4 इंचाच्या हिल्स घालून 8 तास भाषण : अमेरिकेच्या सिनेटमध्ये नवा विक्रम

फोटो स्रोत, Chip Somodevilla/Getty Images
नॅन्सी पेलोसी यांनी स्थलांतरिताच्या मुद्यावरून आठ तास भाषण केलं.
अमेरिकेच्या संसदेत एकाच मुद्द्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम नॅन्सी पेलोसी यांनी केला आहे. 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह' अर्थात संसदेत नॅन्सी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर आठ तास बोलत होत्या.
लहानपणी स्थलांतरित म्हणून अमेरिकेत दाखल होणाऱ्या आणि प्रशासनाकडे नोंद नसणाऱ्या व्यक्तींबद्दल नॅन्सी यांनी आपली भूमिका सदस्यांसमोर मांडली. अशा स्थलांतरितांना 'ड्रीमर्स' असं म्हटलं जातं.
स्थलांतरितांना सुरक्षा मिळावी यासाठी अर्थसंकल्पात तरतूद असण्याबाबत नॅन्सी बोलत होत्या. बुधवारी सकाळी दहा वाजता नॅन्सी यांनी बोलायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत त्या बोलतच होत्या.
ड्रीमर्सना 'डेफरर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल स्कीम' अंतर्गत संरक्षण होतं मात्र डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी ही योजना बंद करून टाकली.
दर दिवशी ड्रीमर्स व्यक्तींची समाजातील प्रतिमा धुळीस मिळते आहे. पर्यायाने अमेरिकन नागरिकाचं स्वप्न भंग पावतं आहे. संसदपटू म्हणून ड्रीमर्सना संरक्षण मिळवून देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. ड्रीमर्स आपल्या देशाची शान आहेत पण हे सगळं कागदावरच राहिलं अशा शब्दांत नॅन्सी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमेरिकेतून हद्दपार होण्याची टांगती तलवार घेऊन जगणाऱ्या स्थलांतरितांच्या जीवनकहाण्या नॅन्सी यांनी मांडल्या.
सोशल मीडियावर नॅन्सी यांच्या भाषणासंदर्भात नेटिझन्सनी अनेक मुद्दे शेअर केले. नॅन्सी यांनी आठ तास भाषण केलं हे अनेकांसाठी अनोखं होतं पण याव्यतिरिक्त बोलताना त्यांनी फारच कमी वेळा त्यांनी पाणी प्यायलं. चार इंचाच्या हाय हिल्स परिधान करून त्यांनी हे भाषण केलं याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं.
डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांनी तसंच नॅन्सी यांच्या सहकाऱ्यांनी #GoNancyGO या हॅशटॅगसह अभिनंदनपर मेसेज आणि ट्वीट केलं. दरम्यान ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाने याच हॅशटॅगचा आधार घेत हे भाषण म्हणजे स्टंट आहे आणि यामुळे प्रचंड वेळ वाया गेला असं म्हटलं आहे.
संसदेचं कामकाज रोखण्यासाठी 'डेकाबस्टर' प्रणाली अवलंबली जाते. मात्र नॅन्सी यांचे भाषण डेकाबस्टर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सदस्य म्हणून योग्य वाटेल तेवढा वेळ भाषण करण्याचा अधिकार नॅन्सी यांना आहे.
संसदेत सर्वाधिक वेळेचं भाषण करण्याचा विक्रम याआधी चॅम्प क्लार्क यांच्या नावावर होता. त्यांनी 1909 मध्ये पाच तास 15 मिनिटांचं भाषण केलं होतं.
नॅन्सी यांचं भाषण संपल्यानंतर सदनात उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. शटडाऊन रोखण्यासंदर्भात दोन वर्षांचा करार तयार करण्यात आला होता.
नव्या करारानुसार ड्रीमर्सना संरक्षण पुरवण्यात आलेलं नाही. नॅन्सी आणि त्यांच्या पक्षाचा याला विरोध आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)