जेव्हा घरमालक घरभाड्यासाठी लैंगिक शोषण करतात...

मी हे करायला तयार नव्हते.
प्रतिमा मथळा मी हे करायला तयार नव्हते.

"मी फक्त भाड्याऐवजी सेक्सची मागणी केली."

"शुक्रवारची संध्याकाळ होती. मी मध्य लंडनमध्ये एका 25 वर्षांच्या मुलासमोर बसले होते. तो मला पूर्व लंडनमध्ये असलेली त्याची बेडरूम शेअर करण्याची ऑफर देत होता. कोणतंही भाडं न घेता. एवढी उदारता कशासाठी? त्याची एकच अट : मला माझ्या डोक्यावर छप्पर पाहिजे असेल तर त्याच्याबरोबर नियमित शारीरिक संबंध ठेवावे लागले लागतील.

UK मध्ये 'Rent for Sex' या अगदी नव्या संकल्पनेचा कितपत प्रसार झालेला आहे, हे जाणण्यासाठी मी ओळख लपवून BBC Three साठी एक डॉक्युमेंटरी करायचं ठरवलं. मला जाणून घ्यायचं होतं की खरंच किती घरमालक लैंगिक संबंधांच्या बदल्यात अगदी मोफत राहण्याची ऑफर देतात.

मी ज्या माणसाशी बोलत होते त्याला मी सांगितलेलं की मी 24 वर्षांची नर्सिंगची विद्यार्थिनी आहे, जिला सध्या कुठलेही 'पर्याय' उपलब्ध नाही.

प्रतिमा मथळा एली फ्लीन एका घरमालकाला भेटून अशा व्यथित झाल्या

तो लंडनमध्ये एक घर काही जणांबरोबर शेअर करतो आणि म्हणाला की त्याच्यासोबत राहणाऱ्यांना माझी काही अडचण होणार नाही, कारण मी त्याची गर्लफ्रेंड बनून त्याच्यासोबत राहू शकते.

मी हे करायला तयार नव्हते. तो मला मग समजावण्याचा प्रयत्न करतो की कसा सेक्सच्या बदल्यात "आश्रय देणाऱ्या म्हाताऱ्यांपेक्षा" तो जास्त 'चांगला पर्याय' ठरू शकतो.

"खरंच मज्जा येईल, ट्रस्ट मी," तो म्हणतो.

अशी माणसं अशा ऑफर्स

सेक्सची मागणी करणारा तो एकटाच नव्हता. काही लोकप्रिय वेबसाइट्सवर लॉग-इन केल्यावर मला कळलं की 'विशिष्ट सोयींच्या' बदल्यात अशा अनेक खोल्या उपलब्ध आहेत.

अशा जाहिराती संपूर्ण यूकेमधून येत असतात. अगदी ब्राईटनपासून एडिनबर्रापर्यंतच्या मोठ्या शहरात आणि छोट्या शहरातसुद्धा हे प्रकार आढळतात. मी एकेक करून या जाहिरातींना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

लगेच मला अगदी उघडपणे लैंगिक संबंधाची मागणी करणारे मेसेज येऊ लागले. एका घरमालकानं लगेचच माझ्या शरीरबांधणीविषयी विचारलं, माझ्या ब्राचा साईज विचारला. आणखी एक म्हणाला, "तुला हे पटेपर्यंत आपण व्हॉटसअॅपवर चॅट करू शकतो."

प्रतिमा मथळा अनेक बेघर लोक नाईलाजामुळे हे सगळं करायला तयार असतात.

मी अनेक घरमालकांना भेटले. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं बघून मी स्तंभित झाले. त्यातला एक 24 वर्षांचा होता तर दुसरा कुणी त्याच्या मुलीचं बेडरूम भाड्याने द्यायला तयार होता. कारण ती विद्यापीठात शिकायला गेलेली. एका मालक म्हणाला की जर मी त्याच्याबरोबर सेक्स करायला तयार असेल तर एका लाकडी खोलीत मला रहायला देईल.

मी भेटलेल्यांपैकी अनेक घरमालक एकटेच राहत होते, एक जण मित्रांबरोबर राहत होता, आणि एक तो होता जो त्याच्या मित्रांना मी त्याची गर्लफ्रेंड आहे हे सांगायला तयार होता.

24 वर्षांच्या ज्या घरमालकाला मी भेटले त्याला रोज किंवा एक-दोन दिवसांआड सेक्सची अपेक्षा होती. त्याने मला स्पष्टही केलं की सेक्समधला भावभावनांचा भाग काढून तो याकडे केवळ एक व्यवहार म्हणून बघतो आहे.

