इस्राईलचे सीरियावर हवाई हल्ले

हवाई हल्ला

फोटो स्रोत, AFP GETTY

इस्राईलने सीरियावर गेल्या 30 वर्षांतील सर्वांत मोठे हवाई हल्ले केले आहेत. इस्राईलच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला ही माहिती दिली. इस्राईलने दमिश्कच्या जवळच्या 12 सैन्य ठिकाणांवर हल्ला केला आहे.

रशिया आणि अमेरिकेने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

इस्राईलच्या हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी जनरल तोमर बार म्हणाले, "1982च्या लेबनॉन युद्धानंतर सीरियावर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे."

इस्राईलच्या सैन्याने सीरियातील इराणच्या सैनिकी तळांना लक्ष्य केल्याचा दावाही केला आहे.

शनिवारी सीरियाच्या लष्कराने इस्राईलचं लष्करी विमान पाडलं होतं. सीरियाने गोळीबार केल्यानंतर हे विमान इस्राईलच्या हद्दीत पडलं होतं.

फोटो स्रोत, EPA

अमेरिका आणि रशियाने सीरिया आणि इस्राईलच्या सीमेवर सुरू असलेल्या हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

बीबीसीशी बोलताना इस्राईलच्या लष्कराचे प्रवक्ते जोनाथन कोनरीकस म्हणाले, "आम्ही 12 वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. यातील 8 हल्ले सीरियाच्या वायुदलाशी संबंधित ठिकाणांवर आहेत. याच ठिकाणांहून इस्राईलच्या विमानावर क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. इतर 4 ठिकाण सीरियाच्या हद्दीतील इराणची सैन्य ठिकाण होती."

सीरियाच्या हद्दीमधील फक्त लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा इस्राईलचा दावा आहे. यापूर्वी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की इस्राईलचे जे विमान पाडण्यात आलं ते विमान इस्राईलमध्ये ज्या ठिकाणाहून ड्रोन पाठवण्यात आलं होतं त्या स्थळाला लक्ष्य करणार होतं.

फोटो स्रोत, Reuters

ते म्हणाले, "सीरियातील इराणच्या मोर्चेबांधणीबद्दल मी वारंवार इशारा दिला आहे. इस्राईलच्या विरोधात इराण सीरियाचा भूमीचा वापर करत आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)