गूढ लिफाफा उघडल्यानंतर ट्रंप यांची सून रुग्णालयात

अमेरिका, ट्रंप. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा आणि सून

संदिग्ध लिफाफा उघडल्यानंतर सावधानतेचा उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सून वनेसा ट्रंप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांच्या मते या या गूढ पाकिटाला पांढऱ्या रंगाची पावडर लागली होती.

हे पाकीट ट्रंप ज्युनियर यांच्या मॅनहटन येथील पत्त्यावर पाठवण्यात आलं होतं.

वनेसा ट्रंप आणि उपस्थित दोन जणांनी हे पाकीट उघडून पाहिलं. अग्निशमन दलाने या तिघांना रुग्णालयात नेलं.

या पाकीटातील पावडर धोकादायक नसल्याचं याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यूयॉर्क पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या पावडरमुळे वनेसा यांना कोणताही शारीरिक त्रास झाला नसल्याचंही तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या घटनेनंतर तीन जणांना वील कॉर्नेल मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्रंप ज्युनियर आणि वनेसा यांचं 2005 मध्ये लग्न झालं.

सीबीएस न्यूयॉर्कच्या बातमीनुसार वनेसा यांच्या आईने हे पत्र घेतलं तर वनेसा यांनी उघडून पाहिलं.

वनेसा आणि ट्रंप ज्युनियर यांचं 2005मध्ये लग्न झालं. त्यांना पाच मुलं आहेत. लग्नाआधी वनेसा मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होत्या.

ट्रंप यांच्या मुलाला अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसतर्फे सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते. या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिस या संदिग्ध पाकिटाची चौकशी करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)