सज्ज व्हा! पुढच्या काही वर्षांत मृत्युदर झपाट्याने वाढणार आहे!

मृत्यू, आरोग्य, आरोग्यव्यवस्था Image copyright suman bhaumik/Getty Images
प्रतिमा मथळा हृदयविकार आणि कर्करोग या आजारांचा वाढता धोका आहे.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचं आयुर्मान वाढलं आहे. मृत्यू लांबवणीवर टाकण्यात आपल्याला यश आलं आहे हे खरं, मात्र येत्या काही वर्षांत मृत्यूचं प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढणार आहे आणि म्हणूनच मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तींची काळजी कशी घ्यायची हे मोठं आव्हान येणाऱ्या काळात असणार आहे.

विसाव्या शतकापूर्वी पेनिसिलीन या औषधाचा शोध लागला नव्हता. मात्र या औषधाच्या शोधानंतर जगण्याचं प्रमाण वाढलं. आता तर वैयक्तिक जीन्सचा अभ्यास करून औषधांची परिणामकता वाढवण्यासाठी जीनोमिक औषधांचा वापर वाढला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून सरासरी आयुर्मान वाढलं.

शतकभरात वैद्यकीय आणि शास्त्रीय क्षेत्रातील संशोधनामुळे विकसित देशांत आयुर्मान 30 वर्षं इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलं. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये पुरुषांमध्ये सरासरी आयुर्मान 79 तर महिलांमध्ये 83 इतकं झालं आहे.

पूर्वी मृत्यू आकस्मिकपणे ओढवत असे. साथीच्या संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यूला सामोरं जावं लागणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. आता साथीच्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी औषधं तयार झाली आहेत.

केवळ साथीच्या रोगांवरच नाही तर अनेक दुर्धर आजारांवर औषधोपचार शोधून काढल्यामुळे आर्युमान वाढत आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करणारी माणसंही अनेक वर्षं जगतात, पण दुसरीकडे इतर काही साधे वाटणारे आजार मृत्यूला कारण ठरत आहेत.

इंग्लंडमध्ये विस्मरण (डिमेन्शिया) हा आजार बऱ्याच प्रमाणात दिसू लागला आहे आणि अनेकांच्या मृत्यूचं कारणही बनत आहे.

मृत्यूला दूर लोटून आपण जास्तीत जास्त जगत आहोत, हे खरं. मात्र आगामी काळात निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी आपण किती तयार आहोत? येत्या काळात मृत्युदर वाढणार आहे. अन्य कशापेक्षाही हेच आव्हान मानवप्रजातीसमोर आहे.

मृत्यू लांबला तरी तो अटळ आहे आणि इंग्लंडमध्ये आता त्याचंच प्रमाण वाढणार आहे कारण वयोवृद्धांचं प्रमाण लोकसंख्येत वाढत आहे.

इंग्लंडमध्ये सध्या दरवर्षी पाच लाख माणसांचा मृत्यू होतो. पुढच्या 20 वर्षांत हे प्रमाण वीस टक्क्यांनी वाढणार आहे. जगभरात मृत्यूदर वाढण्याची लक्षणं आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात हे नमूद करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, 2015 मध्ये मृत्यूचं प्रमाण 5 कोटी 60 लाख होतं. 2030 मध्ये हे प्रमाण वाढून 7 कोटी एवढं होणार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विज्ञानाच्या आधुनिकीकरणानंतरही येत्या काही वर्षात मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे.

हृदयविकार आणि कर्करोग यासारख्या बिगरसाथीच्या मात्र दुर्धर आजारांमुळे मृत्युदर वाढणार आहे.

बहुतांशी माणसांना आयुष्याच्या शेवटच्या वर्षांमध्ये बहुविध आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मरणापूर्वी विविध अवयव असहकार पुकारून त्यांचं शरीर जर्जर होण्याची भीती आहे. हेच खडतर आव्हान मानवप्रजातीसमोर असणार आहे.

सुखाच्या मृत्यूसाठी

मृत्युपंथाला लागलेल्यांचं उर्वरित आयुष्य सुकर कसं करता येईल? मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींची शिस्तबद्ध आरोग्य यंत्रणेद्वारे काळजी घेतली जाते. जेणेकरून त्यांचे शेवटचे दिवस सुखात जातील, याला पॅलिएटिव्ह केअर असं नाव आहे.

असाध्य आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांची किंवा मरणपंथाला लागलेल्या वृद्धांची काळजी कशी घेता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आणि यंत्रणा उभारण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर क्षेत्रातील तज्ज्ञ, परिचारिक, समाज सेवक, कौन्सेलर आणि इतर तज्ज्ञ एकत्र येत आहेत.

त्यांच्या अभ्यासानुसार येणाऱ्या काळात जेव्हा मृत्यूंची संख्या वाढणार आहे तेव्हा, शेवटच्या दिवसात असह्य वेदना, अन्नावरची वासना उडणे, मळमळ, श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणं वाढण्याची शक्यता आहे. अनेकांसाठी या शेवटच्या दिवसांत मानसिक, सामाजिक वेदना अधिक बळावू शकतात.

पॅलिटिव्ह केअरमुळे शेवटच्या दिवसांतील जीवनमान उंचावू शकतं. वर उल्लेखलेले शारीरिक त्रास आणि मानसिक वेदना या पॅलिएटिव्ह केअरमुळे कमी होतात, असं अभ्यास सांगतो. या पद्धतीमुळे रुग्णालयात मृत्युची वाट पाहणाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते.

