून ठरली नाही आहे.

फिडेल कॅस्ट्रो यांचं नोव्हेंबर 2016मध्ये निधन झालं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)