'माझ्या आई, बायकोला गोळ्याच घाला!' चीनमधल्या मुस्लिमांची अशी मागणी का?

वीगर मुस्लीम Image copyright Getty Images

चीनमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांबरोबर होणाऱ्या वागणुकीच्या मुद्द्यावर ब्रिटीश सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम चीनच्या शिनजियांग प्रांतात काही लोकांना कोणत्याही प्रकारचा खटला दाखल न करता ताब्यात घेण्याची काही प्रकरणं समोर आली आहेत.

एप्रिल 2017मध्ये सुरुवातीला चीनच्या शिनजियांग प्रांतात सरकारने इस्लामी कट्टरवादाविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत वीगर मुस्लिमांवर निर्बंध लादले होते. त्यात दाढी वाढवणं, सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणं आणि सरकारी टीव्ही चॅनल पाहण्यास बंदी घालणं, अशा अनेक निर्बंधांचा समावेश होता.

2014 सालच्या रमजानमध्ये मुस्लिमांना रोजे ठेवण्यावर बंदी घातली होती. याचं कारण काय आहे?

चीनमधले मुस्लीम इतके का घाबरले आहेत?

प्रथमदर्शनी ही जागा इराकची राजधानी बगदादसारखी दिसते. पण शिनजियांग प्रांतातल्या या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर सरकारची करडी नजर आहे.

हे लोक वीगर समाजाचे आहेत, जे चीनमध्ये मुस्लीम अल्पसंख्याक आहेत.

आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप घाबरलेले दिसले. ते व्यवस्थित उत्तरं देऊ शकत नव्हते. सरकारी हेर त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात.

इथे राहणाऱ्या लाखो लोकांचे DNAचे नमुने घेतले जात आहेत. त्यांचे मोबाईल तपासले जातात आणि ते कोणत्या प्रकारची जातीय हिंसा तर पसरवत नाही ना, याची शहानिशा केली जाते. तसंच चीनविरोधात देशद्रोह होत आहे, अशी पुसटशी शंका जरी आली तरी त्यांना गुप्त कारागृहात पाठवलं जातं.

'गोळ्यांचे पैसै मी देतो'

गैरसरकारी आकड्यांनुसार हजारो वीगर मुस्लीम लोकांना विना खटला तुरुंगात टाकलं आहे.

आम्ही शिनजियांगमध्ये गेलो. तिथे आम्हाला थांबवून आमची झडती घेण्यात आली आणि आमचा माग घेतला.

Image copyright AFP

शेकडो वीगर मुस्लिमांसारखे अब्दुर्रहमान हसन चीन सोडून तुर्कस्तानात गेले आहेत. त्यांना असं वाटलं की त्यांची आई आणि बायको चीनमध्ये सुरक्षित असतील. पण त्यांना शेवटी हेच कळलं की त्यांच्या आईला आणि पत्नीला तुरुंगात डांबण्यात आलं आहे.

अब्दुर्रहमान सांगतात, "सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना एका खुर्चीवर बसवलं जातं. माझ्या आईला अशी शिक्षा का भोगावी लागत आहे? माझ्या पत्नीचा इतकाच दोष आहे की ती वीगर आहे. फक्त यामुळे तिला एका कँपमध्ये जमिनीवर झोपावं लागत आहे. त्या जिवंत आहेत की मेल्या, मला हेसुद्धा माहिती नाही. बस्स! आता आणखी हे सहन होत नाही. मला असं वाटतं चीन सरकारने त्यांना इतकं दु:ख देण्याऐवजी त्यांना गोळ्या घालाव्यात. गोळ्यांचे पैसै मी देतो."

दुसरीकडे, चीन वीगर मुसलमानांनी केलेले आरोप फेटाळून लावत आहे. नुकत्याच जगभरात झालेल्या कट्टरवादी हल्ल्याचं उदाहरण देऊन इस्लामिक कट्टरवाद किती मोठा धोका आहे, असं चीन सांगत आहे.

वीगर मुस्लीम कोण आहेत?

पश्चिम चीनच्या शिनजियांग प्रांतात चीनी प्रशासन आणि तिथल्या स्थानिक वीगर समुदायामधल्या संघर्ष बराच जुना आहे. वीगर खरंतर मुस्लीम आहेत आणि सांस्कृतिक आणि वांशिक दृष्ट्या ते स्वत:ला मध्य आशियाई देशांच्या अतिशय जवळचे मानतात.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा शिनजियांग येथील अशांती वाढवण्यासाठी चीन निर्वासित आणि वीगर मुस्लीम आणि वीगर नेता राबिया कादीर यांच्यावर समस्या वाढवण्याचा आरोप आहे.

अनेक वर्षांपासून चीनच्या या प्रदेशातली अर्थव्यवस्था कृषी आणि व्यापारकेंद्रित आहे. इथल्या काशगर सारख्या प्रसिद्ध भागात सिल्क रूटची अनेक संपन्न केंद्रं आहेत.

20व्या शतकाच्या सुरुवातीला वीगरांनी थोड्या काळासाठी स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं होतं. या परिसरावर चीननं 1949 साली पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं.

