लैंगिक छळवणुकीच्या आरोपांनंतर हॉलिवूड निर्माते हार्वी वाईनस्टीन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर!

विनस्टिन Image copyright PA
प्रतिमा मथळा विनस्टिन यांच्यावर छळवणुकीचे अनेक आरोप आहेत.

वादग्रस्त चित्रपट निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्या 'न्यूयॉर्क स्टुडिओ' या कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज केला आहे. गुंतवणुकदार कंपनीला मालमत्ता विकण्यासंबधीच्या चर्चा अयशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी चर्चा संपल्यावर न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरलच्या कार्यालयाने वाईनस्टीन कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. दिवाळखोरी जाहीर करणं हाच एक शेवटचा पर्याय होता, असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे.

वाईनस्टीन यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे अनेक आरोप आहेत. पण संमतीविना लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे.

छळवणुकीचे आरोप

"वाईनस्टीन कंपनी आपली संपत्ती आणि नोकऱ्या टिकवण्यासाठी विक्रीच्या मार्गावर आहे," असं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. "त्या दिशेतल्या आजच्या चर्चा स्वाक्षरी न होताच संपल्या."

कंपनीची उरलीसुरली किंमत वाढवण्यासाठी दिवाळखोरी जाहीर करणं, हाच एक पर्याय होता असंही निवेदनात पुढे म्हटलं आहे.

न्यूयॉर्क स्टुडिओविरुद्धच्या नागरी हक्क खटल्यात वाईनस्टीन यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या महिलांची लैंगिक छळवणूक केली. तसंच त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विनस्टिन कंपनी न्यूयॉर्कमध्ये आहे.

आरोपपत्रात त्यांच्या कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या भावाविरुद्ध आरोप आहेत की त्यांनी परिस्थितीची कल्पना असतानाही त्याबाबात कोणतीही कारवाई केली नाही.

न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल एरिक शिंडरमॅन यांनी पीडितांना नुकसानभरपाई आणि दंडासाठी काही रक्कम मागितली आहे. ती रक्कम किती, हे मात्र कळू शकलं नाही.

वाईनस्टीन यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, हे चौकशीअंती कळेलच असं वाईनस्टीन यांच्या वकिलाचं म्हणणं आहे. त्याच वेळी कंपनीवर असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं संचालक मंडळाचं मत आहे.


वाईनस्टीन कंपनीचे यशस्वी चित्रपट

  • Django Unchained (2012) ($162.8m) (1054 कोटी रुपये)
  • The King's Speech (2010) ($138.8m) (899 कोटी)
  • Silver Linings Playbook (2012) ($132.1m) (855 कोटी रुपये)
  • Inglourious Basterds (2009) ($120.5m) (780 कोटी रुपये)
  • The Butler (2013) ($116.6m) (754 कोटी रुपये)

गेल्या वर्षी न्यूयॉर्क टाईम्सने हार्वी वाईनस्टीन यांच्याकडून अनेक वर्षांपासून होत असलेल्या लैंगिक अत्याचारांचे आरोप करणारी बातमी छापली होती. त्यानंतर त्यांच्यावरचे अनेक आरोप गेल्या ऑक्टोबरमध्ये जगासमोर आले.

त्यानंतर 50 पेक्षा अधिक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक हिंसाचार, बलात्कार, छळासारखे अनेक आरोप केले. त्यात हॉलिवुडच्या अनेक सेलेब्रिटीजचाही समावेश होता.

या आरोपांनंतर संचालक मंडळाने त्यांची हकालपट्टी केली होती.

यूके आणि अमेरिकेचे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांच्यावर अजून कोणत्याही प्रकारचं आरोपपत्र दाखल झालेलं नाही.

एकेकाळी हॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींपैकी एक असलेले वाईनस्टीन यांनी आपल्या अशा वागण्यामुळे अनेकांना त्रास झाल्याचं कबूल केलं आहे. मात्र त्यांनी काही आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कारही केला आहे.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)