पाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: लॉर्ड बेट्स यांनी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली

"मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला आहे.

लॉर्ड बेट्स हे यूकेतले खासदार असून मंत्रीही आहेत. संसदेत येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा नंतर नामंजूर करण्यात आला, पण यामुळे वेळेचं महत्त्व कुणाला किती, या विषयावर जगभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली.

लॉर्ड बेट्स यांना संसदेत पोहोचायला एक मिनिट उशीर झाला. त्यामुळे त्यांच्या खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते संसदेतील त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते.

संसदेत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

"मला नेहमीच वाटतं आपण सौजन्यशील असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. मी तुमची माफी मागतो." असं म्हणत बेट्स यांनी सरळसरळ आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला.

पण, पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.

"लॉर्ड बेट्स हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पण पंतप्रधान थेरेसा मे यांनी तो स्वीकारला नाही," असं सरकारच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितलं.

'मी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते'

प्रत्येक देशात उशिरा येण्याबाबतच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. काही देशात वेळ काटेकोरपणे पाळली जाते तर काही देश वेळेबाबत फार लवचिक आहेत. लॉर्ड बेट्स यांचं राजीनामा प्रकरण जगभर गाजत असताना बीबीसीनं प्रत्येक देशात वेळेच्या काटेकोरपणाबद्दल काय मतं आणि अनुभव आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

त्यासाठी बीबीसीच्या जगभरातल्या प्रतिनिधींसोबत एक प्रयोग करण्यात आला.

कोणत्या देशात वेळ कशी आणि किती पाळली जाते यासाठी 'किती उशीर हा तुमच्यासाठी मोठा विलंब आहे?' हा प्रश्न जगभरातल्या बीबीसीच्या सहकाऱ्यांना विचारण्यात आला.

"श्रीलंकेत खूप ट्रॅफिक आहे. तसंच रस्त्यावर खूप गर्दी असते. त्यामुळे बहुतेक सर्व जण कामाच्या ठिकाणी नेहमी उशिरा पोहोचतात. मी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते," असं श्रीलंकेतल्या आमच्या सहकारी दहामी यांनी सांगितलं.

जर्मनीतल्या यान यांनी मात्र जर्मनीतल्या शिस्तबद्धतेबद्दल सांगितलं. त्यांच्या मते, "जर्मनीत वेळेला खूप किंमत आहे. डिनरला लोक वेळेवर येतात. ठरलेल्या वेळी लोक बरोबर येतात."

जपानी लोकही वेळेचे पक्के असल्याचं तिथल्या प्रतिनिधी सांगतात. जपानमधल्या बीबीसीच्या प्रतिनिधी मारिको ओई म्हणाल्या, "वेळ 9ची दिली असेल तर आमच्याकडे 5 ते 10 मिनिटं आधी पोहोचण्याची प्रथा आहे."

निकाराग्वा, रवांडा इथल्या प्रतिनिधींनी त्यांच्या देशात सर्व जण वेळेबाबत काटेकोर असतीलच असं नाही, असं सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)