दक्षिण चीनमधल्या तिबेटसारखंच शिनजियांग अधिकाधिक रूपात स्वायत्त क्षेत्र आहे.

वीगर लोकांच्या तक्रारी

बीजिंगचा आरोप आहे की राबिया कदीर यांच्याबरोबर निर्वासित वीगर समस्या वाढवत आहेत. त्याच वेळी सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय सरकारच्या धोरणांमुळे तसंच धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींमुळे वीगरांचे मुद्दे दुर्लक्षित झाले.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा शिनजियांग येथे चीननं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

बीजिंगवर आरोप आहे की, 1990च्या दशकात शिनजियांगमध्ये झालेल्या निदर्शनानंतर आणि पुन्हा 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान झालेल्या निदर्शनानंतर सरकारच्या दडपशाहीला वेग आला होता.

मागच्या दशकादरम्यान बहुतांश वीगर नेत्यांना तुरुंगात डांबलं किंवा कट्टरवादाचा आरोपामुळे ते परदेशात शरणार्थी म्हणून जाऊ लागले.

चीनच्या हान समुदायाला शिनजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक करण्याच्या कारवाईनंतर इथले वीगर अल्पसंख्याक बनले.

बीजिंगवर असाही आरोप केला जात आहे की ते आपल्या दडपशाहीला योग्य सिद्ध करण्यासाठी वीगर फुटीरतावाद्यांचा धोक्याला मोठं रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.

बीजिंग काय म्हणतं?

चीनने शिनजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पण त्याबरोबर त्यांनी या भागात बराच मोठा संरक्षण ताफा तैनात केलं आहे.

चीन सरकार म्हणतं की वीगर कट्टरवाद्यांनी समाजात फूट पाडायला वेगळं होण्यासाठी बाँब हल्ले आणि तोडफोडीसारख्या कुरापत्या करून हिंसक अभियान छेडलं आहे. अमेरिकेत 9/11च्या हल्ल्यानंतर चीनने वीगर फुटीरतावाद्यांना अल कायदाचा सहकारी सिद्ध करण्याचा सतत प्रयत्न केला आहे.

त्यांनी अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतलं आहे, असा चीनच्या सरकारचा आरोप आहे. पण या दाव्याला दुजोरा देणारे फार कमी पुरावे दिले आहेत.

अफगाणिस्तानवर झालेल्या हल्ल्यादरम्यान अमेरिकेच्या सैन्यानं 20 पेक्षा अधिक वीगर लोकांना पकडलं होतं. त्यांच्यावर कोणताही आरोप न ठेवता त्यांना अनेक वर्षांपर्यंत गुआंतानामो बेमध्ये कैद करून ठेवलं होतं आणि त्यांच्यापैकी बहुतांश इकडे तिकडे स्थायिक झाले आहेत.

मोठा हल्ला

2009च्या जुलै महिन्यात शिनजियांगची प्रशासनिक राजधानी उरुमुची मध्ये जातीय दंगलीत किमान 200 लोकांचा मृत्यू झाला होता. असं म्हटलं जातं की या हिंसेची सुरुवात एका फॅक्टरीमध्ये हान चीनी लोकांसोबत वीगरांच्या झालेल्या संघर्षातून झाली होती, ज्यात दोन वीगरांच्या मृत्यू झाला होता.

Image copyright AFP

चीनचं प्रशासन या हिंसाचारासाठी देशाच्या बाहेर असणाऱ्या शिनजियांग फुटीरतावाद्यांनाही जबाबदार ठरवून निर्वासित वीगर नेता राबिया कादीर यांना दोषी मानतात.

राबिया यांनी हिंसा भडकावल्याचं चीनचं म्हणणं आहे. पण त्यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

शांततेत निदर्शनं करणाऱ्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्याच्यामुळे हिंसा आणि मृत्यू झाले.

सध्याची परिस्थिती

शिनजियांगला प्रसिद्ध सिल्क रूटवर बाहेरच्या चौकीच्या रूपात प्रसिद्धी मिळाली आहे आणि अजूनही हान चीनी पर्यटक तिथे आकर्षित होतात.

शिनजियांगमध्ये औद्योगिक आणि उर्जा योजनांमध्ये खूप जास्त सरकारी गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक मोठं यश असल्याचं बीजिंग सतत बिंबवत असतं.

पण बहुतांश वीगर लोकांची तक्रार आहे की त्यांच्या नोकरीवर गदा येत आहे आणि त्यांच्या शेतजमिनी पुर्नविकासाच्या नावावर जप्त केल्या जात आहेत.

स्थानिक आणि परदेशी पत्रकारांच्या हालचालींवर सरकारची करडी नजर आहे आणि या भागातल्या बातम्यांचे स्रोत खूपच कमी आहेत.

पण चीनला लक्ष्य बनवून केल्या जाणाऱ्या बहुतांश हल्ल्यांवरून असं दिसतं की वीगर फुटीरतावाद पुढेही बरीच हिंसक शक्ती बनून राहील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)