पाहा व्हीडिओ : पाकिस्तानच्या या भुयारात का पुरल्या जात आहेत कुराणाच्या लाखो प्रती?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : पवित्र कुराणच्या जीर्ण झालेल्या प्रती जबल-ए-उल-नूर-कुराण या ठिकाणी ठेवल्या जातात.

मुस्लिमांचा धर्मग्रंथ पवित्र कुराण जर जुना झाला तर त्याचं काय करायचं, हा पाकिस्तानमध्ये संवेदनशील विषय आहे.

कुराण जीर्ण झालं तरी ते फेकून देऊ नये अशी मुस्लिमांची धारणा आहे. पण जीर्ण झालेल्या प्रती ठेवायच्या कुठे? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी एका संस्थेनी पुढाकार घेऊन जीर्ण कुराणाच्या प्रतींचा प्रश्न मार्गी लावला आहे.

पाकिस्तानमधील क्वेटा शहराबाहेर असलेल्या डोंगर रांगांमध्ये कुराणाच्या जुन्या प्रती पुरल्या जातात. या डोगरांना जबल-ए-नूर-उल-कुराण म्हणतात. याचा अर्थ आहे, 'प्रकाशाचा डोंगर'.

या ठिकाणी खूप जुन्या प्रती पुरल्या जातात. काही प्रती या 600 वर्षांहून अधिक जुन्या असाव्यात असं इथल्या व्यवस्थापकांचं म्हणणं आहे.

प्रतिमा मथळा जीर्ण झालेल्या प्रती जबल-ए-नूर-उल-कुराण या ठिकाणी आणून ठेवल्या जातात.

"माझ्या भावाची पवित्र कुराणावर फार श्रद्धा होती. कुणाचं कुराण जुनं झालं तर तो ते घेऊन येत असे आणि त्याचे जतन करून ठेवत असे. त्याच्याकडे अशा अनेक प्रती जमा झाल्या. त्याचे मित्र देखील त्याची या कामी मदत करत असत," असं जबल-ए-नूर-उल-कुराणचे व्यवस्थापक अब्दुल रशीद लेहरी सांगतात. "त्याच्यासोबतच मी देखील हे काम करू लागलो," असं ते सांगतात.

प्रतिमा मथळा जबल-ए-उल-नूर-कुराणचे व्यवस्थापक अब्दुल रशीद लेहरी

"आमच्याकडे कुराणांच्या प्रतींचे रोज अनेक गठ्ठे येतात. आम्ही त्यांची वर्गवारी करतो. काही प्रतींची स्थिती बऱ्यापैकी असते त्यांना आम्ही दुरुस्त करतो आणि पुन्हा लोकांना देतो. ज्या प्रती खूप जीर्ण झाल्या आहेत त्या आम्ही भुयारात एका पिशव्यांमध्ये ठेवतो," असं येथील कर्मचारी अब्दुल कुद्दुस सांगतात.

"सध्या या भुयाराची लांबी 3 किमी आहे. रोज अनेक कुराणांच्या प्रती या ठिकाणी येतात. रोज थोडं-थोडं भुयार खोदून ग्रंथांसाठी जागा तयार केली जाते. जीर्ण झालेल्या कुराणांच्या प्रती आमच्याकडे पाठवा असं आवाहन आम्ही पाकिस्तानमधील लोकांना करतो. त्यामुळे आमच्याकडे रोज अनेक प्रती येतात," असं कुद्दुस सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)