या लोकांना भेटताना मी स्वत:ला एक अडचणीत असलेली तरुण मुलगी आहे, असंच दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे पैसा नाही आणि मला कुठेही जायला जागा नाही, असंही मी त्यांना सांगितलं. मला आश्चर्य वाटलं की कसं घर भाड्यानं देण्याच्या बदल्यात सेक्सची मागणी करताना या घरमालकांना काहीच वावगं वाटत नाही. त्यांनी असं विचारल्यावर मला काय वाटेल, याचा त्यांनी एक क्षणही विचार केला नाही.

अनेक घरमालकांना ते काहीतरी चूक करत आहेत, असं वाटलंच नाही. पण Rent for Sex च्या त्या जाहिराती बेकायदेशीर आहे. भाड्याऐवजी सेक्ससाठी खोली देणे हे वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिल्यासारखं आहे. इंग्लंडमध्ये यासाठी सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

कारणांची मालिका

आमच्या भेटीनंतर मी हे सगळं खरं का करत आहे, ते सांगितलं, आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. फक्त दोघांनीच त्यावर प्रतिक्रिया दिली. एकाने परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवण्यास इच्छुक होतो, असं सांगितलं होतं. एकाने सांगितलं की त्याचा उद्देश निष्पाप होता आणि तो मला फक्त त्याच्या काऊचवर बसू देण्यासाठी चार्ज करत होता.

पण या जाहिरातींना खरंच प्रतिसाद देणाऱ्या लोकांकडे एक तर पैसा नसतो, भोळे असतात किंवा त्यांच्याकडे जायला कुठेही जागा नसते.

मी एका तरुण मुलीला भेटले आणि ती अवघी वीस वर्षांची असताना ती या व्यवस्थेचा भाग बनली. तिला आधी या सगळ्या व्यवस्थेची कल्पना नव्हती. ती या घरात आली आणि आपल्या घरामालकाबरोबर बेड शेअर करणार असल्याचं तिला कळलं. तिनं घरमालकाला हे सगळं कऱण्यास नकार दिला.

पण तो तिला कायम स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. "त्यानं माझ्याबरोबर कधीच जबरदस्ती केली नाही, याबद्दल मी त्याची आभारी आहे," असं ती सांगत होती.

त्याला भेटण्याच्या आधी ती बेघर होती. पण बेघर होण्याच्या भीतीनं ती त्या घरमालकाबरोबर बराच काळ राहिली. मी जेव्हा घरमालकाला याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की "ती माझ्याबरोबर राहिली, याचा अर्थ ती नाखूश नव्हती."

आपण कधीही सेक्सची मागणी केली नसल्याचा दावा त्यानं केला.

न्यू कॅसलमधल्या अशाच एका घरमालकाला मी जाब विचारला. आधी तर आम्ही भेटलो त्या कॅफेतून तो बाहेरच निघून गेला. पण नंतर तो बोलायला तयार झाला आणि परत आला. त्यानं मला सांगितलं की तो फक्त सेक्स नाही तर एका जोडीदाराच्या शोधात होता.

त्याने मला सांगितलं की आपण काही चूक करतोय, असं त्याला कधी वाटलंच नाही. जेव्हा आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की हे म्हणजे सेक्स करण्यासाठी भाग पाडल्यासारखं आहे. आपल्याला रहायला घर नाही या भावनेतूनसुद्धा ती हे करू शकते, असं मी त्याला सांगितलं. तो म्हणाला की संमतीची ही पुसट रेषा आहे.

एवढंच नाही तर पुढे अशी सोय तो पुन्हा कधी बघणार नाही, असंही त्यानं मला सांगितलं.

कमी लोकांना चुकीची जाणीव

मी ज्या घरमालकांना भेटले त्यांना आपण काही चुकीचं करतोय याची जाणीव झाली नसल्याचं मला लक्षात आलं.

"आपल्या समाजात शक्तिशाली लोकांनी दुर्बळांचं शोषण करणं हे अगदी सामान्य मानलं जातं. त्याबद्दल कोणतेही प्रश्न विचारले जात नाही," असं अकॉर्न या भाडेकरू आणि दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी लढणाऱ्या एलॉन मोरॅन यांनी सांगितलं.

"अशा शक्तींकडे आणि कृतींकडेसुद्धा कायदा करणारे दुर्लक्ष करतात. कधी लोक आयुष्यात एकटे असतात. त्यांना शारीरिक सुखाची इच्छा असते पण ते कसं मिळवावं हे त्यांना माहिती नसतं. कधी कधी या दोन गोष्टींची सरमिसळ झालेली असते."

तिची संस्था आता भाड्याऐवजी सेक्स या संकल्पनेला शक्यतो आधुनिक गुलामगिरीच्या कायद्याखाली बेकायदेशीर ठरवण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे घरमालकांना शिक्षा होण्याची शक्यता आहे.

"हा एक गुन्हा आहे, असं प्रशासनाला कळायला हवं आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी," असं मोरॅन यांनी सांगितलं.

"ही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एक मोठा बदल हवा."

हेही वाचलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा नृत्य : जगातले सर्वांत सेक्सी नृत्य

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)