चेदार मानव : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!

  • पॉल रिंकन
  • सायन्स एडिटर, बीबीसी न्यूज
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!

दहा हजार वर्षांपूर्वीच्या ब्रिटनमधल्या नागरिकांची त्वचा काळ्या रंगाची आणि डोळे निळ्या रंगांचे असल्याचे एका वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झालं आहे.

लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमनं 10 हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या DNAचे नमुने तपासले. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा 1903 मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.

या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला.

यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर येत आहे.

तसंच अतिप्राचीन काळाशी संबंध असलेल्या कोणत्याही अवशेषांचा ब्रिटनमध्ये अद्याप या पद्धतीनं जनुकीय अभ्यास झालेला नाही.

फोटो स्रोत, channel 4

हिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली आहे.

चेदार मानवाच्या DNAवरून केलेल्या या जनुकीय अभ्यासाबाबतचा अहवाल आणि डॉक्युमेंट्री प्रकाशितही होणार आहे. समरसेटच्या चेदार व्हॅलीमधल्या गॉग्स केव्ह इथे 115 वर्षांपूर्वी या चेदार मानवाचे अवशेष आढळून आले.

हा मानव सध्याच्या मानवाइतकाच उंचीचा म्हणजे 5 फूट 5 इंच उंचीचा होता. तसंच त्याचा मृत्यू ऐन विशीत झाल्याचेही अभ्यासावरून स्पष्ट होते.

म्युझियमच्या मानवी अवशेषांच्या अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. ख्रिस स्ट्रिंगर म्हणाले की, "मी 40 वर्षांपासून चेदार मानवाच्या सांगाड्याचा अभ्यास करतो आहे."

या चेदार मानवाच्या सांगाड्यावर आपल्याला या मानवाच्या केसांची रचना कशी असेल, त्याच्या केसांचा रंग कसा असेल, डोळ्यांचा रंग कसा असेल आणि त्याच्या त्वचेचा रंग कसा असेल याची कल्पना येते.

काही वर्षांपूर्वी असे निष्कर्ष मिळण्याची कल्पना करणं देखील शक्य नव्हतं आणि हेच या वैज्ञानिक आकडेवारीवरुन समजते.

फोटो स्रोत, channel 4

चेदार मानवाच्या कवटीला तडे गेले आहेत. त्यावरून असं लक्षात येतं की त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर त्याच्या कवटीवर आघात करण्यात आला होता.

तो गुहेमध्ये कसा आला असेल याबद्दल अजून माहिती उपलब्ध नाही, पण त्याच्या टोळीतील साथीदारांनी त्याला गुहेत ठेवले असावे, असा एक अंदाज आहे.

संशोधकांनी त्याच्या कवटीच्या कानाजवळील भागातून DNAकाढला आहे. त्या भागाला पेट्रोस असं म्हणतात. DNAचा अंश आपल्याला मिळेल असं प्रा. इयान बार्न्स आणि डॉ. सेलिना ब्रेस यांना वाटतच नव्हतं. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांन DNAचा अंश मिळाले. यामुळे मध्य-अश्मयुगाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या टीमसोबत एकत्र आले. केस, डोळे आणि त्वचेचा रंग या गोष्टींचा अभ्यास करण्यास आम्ही सुरुवात केली.

या अभ्यासातून काय निष्कर्ष समोर आले

अश्मयुगातल्या ब्रिटीश लोकांचे केस काळे आणि कुरळे होते. त्यांचे डोळे निळे आणि त्वचा ही काळसर आणि चॉकलेटी होती.

"आपण अशा समाजात वावरतो जिथं त्वचेच्या रंगाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे," असं चॅनेल फोर डॉक्युमेंटरीचे संचालक स्टीव्हन क्लार्क म्हणतात.

"सुरुवातीच्या काळातील लोकांचा रंगरुप कसं होतं याचा विचार जर सगळ्यांनी केला तर ती गोष्ट नक्कीच सकारात्मक ठरू शकेल," असं प्रा. मार्क थॉमस यांनी म्हटलं आहे.

या शोधाला सोशल मीडियावर अमाप प्रसिद्धी मिळाली आहे.