इतर सर्व उपचार थकले आणि माणूस मरणपंथाला लागला की, पॅलिएटिव्ह केअरचा उपचार सुरू होत असे. पण आता अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की, पॅलिएवटिव्ह केअरचा वापर इतर वैद्यकीय उपचारांच्या जोडीनं लवकर सुरू केला तर त्याचा उपयोग जास्त चांगला होऊ शकतो.

जगभरात जवळपास 20 लाख लोकांना आयुष्याच्या शेवटी पॅलिएटिव्ह केअरचा वापर करावा लागतो. अधिक श्रीमंत अशा विकसित देशांतमध्ये या उपचारांचं प्रमाण दहात आठ एवढं मोठं आहे. या देशांमध्ये आयुष्याच्या शेवटीसुद्धा सर्वोत्तम उपचार मिळण्याची शक्यता अधिक असते, असं डेटा सांगतो.

पण युगांडा, मंगोलिया, पनामा यांसारख्या तुलनेनं गरीब देशांतही पॅलिएटिव्ह केअरचा वापर वाढत आहे. त्यासाठी सार्वजनिक मोहिमा, राष्ट्रीय कार्यक्रम आणि पॅलिएटिव्ह केअरचा प्रचार करणारं तगडं नेतृत्व हे कारणीभूत आहे.

हे महत्त्वाचं आहे, कारण मध्यम आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये प्रत्येक 10 माणसांमधल्या 8 जणांना पॅलिएटिव्ह केअरची गरज असते, असं मानलं जातं.


पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पिस म्हणजे काय?

आधुनिक जगातली हॉस्पिस म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या काळातले उपचार देणारं रुग्णालयांची मोहीम सुरू झाली 1967मध्ये आणि डेम सेसली साँडर्स हे याचे जनक मानले जातात.

इतर वैद्यकीय उपचारांबरोबरच पॅलिएटिव्ह केअर सुरू केली तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतो.

लोकांच्या आयुष्याचा दर्जा आणि आयुर्मान या पॅलेएटिव्ह केअरमुळे वाढू शकतं.

केवळ कॅन्सरसाठीच नव्हे तर कुठल्याही असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिस असू शकतं.

हॉस्पिसमध्ये माणसं मरण्यासाठीच येतात असं नाही. अनेकांना इथून डिस्चार्ज मिळून घरातच त्यांचा सुखांत होऊ शकतो.

पॅलिएटिव्ह केअरमधील तज्ज्ञ हॉस्पिटल, केअर होम आणि रुग्णांच्या घरांमध्येही उपचार देऊ शकतात.


आता खरं आव्हान सुरू होत आहे. कारण वर उल्लेखल्या प्रमाणे मृत्यूंचं प्रमाण वाढतं आहे. मृत्युपंथाला लागलेल्या अधिकाधिक जणांना पॅलिएटिव्ह केअरची गरज लागणार आहे. ही गरज कशी भागवणार हा खरा प्रश्न आहे. उदाहरणार्थ ओपिऑइड नावाच्या वेदनाशामकांचा वापर हा मरण सुकर करण्याचा चांगला मार्ग मानला जातो.

मॉर्फिनसारख्या वेदनाशामकांची किंमत तुलनेनं कमी आहे. पण याचा गैरवापर करण्याच्या भीतीमुळे मॉर्फिनच्या वापरावर कायदेशीर बंधनं आहेत.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालात अभ्यास केलेल्या 80 देशांपैकी केवळ 33 देशांमद्ये ओपिऑइड औषधं सहजपणे उपलब्ध आहेत. पण आता परिस्थिती बदलत आहे.

कोलंबियामध्ये 2014मध्ये ओपिऑइड्सची उपलब्धता वाढावी यासाठी कायद्यात बदल केले गेले. युगांडामध्येही कायद्यांत बदल करून या पेनकिलर्सची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. आयुष्याच्या शेवटी याचा परिणामकारक वापर होऊ शकतो.

Image copyright VikramRaghuvanshi/Getty Images
प्रतिमा मथळा मृत्यूदर कमी करणं हे आरोग्य व्यवस्थेसमोरचं आव्हान आहे.

गरीब देशांमध्ये यापेक्षा मूलभूत आव्हानं आहेत. त्यातलं पहिलं आहे निधीचं. दुर्धर आजारांची लक्षणं ओळखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाला निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अशा आजारांवरच्या उपचारांचा प्रश्न तर सुटणं बाकीच आहे.

अधिक उत्पन्न असणाऱ्या देशांमध्येही संशोधनाला मिळणारं फंडिंग किंवा निधी हा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये एकूण मेडिकल रिसर्च बजेटच्या 0.5 टक्के निधी पॅलिएटिव्ह किंवा शेवटच्या टप्प्यातील आजारांच्या उपचारांवरील संशोधनासाठी देण्यात येतो. खरं तर पॅलिएटिव्ह केअरची मागणी सन 2040 पर्यंत 40 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे निधीची चणचण हा जागतिक प्रश्न आहे.

आयुष्याचा शेवटचा काळ सुखात जावा यासाठीची काळजी हे जगापुढचं आव्हान आहे. जगातलं वृद्धांचं प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे गेल्या काही दशकांत मृत्यूचं स्वरूप बदललं आहे पण तो टळलेला नाही. त्यामुळे ही काळजी महत्त्वाची ठरते आहे.

(लेखिका डॉ. कॅथरिन स्लीमन या किंग्ज कॉलेज लंडनमधल्या सिसली साँडर्स इन्स्टिट्यूटमध्ये पॅलिएटिव्ह मेडिसीन सायंटिस्ट म्हणून काम करतात.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)