जनरल झिया, मुशर्रफ यांच्याविरोधात बंड करणारी रणरागिणी
- शुमाइला जाफरी
- बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचं निधन झालं.
पाकिस्तानमध्ये आसमा जहांगीर यांचं नाव मानवाधिकार चळवळीत सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे या क्षेत्रातील आदरणीय मापदंड म्हणून पाहिलं जातं.
पाकिस्तानमधल्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या त्या माजी अध्यक्ष होत्या. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 66 वर्षांच्या होत्या.
महिला सशक्तीकरणाचा आवाज
असामान्य धैर्य, साहस आणि समाजातील उपेक्षित वर्गाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्याची तयारी ही आसमा यांच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्यं होती. यामुळंच पाकिस्तानात त्यांच्याकडे अनुकरणीय आदर्श म्हणून पाहिलं जात असे.
पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पाकिस्तानातील महिला सशक्तीकरणाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.
फोटो स्रोत, AFP
पाकिस्तानमध्ये मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.
सहकारी वकील आझम तारार यांच्याशी फोनवरून बोलत असताना त्यांना अचानक बरं वाटेनासं झालं. शरीरातल्या तीव्र वेदनेमुळे त्यांच्या हातातून फोन सुटला आणि त्या कोसळल्या. आझम यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.
त्यांच्या ओरडण्याचा आवाज मी ऐकला. त्यांच्या नातवंडांपैकी कोणीतरी आजूबाजूला आहे असं वाटलं. त्यांच्यापैकी कोणीतरी पडलं असं मला वाटलं. पण एकाएकी फोन कट झाला. त्यावेळी आसमा यांनाच काहीतरी झाल्याचं माझ्या लक्षात आलं, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
त्यांना पुन्हा कॉल केला आणि काय झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. 15 मिनिटांनंतर त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका मदतनीसाने आसमा यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं सांगितलं, असं ते म्हणाले.
निधनाने शोककळा
आसमा यांच्या आकस्मिक निधनाने सिव्हिल सोसायटी आणि न्याय क्षेत्रावर शोककळा पसरली. पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राजकीय नेते, मानवाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकारांनी आसमा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
आसमा यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेली मंडळी
"न्याय, लोकशाही आणि मानवाधिकारांची जपणूक यासाठी आसमा यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे," अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि राज्यघटनेची सार्वभौमता राखण्यात आसमा यांनी दिलेलं योगदान मोलाचं आहे. त्या स्वतंत्र बाण्याच्या व्यक्ती होत्या. न्यायदानाच्या सेवेत मेहनत आणि कामाप्रती निष्ठा याद्वारे त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली," असं पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकीब निसार यांनी सांगितलं.
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार
संयुक्त राष्ट्र संघटनेसाठी मानवाधिकार दूत म्हणून आसमा यांनी काम पाहिलं होतं. यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
फोटो स्रोत, Getty Images
न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची जपणूक या कार्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर फ्रान्सतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आसमा यांना गौरवण्यात आलं होतं.
देशातील राजकारण आणि प्रशासनात लष्करी हस्तक्षेपाच्या आसमा कडव्या विरोधक होत्या. झिया उल हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधातील बंडाचं आसमा यांनी नेतृत्व केलं होतं.
2007मध्ये माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तिकार मुहम्मद चौधरी यांना पदावरून दूर करत देशात आणीबाणी घोषित केली होती. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य पूर्ववत राहावं, यासाठी आंदोलन करणाऱ्यांमध्ये आसमा अग्रणी होत्या.
कारकीर्दीत आसमा यांना अनेकदा धमक्या, मारहाण, तुरुंगवास यांना सामोरं जावं लागलं होतं.
1983मध्ये झिया यांच्या कार्यकाळात मानवाधिकारांची पायमल्ली थांबावी आणि नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी काम करताना आसमा यांनी तुरुंगवासही भोगला होता. 2007मध्येही मुशर्रफ यांच्या कालखंडात न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आसमा यांना तुरुंगात जावं लागलं होतं.
मानवाधिकारांसाठी योगदान
पाकिस्तानात मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. आयोगाच्या संस्थापक सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. आयोगाच्या महासचिव आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम पाहिलं.
फोटो स्रोत, Getty Images
आसमा यांनी झिया उल हक आणि परवेझ मुर्शरफ यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं होतं.
'साऊथ एशिया फोरम फॉर ह्यूमन राइट्स'च्या सहअध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या.
अल्पसंख्याक, महिला तसंच लहान मुलांच्या हक्कांसाठी आसमा यांनी आयुष्य वेचलं.
पाकिस्तानातील न्यायाचं विद्यापीठ
आसमा जहांगीर यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी लाहोरमध्ये झाला होता.
लाहोरच्याच कॉन्व्हेंट ऑफ जिझस अँड मेरी महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. कायद्याच्या पुढच्या शिक्षणासाठी आसमा स्वित्झर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेतही गेल्या. लाहोरच्या कायदे आझम लॉ महाविद्यालयात त्या राज्यघटना हा विषय शिकवत असत.
फोटो स्रोत, Getty Images
संयुक्त राष्ट्रांसाठीही आसमा यांनी काम केलं होतं.
आसमा यांनी 'डिव्हाइन सँक्शन? द हदूद ऑर्डिनन्स' (1988) तसंच 'चिल्ड्रन ऑफ अ लेसर गॉड: चाइल्ड प्रिझनर्स ऑफ पाकिस्तान' (1992) या पुस्तकांचं लिखाणही केलं.
सोशल मीडियावरही श्रद्धांजली
आसमा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे समर्थक तसंच विरोधकांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
"मानवाधिकारांचं स्वातंत्र्य आणि अधिकारासाठी आसमा यांनी केलेलं कार्य त्यांचे विरोधकही नाकारू शकणार नाहीत. या कामासाठी पाकिस्तानचे नागरिक त्यांच्याप्रती ऋणी राहतील. लोकशाही तत्वांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे पाकिस्तानातील अनेकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला. त्या सदैव आमच्या स्मरणात राहतील. ना हरा है इश्क ना दुनिया थकी है..." अशा शब्दांत मानवाधिकार कार्यकर्ते जिब्रान नासीर यांनी ट्वीटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
फोटो स्रोत, AFP
आसमा यांना पाकिस्तानच्या नागरिकांसाठी मोलाचं कार्य केलं.
पत्रकार फसी जका लिहितात, "त्यांची ध्येयनिष्ठा अलौकीक अशी होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं."
"आसमा यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. आमच्यासाठी वैयक्तिक आणि देशाचं मोठं नुकसान झालं आहे. त्या अत्यंत धाडसी, निर्भय आणि अविचल होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो," अशा शब्दांत बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर यांनी आसमा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पाकिस्तानातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या 'सितारा-ए-इम्तियाझ' पुरस्काराने आमसा यांना गौरवण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)