फोटो स्रोत, channel 4

मेसोलिथिक काळातील मानवासोबत चेदार मानव साधर्म्य साधणारा होता असं निरीक्षण यातून समोर आलं आहे. स्पेन, लक्झमबर्ग आणि हंगेरी या ठिकाणच्या शिकारी टोळ्यातील मानवांशी ब्रिटनमधील चेदार मानव मिळता जुळता आहे असं आढळला आहे.

अनुवंशीय अभ्यास आणि कवटीच्या आकाराचा अभ्यास करुन डच आर्टिस्ट अल्फोंस आणि अॅड्री केन्नीस यांनी चेदार मानवाचं प्रतिरुप तयार केलं. जुन्या काळातला माणूस कसा होता त्याचा चेहरा कसा होता याचं अगदी जिवंत प्रतिरुप त्यांनी तयार केलं.

6,000 वर्षांपूर्वी मध्य आशियातून मानवी स्थलांतर झालं. मध्य आशियातील लोक पिवळसर रंगाचे होते. हे लोक ब्रिटनमधल्या लोकांच्या संपर्कात आले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा डोळ्यांचा निळा रंग आणि त्वचा पिवळसर होऊ लागली.

गेल्या 10 हजार वर्षांमध्ये त्वचेच्या पिगमेंटेशनमध्ये भरपूर बदल झाले असेही काही संशोधक म्हणतात.

अजून काय आहेत निरीक्षणं?

चेदार मानवाला दूध पचवता येत नसे. कांस्य युगाच्या सुरुवातीला दूध पचवण्याची क्षमता निर्माण झाली असावी.

सध्याच्या युरोपियन लोकांची रचना मध्य-अश्म युगातील मानवाशी दहा टक्के जुळते.

ब्रिटनच्या आधुनिक मानवाचा इतिहास किती वर्षं जुना आहे याचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात हा इतिहास 40 हजार वर्षांपूर्वीचा आहे. तर 'लास्ट ग्लेसियल मॅक्सिमम' हा अति शीतकाळ 10 हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे आधुनिक मानवाचा इतिहास 10 हजार वर्षांपूर्वीचा आहे.

चेदार मानवाच्या अभ्यासासाठी 'गॉग्स केव्ह' ही गुहा महत्त्वपूर्ण मानली जाते. या गुहेत चेदार मानवाचे अवशेष सापडले आहेत.

गॉगच्या गुहेमध्ये सापडेल्या अवशेषांनुसार ब्रिटनच्या आधुनिक माणसाचा इतिहास हा 15 हजार वर्षं जुना आहे. या गुहांमध्ये जे सापळे सापडले आहेत, त्यांची हाडे कापण्यात आली आहे. त्यामुळं रीतीरिवाजाचा भाग म्हणून हे लोक मृत माणसाला खात असावेत असा अंदाज संशोधकांनी मांडला आहे.

चेदार मानव हा स्थलांतरित आहे. डॉगरलॅंड या भूभागावर त्याचं काही काळ वास्तव्य होतं. या भागाचा संपर्क मुख्य युरोपीयन भूभागाशी होता. आताच्या काळातल्या ब्रिटीश माणसांचा विचार केला, तर या चेदार मानवचेच त्याच्याशी सर्वाधिक साधर्म्य होतं असा निष्कर्ष काढता येतो.

चेदार मानवाच्या DNA परीक्षणाची ही काही पहिलीच वेळ नाही. 1990मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जेनेटिसिस्ट ब्रायन सायकेस यांनी देखील या विषयावर अभ्यास केला होता.

प्रा. सायकेस यांनी चेदार गावातील 20 लोकांच्या जनुकीय माहितीसोबत चेदार मानवाची संरचना तपासून पाहिली. दोन जणांशी ही संरचना जुळली. इतिहासाचे शिक्षक अॅड्रियन टारगेट यांच्या जनुकीय संरचनेशी त्यांची अतिप्राचीन चेदार मानवाची संरचना जुळल्यानंतर हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचा निर्वाळा संशोधकांनी दिला.

10 हजार वर्षांपूर्वीच्या ब्रिटनमधल्या नागरिकांची त्वचा काळ्या रंगाची आणि डोळे निळ्या रंगांचे असल्याचे एका वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)