#RealityCheck | पाकिस्तानने खरंच चिनी भाषेला अधिकृत दर्जा दिलाय का?

एका परिषदेदरम्यान चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एका परिषदेदरम्यान चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी

पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात चीनचा प्रभाव वाढत चालला आहे. तो कितपत खरा आणि खोलवर आहे, याचा हा #RealityCheck.

दावा : पाकिस्तानाच चिनी भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला आहे.

रिअॅलिटी चेक पाहणी: नाही. चिनी भाषेचे अभ्यासक्रम पाकिस्तानात शिकवण्यात यावेत, अशा शिफारशीचा ठराव पाकिस्तानच्या संसदेने पारित केला. मात्र पाकिस्तानात चिनी भाषेला अधिकृत दर्जा देण्याचा कोणताही मनसुबा नाही.

चिनी भाषेला पाकिस्तानला अधिकृत दर्जा दिल्याचं वृत्त पाकिस्तानच्या 'अब तक' उर्दू वृत्तवाहिनीने दिलं होतं. ब्रेकिंग न्यूज सांगत त्यांनी ही बातमी दिली होती.

पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 19 फेब्रुवारीला पारित झालेल्या ठरावाचा संदर्भ 'अब तक'ने दिला होता.

पाकिस्तानच्या संसदेने सभागृहात ठराव पारित केला खरा, मात्र त्याचा संदर्भ वेगळा होता. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरशी (सीपेक) संलग्न असलेल्या व्यक्तींनी चिनी भाषेचं शिक्षण घेण्याची शिफारस संसदेनं केली होती. जेणेकरून प्रकल्पाशी निगडीत व्यक्तींना एकमेकांशी बोलताना तसंच कागदोपत्री व्यवहार करताना अडचण येऊ नये.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत चीनने पाकिस्तानमध्ये विविध पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीसाठी 6.2 कोटी डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली आहे.

फेक न्यूज

भाषा शिकण्यासाठीची शिफारस आणि चीन भाषा अधिकृत करण्याचा प्रस्ताव, या दोन गोष्टींमधल्या गोंधळाला भारतातील ANI वृत्तसंस्था, इंडिया टुडे आणि फायनॅन्शियल एक्स्प्रेस सारखी प्रसारमाध्यमं बळी पडली. पाकिस्तान आणि चीनदरम्यान वाढणारी जवळीक, अशा आशयाचं वृत्तांकन भारतीय प्रसारमाध्यमांनी यावर केलं.

एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत यांनीही 'अब तक'चं खोट्या बातमीचं ट्वीट रिट्वीट केलं. ही बातमी मग इतकी पसरली की अखेर पाकिस्तान संसदेला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावं लागलं.

Image copyright FAROOQ NAEEM/Getty Images
प्रतिमा मथळा चीनने पाकिस्तानातील पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे.

नंतर ही बातमी प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय प्रसारमाध्यमांना घटनेतली मेख लक्षात आली आणि त्यांनी चूक कबुल केली आणि आपल्या बातम्या मागे घेतल्या.

या फेक न्यूजची प्रतिक्रिया चीनमध्येही उमटली. शांघाय अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या ह्यू झियोंग यांनी ही बातमी म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असं मत व्यक्त केलं.

अधिकृत भाषा

उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे. मात्र व्यावहारिक कारणांसाठी इंग्रजी भाषेचा अधिकृत भाषा म्हणून उपयोग केला जातो. बहुतांश सरकारी मंत्रालयं इंग्रजीचा वापर करतात आणि देशातल्या सधन वर्गाची संवादाची भाषा इंग्रजीच आहे.

पाकिस्तानात अनेक स्थानिक भाषा बोलल्या जातात. पंजाबी भाषा सर्वाधिक म्हणजे 48 टक्के लोक बोलतात मात्र तरीही पंजाबी अधिकृत भाषा नाही.

आठ ठक्के लोक, तेही शहरी भागात उर्दू बोलतात.

अस्तंगत होत जाणाऱ्या स्थानिक भाषांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी भाष्यकारांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे.

देशातील सर्व प्रमुख भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित कराव्या या मागणीसाठी अनेक राजकीय पक्ष आणि साहित्यिक संघटनांनी 22 फेब्रुवारीला मोर्चा काढला होता.

वाढता प्रभाव

आपली बातमी मागे घेताना 'आऊटलुक' मॅगझीनने म्हटलं की "प्रथमदर्शनी ही फेक न्यूज लोकांना विश्वासार्ह वाटली. याला कारणीभूत आहे पाकिस्तान आणि चीनमधली वाढती जवळीक."

Image copyright AAMIR QURESHI/Getty Images
प्रतिमा मथळा चीन-पाकिस्तान स्पेशल इकॉनॉमिक कॉरिडॉर

CPEC प्रकल्प हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्या कल्पनेतील महत्त्वाकांक्षी 'वन बेल्ट वन रोड' (OBOR) योजनेचा भाग आहे. याअंतर्गत चीनतर्फे पाकिस्तानात हायवे उभारले जात आहेत. वीजप्रकल्पांची निर्मिती केली जात आहे. पाकिस्तानात अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्र तयार केली जात आहेत.

चीनची हजारो माणसं या प्रकल्पांच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत. चीनच्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच चिनी भाषेतील नाटक पाहायला मिळालं तसंच चिनी भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्रं पाकिस्तानमध्ये पाहायला मिळालं.

इस्लामाबादहून प्रकाशित होणाऱ्या 'हौशांग' वृत्तपत्राने सांगितलं की पाकिस्तान आणि चीनमधल्या वाढत्या मैत्रीला प्रोत्साहन देण्यासाठीच त्यांनी प्रकाशन सुरू केलं आहे.

दोन्ही देशांतील व्यक्ती मिळून 24 तासांचं 'दोस्ती' रेडिओ चॅनेल चालवतात. या वाहिनीवर चिनी भाषा शिकवणारा 'Learn Chinese' एक तासाचा कार्यक्रम असतो.

सांस्कृतिक फरक

चीन आणि पाकिस्तानमधले संबंध वाढते असले तरी चीनच्या अशा आक्रमणासमोर स्थानिक संस्कृती आणि उद्योगधंद्यांचं संवर्धन व्हावं, असा सूर उमटतो आहे.

CPEC प्रकल्पामुळे पाकिस्तानच्या संस्कृतीला वेगळं वळण मिळू शकतं, असं मत एका इंग्रजी दैनिकात व्यक्त करण्यात आलं आहे.

चीनला पाकिस्तानमध्ये इतकं स्वारस्य का, यावर विश्लेषण करणारा एक लेख 'द न्यूज' दैनिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात जसं भारत इस्ट इंडिया कंपनीचा गुलाम झाला, तसा पाकिस्तान चीनच्या हातातलं बाहुलं तर बनत नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Image copyright Empics
प्रतिमा मथळा बीबीसी रिअॅलिटी चेक

हे वाचलंत का?

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)