पुतिन यांना ‘अपराजित’ क्षेपणास्त्राची का गरज पडली?

पुतिन Image copyright AFP

रशियानं त्यांच्या शस्त्रागारात काही नवी क्षेपणास्त्र दाखल झाल्याचं म्हटलं आहे. लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून हे क्षेपणास्त्र अपराजित असल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला आहे.

पुतिन हे चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ आल्या असून पुढच्या 17 दिवसांच्या कालावधीत त्या पुन्हा पुतिनच जिंकण्याची शक्यता आहे.

पुतिन यांनी काही नव्या शस्त्रांची घोषणा केली, त्यात या क्रूझ मिसाईलचाही समावेश असून हे क्षेपणास्त्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतं असा दावा पुतिन यांनी केला आहे.

रशियानं जारी केलेल्या व्हीडिओची झलक तुम्ही खालील व्हीडिओमध्ये पाहू शकता.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
President Putin introduced video of a missile launch

"या गोष्टीची पाश्चिमात्य देशांनी दखल घेण्याची आवश्यकता असून त्यांनी हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. तसंच आमचा दावा खोटा आहे असं वाटण्याची चूक त्यांनी करू नये," असा सूचक इशारा पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे.

राष्ट्राला उद्देशून करण्यात येणाऱ्या वार्षिक भाषणात पुतिन बोलत होते. यावेळी त्यांनी एका व्हीडिओमार्फत या दोन क्षेपणास्त्रांच्या सध्याच्या प्रगतीबद्दलची माहिती दिली. ही क्षेपणास्त्रं भेदली जाऊ शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

ही क्षेपणास्त्र कशी काम करतील याचा एक अॅनिमेटेड व्हीडिओ सादर करण्यात आला. या व्हीडिओतील एका दृश्यात ही क्षेपणास्त्रं अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यावर कोसळत असल्याचे दाखवण्यात आलं आहे.

हे क्षेपणास्त्र अपराजित कशामुळं ठरेल याची माहिती पुतिन यांनी आपल्या भाषणात दिली. "हे क्षेपणास्त्र अद्ययावत आहे, लांब पल्ल्याचं आहे आणि या क्षेपणास्त्राचा मारा कसा होत आहे याचा अंदाज घेणं रडारला सुद्धा शक्य नाही. सध्या अस्तित्वात असलेली आणि भविष्यात निर्माण होऊ शकणारी कुठलीच प्रणाली या आधुनिक प्रणालीसमोर टिकणार नाही," असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

Image copyright Reuters

अमेरिकेनं तयार केलेल्या क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीच्या प्रत्युत्तरात रशियानं ही नवी प्रणाली तयार केली आहे. असं पुतिन यांनी आपल्या दोन तासांच्या भाषणात म्हटलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते.

पुतिन यांच्या या भाषणानंतर अमेरिकेनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "रशियानं आपल्या अॅनिमेटेड व्हीडिओमध्ये अमेरिकेवर हल्ला होताना दाखवलं आहे. ही बाब दुर्दैवी आहे. एखाद्या जबाबदार राष्ट्रानं अशी कृती करणं अयोग्य आहे," असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे.

पुतिन यांचा दावा किती खरा?

"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात अमेरिकेची सुरक्षा वाढवण्यासंदर्भातले अनेक दावे केले आहेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणूनच रशियानं आपली संरक्षण व्यवस्था बळकट आणि आधुनिक करण्याचा दावा केला आहे," असं बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी जोनाथन मार्कस यांनी म्हटलं आहे.

Image copyright Reuters

क्षेपणास्त्राचा मारा झाल्यावर त्याला निकामी करण्यासाठी आपल्याकडे आधुनिक प्रणाली असल्याचा दावा अमेरिकेनं केला. या प्रणालीला ठोस उत्तर देईल अशी नवी प्रणाली आम्ही विकसित करत आहोत, असं रशियानं म्हटलं आहे.

रशियातलं सध्याचं राजकीय चित्र काय आहे?

पुतिन यांना 18 मार्च रोजी 7 जणांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आव्हान दिलं आहे. त्यापैकी कुणालाही विशेष जनाधार मिळेल असं दिसत नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांनी एकत्र येत चर्चा केली, पण पुतिन यांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही.

Image copyright AFP

विरोधी पक्ष नेते अलेक्झाई नव्हालनी यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकांवर बहिष्कार टाका असं आवाहन त्यांनी केलं आहे.

परत आपण सत्तेमध्ये येऊ, असा विश्वास पुतिन यांना वाटत आहे. त्यामुळे ते फारसा प्रचार करताना दिसत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)