दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झुमा आणि गुप्ता यांच्यातील कनेक्शन काय?

गुप्ता Image copyright Gallo Image
प्रतिमा मथळा गुप्ता कुटुंबीय

दक्षिण आफ्रिकेच्या एलिट पोलीस युनिटनं वादग्रस्त गुप्ता कुटुंबावर धाड टाकली आहे. सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यां यांच्यातील संगनमताच्या संदर्भातील प्रकरणावरून ही कारवाई झाली आहे.

मूळ भारतीय वंशाचे असलेल्या गुप्ता कुटुंबीयांवर राजकीय प्रभावाचा वापर करून भ्रष्टाचार केल्याचे आरोप अनेक दिवसांपासून होत आहेत.

अटक झालेल्या लोकांमध्ये गुप्तांच्या एका भावाचा समावेश आहे. तर आणखी एक व्यक्ती शरण येणार असल्याचं, पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी संगनमत करून स्वत:चा फायदा करून घेतल्याचा आरोप गुप्ता कुटुंबीयांवर आहे. तर गुप्ता कुटुंबीयांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

गुप्ता कुटुंबीयांच्या जोहान्सबर्ग कंपांउंडमध्ये गुप्तांचा शोध घेतला जात होता. या गोष्टीला Hawks या दक्षिण आफ्रिकेचं गुन्हे अन्वेषण विभागानं दुजोरा दिला आहे.

या विभागाने गुप्तांच्या इतर मालमत्तांवरसुद्धा छापे टाकले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 'व्रेडे फार्म' भ्रष्टाचार प्रकरणात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. व्रेडे इथं एस्टिना डेअरी हा प्रकल्प गरिबांना मदत करण्यासाठी सुरू झाला होता. पण या प्रकल्पात गुप्ता कुटुंबीयांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा संशय आहे.

राष्ट्राध्यक्ष झुमा दबावाखाली का आहेत?

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले झुमा 2009पासून सत्तेवर आहेत. त्यांच्यावर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

डिसेंबरमध्ये सिरिल रांफोसा यांनी पक्षाची सूत्रे झुमा यांच्याकडून स्वतःकडे घेतली आहेत. पण झुमा यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 75 वर्षीय झुमा पुढच्या तीन ते सहा महिन्यात पायउतार होण्यास तयार आहेत. पण पक्षनेतृत्व त्यांना ताबडतोब पायउतार होण्यास सांगत आहेत.

गुप्ता कुटुंबीय कोण आहेत?

गुप्ता कुटुंबीयांचे दक्षिण आफ्रिकेत काँप्युटर, खाणकाम, हवाई प्रवास, उर्जा, तंत्रज्ञान आणि माध्यम अशा अनेक क्षेत्रांत उद्योगधंदे आहेत.

जेव्हा 1993साली श्वेतवर्णीय सत्तेचा अंत होत असतानाच्या काळात अतुल, राजेश आणि अजय हे तीन भाऊ भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेले होते.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा गुप्ता कुटुंबियांचं जोहान्सबर्ग कंपाऊंडमध्ये आज पोलिसांनी छापे घातले

राष्ट्राध्यक्ष झुमा यांचे ते मित्र आहेत.

दक्षिण आफ्रिकेत राजकीय प्रभावाचा गैरवापर करून त्याचा व्यापारात फायदा करून घेतला आहे, असा त्यांच्यावर आरोप होत आहे.

राष्ट्राध्यक्ष आणि या परिवाराचा काय घोटाळा आहे?

माजी उपपंतप्रधान मॅकबिसी जोनास यांनी 2016 साली गुप्ता कुटुंबीयांवर आरोप केले होते. काही लिलाव त्यांच्या फायद्यासाठी घडवून आणले तर अर्थमंत्री करण्याचा आणि 600 मिलियन रँड (3 अब्ज रुपये) देण्याचा प्रस्ताव गुप्ता कुटुंबीयांनी दिला होता, असा आरोप जोनास यांनी केला होता.

या प्रकरणी 2017 साली या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रभावाचा कसा वापर केला, हे सांगणारे एक लाख इमेल्स समोर आल्याने तर लोकांचा रोषात आणखीत भर पडली आहे.

यातून शासकीय करार, मनी लाँडरिंग, आणि दलाली याचं हे दुष्टचक्र असल्याचं सांगितलं जातं आहे.

या सगळ्या घटनाक्रमामुळे झुमा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध निदर्शनं सुरू झाली आणि झुमा यांना 'झुप्ता' असं संबोधलं जाऊ लागलं.

हेही पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : का हवा लोकांना जेकब झुमा यांचा राजीनामा?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)