कृष्णा कोहली : हिंदू मजुराची मुलगी पाकिस्तानाच्या सिनेटची उमेदवार
- सहर बलोच
- बीबीसी उर्दू प्रतिनिधी

कृष्णा कोहली
पाकिस्तानात उच्च पदांवर हिंदू चेहरे खूपच कमी दिसून येतात. उच्चपदांवरील महिलांचं अस्तित्व तर नगण्यच आहे.
पण ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महिला उच्चपदांवर आहेत, त्यांच्या यादीत आता कृष्णा कोहली यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तिथल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाकडून कोहली यांनी सिनेटच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
पाकिस्तानच्या थरपारकर क्षेत्रातल्या कोहली यांनी सिनेटच्या निवडणुकांसाठी बुधवारी पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे हा उमेदवारी अर्ज भरला आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीनं कोहली यांना सिंध प्रांतात सामान्य गटातून तिकीट दिलं आहे.
कोहली जेव्हा उमेदवारी दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आल्या त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चुणूक दिसत होती.
थरपारकर क्षेत्र
कोहली यांनी बीबीसीला सांगितलं की, "पाकिस्तानच्या इतिहासात थरपारकर भागातल्या त्या पहिल्या महिला आहेत, ज्यांना संसदेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे."
फोटो स्रोत, FACEBOOK @AGHA.ARFATPATHAN.7
"मी बिलावल भुत्तो यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत," असं त्या म्हणतात.
कोहली थरपारकर भागातल्या एका छोट्या गावातून येतात. त्यांचे आजोबा रुपलो कोहली यांनी 1857साली इंग्रजांच्या विरोधात झालेल्या स्वातंत्र्य लढाईत भाग घेतला होता.
या लढाईच्या काही महिन्यानंतर त्यांना फासावर चढवण्यात आलं होतं.
"सततचा दुष्काळ पडत असल्यानं थरपारकरमध्ये जीवन जगणं अवघड काम आहे," असं कोहली यांनी बीबीसीला सांगितलं.
सोळाव्या वर्षी लग्न
कोहली या गरीब कुटुंबातल्या आहेत. त्यांचे वडील जुगनू कोहली मजूर होते. दुष्काळात काम मिळत नसल्यानं त्यांना कामाच्या शोधात सतत भटकावं लागत असे.
"उमरकोटच्या जमीनदारानं माझ्या वडिलांना कैद केलं आणि तीन वर्ष आम्ही त्यांच्या कैदेत राहिलो. त्यावेळी मी तिसरीत होते."
"कोणत्याही नातेवाईकाकडे आम्ही जाऊ शकत नव्हतो तसंच कुणाशी बोलूही शकत नव्हतो. जमीनदाराच्या सांगण्यावरून काम करत होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून परत कैदेत जात होतो," कोहली त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगतात.
कृष्णा कोहली यांना केशूबाई या नावानंही ओळखलं जातं.
त्यांचं लग्न वयाच्या सोळाव्या वर्षीच झालं. पण पतीमुळेच पुढचं शिक्षण घेण्यात मदत झाली, असं त्या सांगतात.
मुलींचं शिक्षण आणि आरोग्य
कोहली यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून थरमध्ये त्या मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करत आहेत.
फोटो स्रोत, TWITTER @KISHOOLAL
"थर इथल्या गर्भवती महिलांचं आयुष्य खूपच कठीण आहे. खासदार बनल्यानंतर मी त्यांच्यासाठी काम करेन," असं त्या सांगतात.
पीपीपीचे नेते सरदार शाह यांच्या सांगण्यावरूनच आपण उमेदवारी दाखल केल्याचं त्या सांगतात.
"मी यापूर्वीही पीपीपीसोबत काम केलं आहे. 2010 मधल्या लैंगिक हिंसाचाराविरोधी विधेयकापासून ते 18व्या दुरुस्तीपर्यंत आम्ही एकत्र काम केलं आहे."
"महिलांच्या आरोग्यासाठी ज्या प्रकारचं व्यासपीठ हवं होतं ते शेवटी मला मिळालं आहे. महिलांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन, याचा मला विश्वास आहे," असं कोहली सांगतात.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)