आत्मघातकी हल्ल्या करण्यासाठी तिला नटवण्यात आलं

  • व्लादिमिर हर्नांनडेझ आणि स्टिफनी हेगार्ती
  • बीबीसी न्यूज
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ:

फालमताचा मेक-अप केला जात आहे. तिला मेंदी लावण्यात येत आहे. तिचं हेअर स्टाइलिंग केलं जातं आहे. गळा, हात आणि पायाला मेंदी लावण्यात आल्यानंतर ती सुंदर दिसायला लागली. पण हे नटणं सजणं एका खास मोहिमेसाठी होतं.

फालमताला माहीत आहे की तिला या सुंदर दिसण्याची किंमत मोजावी लागणार आहे. ही किंमत आहे तिच्या प्राणांची. एकदा ती तयार झाली तर तिच्या कमरेला 'सुसाइड बाँब' लावला जाणार आहे.

बोको हरामच्या कचाट्यात अडकलेल्या शेकडो मुलींपैकी ती एक होती. आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यासाठी या मुलींचा वापर केला जातो. फालमता त्यांच्या तावडीतून सही सलामत सुटली.

बोको हरामच्या बंडखोरांनी तिला पकडल्यानंतर तिच्यासोबत काय झालं? याची हकीकत तिनं बीबीसीला सांगितली.

फालमता 13 वर्षांची होती. नायजेरिया आणि कॅमेरुनच्या सीमेवर असलेल्या गावात ती आपल्या नातेवाईकाच्या घराकडे जात होती. त्यावेळी दोन तरुणांनी तिचं अपहरण केलं.

तिला एका छावणीमध्ये ठेवण्यात आलं. तिच्यासोबत इतर नऊ मुली होत्या. "सुरुवातीला मला तिथून पळून जावंसं वाटलं पण मला कळलं की माझ्यासमोर आता पर्याय नाही. त्या छावणीच्या आजूबाजूला खूप सारे बंदूकधारी पहारा देत असत. त्यामुळं तिनं पळून जायचा विचार सोडला," तिनं सांगितलं.

त्यांनी तिला पर्याय दिला, एकतर आमच्यापैकी कुणाशी तरी लग्न कर किंवा 'मिशन'वर जा. तिनं लग्नाला नकार दिला.

तिला त्यावेळी माहीत नव्हतं की हे 'मिशन' काय आहे?

फालमता सांगते, "छावणीची स्थिती खूप भीतीदायक होती. तिथं सर्वांचा छळ केला जायचा. आम्हाला अशी भीती वाटायची की नायजेरियन सैनिक इथं आले तर ते आमची सुटका करणार नाहीत. उलट आम्हाला हल्लेखोरांच्या पत्नी समजून आमच्यावर हल्ला करतील, अशी भीती सतावत होती."

छावणीतलं जीवन खूप एकसुरी होतं. सकाळी उठणं, प्रार्थना करणं, खाणं-पिणं, पुन्हा प्रार्थना करणं असंच होतं. दिवसभर आम्ही कुराणचं पठण करायचो.

एके दिवशी तिला सांगण्यात आलं तुझी एका महत्त्वपूर्ण कामासाठी निवड करण्यात आली आहे. तिला मेंदी लावण्यात आली. तिला वाटलं आपलं लग्न लावून दिलं जात आहे.

फालमता सांगते, "अल्लाला न माणणाऱ्या लोकांना मारलं तर मी थेट स्वर्गात जाऊ शकेन, असं तिथल्या लोकांनी मला सांगितलं होतं."

तिच्या कमरेला बाँब बांधण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी जाऊन याचं बटण दाबलं तर तू स्वर्गात जाशील असं तिला वारंवार सांगण्यात आलं होतं.

तिच्यासोबत दोन मुलींनाही या मिशनवर पाठवण्यात आलं. हे मिशन आपण अर्धवट सोडून देऊ, असं त्यांनी ठरवलं. फालमताने त्या ठिकाणाहून पळ काढला. तिला एक माणूस भेटला त्याला तिनं मदत मागितली. तो माणूसही बोको हरामचाच निघाला. त्याने तिला त्याच्यासोबत नेलं. तिचं दुसऱ्यांदा अपहरण झालं होतं.

हिंसेचा इतिहास

पहिली महिला सुसाइड बाँबर (आत्मघातकी हल्लेखोर) म्हणून सना मेहयदाली हीच नाव घेतलं जात. 1985मध्ये लेबनॉन येथे तिनं इस्राईलच्या दोन सैनिकांना ठार केलं होतं. तेव्हापासून महिलांचा सुसाइड बाँबर म्हणून वापर करण्यात आला आहे.

"नायजेरिया, कॅमेरुन, नायगर या ठिकाणी गेल्या काही वर्षांत अनेक महिलांचा सुसाइड बॉम्बर म्हणून वापर करण्यात आला आहे. 2017मध्ये 232 आत्मघातकी हल्ले घडवण्यात आले. त्यामध्ये 1225 नागरिक ठार झाले. बंडखोरांनी 454 महिलांचा या कामासाठी वापर केला. त्यापैकी एक तृतियांश महिला या अल्पवयीन होत्या," असं एलिझाबेथ पिअर्सन यांनी म्हटलं आहे. पिअर्सन यांनी बोको हरामवर संशोधन केलं आहे.

