फ्लोरिडा : 17 जणांचा बळी घेणाऱ्या निकोलस क्रूझची पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : फ्लोरिडा गोळीबाराप्रकरणी कोर्टात हजर झालेला निकोलस क्रूझ

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एका शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबार करून 17 जणांचा बळी घेणारा निकोलस क्रूझ या अल्पवयीन आरोपीने कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

19 वर्षीय निकोलस क्रूझ फ्लोरिडाच्या पार्कलँड परिसरातल्या याच शाळेचा माजी विद्यार्थी असून, त्याला शाळेतून काढण्यात आलं होतं.

गुरुवारी त्याने शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करताच गोळीबारास सुरुवात केली आणि त्याचं पिस्तूल काढून घेईपर्यंत त्यानं गोळीबार सुरूच ठेवला होता, असं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

शुक्रवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि 17 जणांच्या पूर्वनियोजित हत्येचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. क्रूझबद्दल गेल्या वर्षी काही माहिती हाती लागल्याचं FBIने यावेळी स्पष्ट केलं.

Image copyright MICHELE EVE SANDBERG
प्रतिमा मथळा विद्यार्थ्यांनी शाळेतून सुखरूप बाहेर पडल्यावर प्रथम आपल्या पालकांना फोन लावले.

गुरुवारी झालेला हा हल्ला 2012नंतरचा अमेरिकेतला शाळेत झालेला हा मोठा हल्ला मानला जात आहे.

क्रूझनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं की, "मी माझ्या जवळच्या काळ्या बॅगमध्ये गोळ्यांचा अतिरिक्त साठा करून ठेवला होता."

कोण आहे आरोपी क्रूझ?

क्रूझ याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. तसंच हा एक दिवस शाळेवर गोळीबार करेल, असा विनोद काही विद्यार्थ्यांनी त्याच्यावर केला.

क्रूझ हा बंदुकींचा शौकीन आहे, असं त्याच्या शाळेतला माजी विद्यार्थी चॅड यानं सांगितलं. त्याचा शस्त्रांमधला रस त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर दिसून आला होता.

सध्या डिलीट करण्यात आलेल्या त्याच्या दोन इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे बंदुका आणि सुरे-चाकू घेतलेले फोटो होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शाळेतील काही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

तसंच कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार क्रूझनं हत्याकांडासाठी वापरलेलं शस्त्र नंतर गायब करण्याचा आणि घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता.

घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर क्रूझ प्रथम वॉलमार्ट आणि नंतर मॅकडॉनल्डच्या दालनात शिरला होता. मात्र या घटनेनंतर एका तासात त्याला पोलिसांनी एका ठिकाणी अटक केली.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा आपल्या पालकांशी भेटल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते लिंडसे वॉल्टर्स यांनी या हल्ल्याचा निषेध केला. "फ्लोरिडा राज्यातील शाळेत झालेल्या या दुर्देवी घटनेची राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना कल्पना देण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. पीडितांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली.

2013 पासून अमेरिकेत शाळेत गोळीबाराची 291 प्रकरणं समोर आली आहेत. दुसऱ्या शब्दांत, दर आठवड्याला एखाद्या शाळेत गोळीबाराचं प्रकरण घडतं, असं आकडेवारी दर्शवते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)