असा अफगाणिस्तान पाहिलाय का?

  • मोनिका विट लॉक
  • बीबीसी वर्ल्ड सर्विस
अफगाणिस्तानातली दृश्य

आज अफगाणिस्तान जसा आहे तसाच या देशाचा भूतकाळही होता का?

एका जुनं अफगाण मासिक हल्लीच डिजिटल रुपात आणण्यात आलं. ते पाहून पू्र्वीचा एखादा हरवलेला ऋतू परतला आहे, असं वाटतं.

रंगीबेरंगी, सुंदर आणि माहितीपूर्ण अशा 'जवानदुन' (जिंदगी) या मासिकाची पानं डिजिटल करण्यात आली. ही डिजिटल पानं सामाजिक आणि राजकीय बदलांच्या काळातल्या अफगाणिस्तानातील श्रीमंत नागरिकांच्या इच्छा-आकांक्षाचा दस्ताऐवज आहेत.

हे मासिक विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फार काळ चाललेलं मासिक होतं. या मासिकात वैश्विक मुद्दे, सामाजिक मुद्दे आणि इतिहासाशी निगडीत लेखांसह फॅशनच्या दुनियेतल्या तारे-तारकांवर स्तंभलेखन केलेलं असे.

'टाइम' मासिकाप्रमाणेच जवानदुन मासिक होतं. फक्त यात कथा आणि कवितांसाठी पण जागा होती. राजकीय चढ-उतारांच्या पाच दशकांच्या काळातली उलथापालथ या मासिकात दिसून येते.

याचबरोबर या मासिकाच्या पानांत वाचकांची हळवी बाजूही पाहायला मिळायची. ती म्हणजे वाचकांची स्वप्न आणि त्यांच्या इच्छा.

ज्या देशाची बहुसंख्य जनता निरक्षर होती, त्या देशातल्या एका खास गटासाठी 'जवानदुन' मासिक प्रसिद्ध व्हायचं. मासिकातले लेखक आणि वाचक हे जास्त करून काबुलचेच रहिवासी होते.

हे प्रगतीवादी लोक होते. ज्यांच्याकडे सिनेमा पाहायला वेळ आणि सामर्थ्य होतं. आपल्या पोषाखातील बदलांबाबत ते विचार करू शकत होते.

अफगाणिस्तानात १९२० नंतरच्या दशकात जी नियतकालिकं प्रसिद्ध झाली त्यांच्यातली चंचलता 'जवानदुन' मासिकांतून दाखवली जायची.

तर, त्या काळी काबुल पत्रिका अफगाणिस्तानातील सर्वाधिक चर्चित लेखक आणि विचारकांसाठी पुढे येण्याचा मार्ग होता.

तसंच, काबुल युनिर्व्हसिटीची सम-सामयिकी पत्रिका, लहान मुलांच्या गोष्टींसाठी कामकायानो अनीस हे मासिक निघत असे.

जवानदुन मासिकाचं प्रकाशन १९४९मध्ये सुरू झालं होतं. युरोपीय राष्ट्रे दुसऱ्या महायुद्धानंतर आपलं प्रभाव गमावू लागण्याचा तो काळ होता.

त्या दिवसात अफगाणिस्तानचे शेजारी देश भारत, पाकिस्तान आणि इराण या देशातून ब्रिटीश बाहेर गेल्यानंतरचा स्वतंत्र काळ सुरू झाला होता.

अफगाणिस्तानही एक नवं राष्ट्र म्हणून स्थापित होऊ पाहत होतं. तेव्हा अफगाणिस्तानात पैसाही होता. देशाचे त्यावेळचे राजे शाह जाहिर यांनी आपल्या मनसुब्यांना मुर्त रुप देण्यासाठी परदेशी सल्लागार बोलावले होते. तसंच ते अमेरिका आणि रशियाकडे मदत मागत होते.

त्या काळात स्थापन झालेल्या एरियाना एअरलाईन्स कंपनीनं संपूर्ण जगाला अफगाणिस्तानशी जोडलं होतं. या कंपनीचा सगळ्यांत चर्चित हवाई मार्ग हा काबुल ते फ्रँकफर्ट हा होता. इराण, दमास्कस, बेरुत, अंकारा या मार्गे हे विमान जात असे.

तेराव्या शतकातले इटालियन प्रवासी मार्को पोलो यांच्यामुळे या मार्गाला मार्को पोलो मार्ग म्हटलं जात असे.

