पाहा व्हीडिओ: सीरियन सरकारच्या हवाई हल्ल्यांत '77 जणांचा बळी'

व्हीडिओ कॅप्शन,

या व्हीडिओमधली काही दृश्यं विचलित करू शकतात. सोमवारी झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक मुलांनाही वाचवण्यात आलं.

सीरिया सरकारनं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये राजधानी दमास्कसनजीकच्या पूर्व घूटा भागात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं एका संस्थेनं म्हटलं आहे. हा भाग बऱ्याच काळापासून बंडखोरांच्या ताब्यात आहे.

रॉकेट आणि हवाई हल्ल्यांत 77 नागरिक मृत्युमुखी पडले असून त्यात 20 बालकांचा समावेश असल्याचं सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्युमन राईट्स (SOHR)ने सांगितलं आहे.

या हल्ल्यानंतर सीरियन लष्कर आता जमिनीवरून हल्ले करण्यास सज्ज होत असल्याचं म्हटलं जात आहे.

ही परिस्थिती आता हाताबाहेर जात असून हे हल्ले थांबवण्यात यावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्यानं केली आहे.

पूर्व घूटा भागात चार लाख लोक राहतात. 2013 पासून या भागात अराजकता माजली आहे.

राजधानी दमास्कस जवळचं विरोधकांच्या ताब्यात असलेलं हे शेवटचं ठिकाण आहे. या भागाचा ताबा घेण्यासाठी सीरियाचं सैन्य या महिन्याच्या सुरुवातीला सरसावलं होतं. त्याक अनेक नागरिक मारले गेले आणि जखमी झाले होते.

त्यानंतर या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी काही काळासाठी युद्धबंदीची क्वचितच होणारी घोषणाही करण्यात आली होती.

दरम्यान, उत्तर सीरिया भागात तुर्कस्तानविरुद्ध लढणाऱ्या कर्ड सैनिकांना (पूर्व तुर्कस्तान भागात राहणारे इस्लामिक लोक) मदत न करण्याचा इशारा तुर्करस्तानने सीरियन सरकारच्या लष्कराला दिला आहे.

परिस्थिती किती वाईट?

सोमवारी झालेल्या हल्ल्यात SOHR ने दिलेला मृतांचा आकडा स्वतंत्रपणे तपासलेला नाही. युकेमधली ही संस्था हिंसाचाराच्या घटनांवर लक्ष ठेवून असते.

पूर्व घूटा भागातल्याच हमुरिया परिसरातल्या एका व्हीडिओमध्ये उद्धवस्त झालेल्या इमारतींमधून लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचं दिसतं. किमान 20 लोकांचा तिथे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

डिसेंबर महिन्यातच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थानी या भागातील लोकांना अन्न औषधं आदी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून परिस्थिती अतिशय वाईट असल्याचा इशारा दिला होता.

या भागात लोकांना होणारा त्रास संपवणं अत्यावश्यक आहे, असं संयुक्त राष्ट्राचे मानवतावादी कार्यांचे समन्वयक पानोस मुमटझिस यांनी सांगितलं. "अनेक नागरिकांना आपल्या मुलाबाळांसकट तळघरात आणि इतर ठिकाणी आसरा घेण्याशिवाय पर्याय नाही," असं त्यांनी सांगितलं.

रशियाच्या परराष्ट्र मंत्री सेरेगि लारोव्ह म्हणाले की आंतरराष्ट्रीय संस्थांनी या भागातील परिस्थितीचे अवास्तव चित्रण केलं जात आहे.

"संयुक्त राष्ट्र महासंघात पूर्व घूटा आणि इडलिब या भागांतील परिस्थितीचा बोभाटा केला जात आहे," असं वक्तव्य केल्याचं वृत्त रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

सीरियामधील गृहयुद्धाला पुढच्या महिन्यात सात वर्षं पूर्ण होतील. या युद्धात आजवर हजारों लोक मारले गेले आहेत आणि जवळजवळ पन्नास लाख लोक देश सोडून पळून गेले आहेत.

'सगळ्यांत भीषण हल्ला'

परिस्थितीचं विश्लेषण करताना बीबीसीच्या मध्य पूर्व आशियातील प्रतिनिधी लिना सिनजाब सांगतात, "पूर्व घूटा भागात रविवारपासून जे हल्ले झाले आहेत त्यांनी फक्त नागरिकांनाच नव्हे तर त्यांच्या जीवनावश्यक साधनांना धक्का लागला आहे. बेकरी, गोडाऊन असे अनेक ठिकाणं प्रभावित झाल्यानं अन्नपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे."

फोटो स्रोत, Getty Images

"गेल्या सात वर्षांत हा सगळ्यांत भीषण हल्ला होता. मदतकार्य करणारे लोक सांगतात की या भागातील रस्ते सगळ्यांत जास्त प्रभावित झाले आहेत. त्यामुळे मदतीला अनेक अडथळे येतील."

त्या पुढे सांगतात, "वैद्यकीय सोयींनाही फटका बसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तात्पुरतं उभारण्यात आलेले चार हॉस्पिटलही कालच्या हल्ल्यात नष्ट झाले आहेत. आंदोलकांनी दमास्कसवर अनेक प्रकारे हल्ले केले, पण लष्कर जास्त शक्तिशाली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)