फातिमा अकिलू या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या नीम फाउंडेशनसाठी काम करतात. बोको हराममुळे नकारात्मक परिणाम झालेल्या लोकांना समुपदेशन करण्याचं काम नीम फाउंडेशनकडून केलं जातं.

फोटो कॅप्शन,

कॅम्पमध्ये कुराण शिकवलं जायचं

"बोको हराममध्ये काम करणारे बंडखोर हे त्यांच्या विचारधारेने प्रभावित झालेले असतात. जर हे काम करताना तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही थेट स्वर्गात जाल असं त्यांना सांगितलं जातं, यावर बहुतांश लोकांचा विश्वास असतो," असं त्या सांगतात.

"नायजेरियन लष्कराने कारवाई करणं तीव्र केल्यानंतर बोको हराममध्ये जाणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली. त्यामुळं त्यांनी लोकांचं अपहरण करण्यास सुरुवात केली. त्या लोकांचा आत्मघातकी हल्ल्यासाठी वापर केला जाऊ लागला. सात ते आठ वर्षांच्या मुलींचाही वापर या कामासाठी त्यांनी केला होता," असं त्या सांगतात.

फालमताची सुटका

फालमताने ज्या माणसाची मदत मागितली तो माणूसही बोको हरामचा बंडखोर होता. त्याने तिचं अपहरण केलं आणि दुसऱ्या छावणीमध्ये नेलं. तिथलं आयुष्यही पहिल्या सारखंच होतं.

"तिथं त्यांना कुराण शिकवलं जातं. या महिला अशिक्षित असतात. त्या पहिल्यांदाच कुराणबद्दल शिकतात. बऱ्याच जणांचा या शिकवणीवर विश्वास बसतो. बोको हरामचे बंडखोर कुराणचं शिक्षण संदर्भाशिवाय आणि मोजकंच देतात. इतर वेळी ते बोको हरामची विचारधारा या महिलांवर बिंबवतात," असं अकिलू यांनी म्हटलं.

फालमता या छावणीत दोन महिने राहिली. तिच्यासमोर पुन्हा तेच दोन पर्याय देण्यात आले. लग्न की मिशन. तिनं यावेळीही लग्नाला नकार दिला. तिला पुन्हा नटवण्यात आलं. यावेळी मात्र ती हुशारीने वागली. ती बाजारात गेली नाही तर जंगलात गेली.

तिला माहीत होतं की यावेळी जर आपण पकडलो गेलो तर आपल्याला ठार केलं जाईल.

फोटो कॅप्शन,

तिनं शेतकऱ्यांकडे मदत मागितलं

ती पळत राहिली. एका शेतात पोहोचली. तिनं शेतकऱ्यांकडे मदत मागितली. सुरुवातीला त्यांना तिची भीती वाटली. तिनं सांगितलं 'माझ्या कमरेला बॉम्बचा पट्टा आहे. तो तुम्ही काढा.' त्यांना वाटलं तिचा हा कट असावा पण नंतर त्यांना तिची दया आली आणि त्यांनी तो बाँबचा पट्टा काढला.

ती तिथून निघाली. तिला शिकाऱ्यांचा एक ग्रुप भेटला. काही दिवस ती त्यांच्यासोबत राहिली. तिने त्यांना सांगितलं की तिला मैदुगिरीला जायचं आहे. त्यांच्यासोबत जात असताना बोको हरामच्या बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते शिकारी मारले गेले. काय करावं हे तिच्या लक्षात आलं नाही. ती तिथून पळून जंगलात गेली.

काही दिवस ती उपाशी राहिली. त्यानंतर एका गावात ती पोहोचली. तिनं एका शेतकरी कुटुंबाला मदत मागितली. त्यांनी तिला जेवू-खाऊ घातलं आणि तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. अनेक दिवसानंतर ती तिच्या घरी पोहोचली होती.

"सुटकेनंतर या मुलींकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. एखाद्या मुलीनं जर बोको हरामच्या कँपमध्ये वेळ घालवला तर तिला बोको हरामचा सदस्यच समजतात. अशा मुलींना पुन्हा आपल्यात सामावून घ्यायचं की नाही अशी भीती लोकांना वाटते," असं अकिलू सांगतात.

"मला वाटतं ते त्यांच्याकडं एक मुलगी म्हणून पाहिलं जात नाही तर त्यांच्या कृतीकडे पाहिलं जातं. पण त्यांच्याकडे तसं पाहण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या पीडिता आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आलं होतं त्यांच्यावर अत्याचार झाले त्यातून त्या वाचले आहेत. त्यांना तसं वागवणं योग्य नाही," असं अकिलू सांगतात.

आता फालतमा आपल्या कुटुंबीयासोबत राहते.

'तुझ्या कमरेला बाँब होता. त्याचं बटण तुला का दाबावं वाटलं नाही?' असं तिला विचारण्यात आलं.

तेव्हा ती म्हणते, "मला जगावं वाटलं. कुणाला ठार करणं योग्य नाही. असं मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं आहे आणि मलाही तसंच वाटतं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)