'आम्हाला मरू द्या!' कोणकोणत्या देशांत आहे इच्छामरणाचा कायदा?

इच्छामरण

फोटो स्रोत, digicomphoto

इच्छामरणाच्या हक्कासाठी गेली अनेक वर्षं संघर्ष करणारं मुंबईतलं वृद्ध दांपत्य नारायण (87) आणि इरावती (77) लवाटे यांनी आता टोकाचं पाऊल उचललं आहे.

इरावती लवाटे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहत इशारा दिला आहे की, "31 मार्चपर्यंत सरकारने आम्हाला मरणाची परवानगी दिली नाही तर तुम्ही (पती नारायण) माझा गळा दाबून खून करावा. असं झाल्यास तुम्हाला खुनाच्या गुन्ह्यात फाशी होईल आणि दोघांचं जीवन संपून जाईल."

नारायण आणि इरावती हे दांपत्य मुंबईतील गिरगावच्या एका चाळीत राहतं. नारायण लवाटे एसटी महामंडळात काम करायचे तर इरावती शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना कुणीही वारसदार नाही. गेली अनेक वर्षं ते इच्छामरणाच्या हक्कासाठी लढत आहेत.

गेली अनेक वर्षं त्यांनी सरकारकडे यासाठी पत्रव्यवहार केला आहे. बीबीसीने त्यांच्या या लढ्याची दखल घेणारी बातमी यापूर्वी प्रसिद्ध केली आहे.

इच्छामरण या विषयावर जशी भारतात चर्चा सुरू आहे, तशीच चर्चा जगभरात सुरू आहे. काही देशांनी या संदर्भात पुढाकार घेत कायदेसुद्धा केले आहेत. विशेषतः ज्यांना असाध्य व्याधी आहेत, अशांना इच्छामरणाचा अधिकार देण्याचे कायदे काही ठिकाणी झाले असल्याचं दिसून येतं.

फोटो कॅप्शन,

नारायण आणि इरावती यांना इच्छामरणासाठी संघर्ष करत आहेत.

अमेरिकेतील काही राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे दिसून येतात.

ऑक्टोबर 2015 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये असाध्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना इच्छामरणाचा हक्क देणारा कायदा करण्यात आला आहे.

या राज्यात ब्रिटानी मायनार्ड यांना कॅन्सर झाला होता. त्यांना इच्छामरणाचा हक्क मिळावा यासाठी 'Right to Die' ही मोहीम सुरू झाली होती. त्यानंतर कॅलिफोर्नियात हा कायदा करण्यात आला.

अमेरिकेतील ओरेगॉन, वॉशिंग्टन, व्हेरमाँट, मोंटाना, न्यू मेक्सिको या राज्यांत या स्वरूपाचा कायदा पूर्वीपासूनच आहे.

फोटो स्रोत, KatarzynaBialasiewicz

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तर जून 2016मध्ये कॅनडामध्ये असाध्य व्याधी असलेल्यांना इच्छामरण देण्याचा कायदा करण्यात आला आहे. 'Medically assisted death for terminally ill people' असं या कायद्याचं नाव आहे.

अशाच प्रकारचा कायदा अस्तित्वात असलेल्या देशांमध्ये स्वित्झर्लंड, नेदरलँड, अल्बानिया, कोलंबिया, बेल्जियम आणि जपान या देशांचाही समावेश आहे.

स्वित्झर्लंडमध्ये assisted suicide, म्हणजे मदत घेऊन केलेल्या आत्महत्येला परवानगी आहे, जर मदत करणाऱ्या व्यक्तीचा त्यात काही स्वार्थ नसेल.

नुकताच नोव्हेंबर 2017मध्ये ऑस्ट्रेलियातल्या व्हिक्टोरिया राज्यात असाध्य आजारग्रस्त लोकांना इच्छामरण देण्याचा अधिकार देणारा कायदा मंजूर करण्यात आला आहे.

नेदरलँड्समध्ये जर एखादी व्यक्ती खूपच असाध्य आजाराने ग्रस्त असेल आणि दुःखात असेल तर तिला इच्छामरणाची परवानगी मिळते. त्यासाठी त्यांचं वय 16 ते 18 असायला हवं. आणि त्यांच्या पालकांची परवानगी असणं आवश्यक नसलं तरी त्यांच्याशी शहानिशा केली जाते.

म्हणून या देशात इच्छामरणाचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, पण ते कधी वाढलं नाही. 2010 च्या आकडेवारीनुसार नेदरलँड्समध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 2.8% मृत्यू इच्छामरणाने झाले होते.

2007-08च्या सर्वेक्षणानुसार युकेमध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या 0.21 टक्के होतं तर फ्रांसमध्येही 2009च्या मोजणीनुसार जवळपास तेवढ्याच इच्छामरण पत्करलं. आणि उल्लेखनीय म्हणजे युके आणि फ्रांसमध्ये इच्छामरण अजूनही बेकायदाशीर आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)