तसंच, डोंगराळ भाग आणि वाळवंट यामुळे मुख्य प्रवाहाशी तुटलेले विभाग अंतर्गत हवाई वाहतुकीमुळे जोडले गेले होते.

१९६०च्या दशकांत जवानदुन मासिकाची पानं जाहिरातीनं भरलेली असत. कार, फ्रिज, बेबी मिल्क यांसारखी उत्पादनं मोठ्या समूहापासून लांब होती. मात्र, एक विशिष्ट समूह त्यातही विशेषतः महिलांच्या जीवनशैलीत आलेल्या क्रांतीचं प्रतिनिधीत्व ही उत्पादनं करत होती.

पण, १९७३ येता-येता या गोष्टी बदलून गेल्या. मोहम्मद दाऊद यांनी शाह जाहिरना सत्तेवरून दूर केलं. वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा बाजूला सारत त्यांनी स्वतःला बादशाह घोषित करण्याऐवजी देशाचा राष्ट्रपती घोषित केलं.

दाऊद खाननं अफगाणी कारखाने आणि सेवांवर जोर दिला. याच काळात जवानदुन मासिकांतल्या जाहिराती वाढू लागल्या.

पण, अफगाणिस्तानात नव्या राजकीय विचारांनी जन्म घेतला. दाऊद खान यांना १९७८मध्ये कट्टरतावादी सैन्य अधिकाऱ्यांनी सत्तेवरून दूर केलं. या विद्रोहानं अफगाणिस्तानात जे युद्ध छेडलं ते आजतागायत सुरू आहे.

१९७९मध्ये अफगाणिस्तानावर सोव्हिएत युनियननं हल्ला केला आणि नियतकालिकांमधून व्यावसायिक जाहिराती हद्दपार झाल्या.

मात्र, याही काळात जवानदुन वेगळ्या पद्धतीनं स्वप्नांचं प्रतिबिंब म्हणून बनून राहिलं. हॉलीवुडच्या तारे-तारकांची जागा सोव्हिएत युनियनमधल्या सिनेतारकांनी घेतली. टेप रेकॉर्डर आणि फ्रिज यांच्या जागी आता शेतीच्या उपकरणांच्या जाहिराती छापल्या जाऊ लागल्या.

या जाहिरातींत सोव्हिएत संघानं या देशाला ताब्यात घेण्यापूर्वीच्या आदर्शवादी लोकांचं प्रतिबिंबही दिसायचं.

या जाहिरातींमधून अजून एक गोष्ट जाणून घेता येते, ती म्हणजे, अमेरिका आणि रशिया यांच्यातले विकासाच्या मुद्द्यावरचे विचार मिळते-जुळते होते.

१९९०च्या दशकात सोव्हिएत संघाच्या पतनानंतर जवानदुन, काबुल पत्रिका आणि अन्य नियतकालिकांचं प्रकाशन बंद झालं.

तो फार उलथापालथीचा काळ होता. बरेच लेखक, चित्रकार आणि वाचक देश सोडून निघून गेले होते. तालिबानचा उदय झाल्यामुळे यातले बहुतांश लोक देशात परतू शकले नाहीत. त्यामुळे हा महत्त्वाचा सामाजिक पुरावाच गायब झाला.

पण, अफगाणिस्तानातली ही नियतकालिकं वाचून फेकून देण्यासारखी नव्हती. संग्रहकर्त्यांनी, ग्रंथालयांनी यांना सांभाळून ठेवलं आहे.

अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसनं अफगाण सीमेच्यापलिकडे पाकिस्तानात या नियतकालिकांना सांभाळून ठेवलं आहे. कार्नेगी कॉर्पोरेशनच्या साहाय्यानं यातल्या शेकडो नियतकालिकांना डिजिटल रुपात आणून वर्ल्ड डिजिटल लायब्ररीचा भाग बनवलं आहे.

आपण या पत्रिका इथे वाचू शकता. अफगाण प्रकल्पाबद्दल अधिक माहिती तुम्ही इथून घेऊ शकता.

या नियतकालिकांच्या प्रती मिळणं आता दुरापास्त झालं आहे, तरीही बाजारात कधी-कधी या प्रती डोळ्यापुढे तरळून जातात.

(सगळी छायाचित्र लायब्ररी ऑफ काँग्रेस आणि वर्ल्ड डिजीटल लायब्ररी यांच्याकडून घेण्यात आली आहेत.)

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)