इटलीचा फुटबॉलपटू डेव्हिड अॅस्टोरीचं अकस्मात निधन, क्रीडाविश्वात खळबळ

डेव्हिड अस्टरी Image copyright Getty Images

फिओरेंटिनाचा कर्णधार आणि इटलीचा फुटबॉलपटू डेव्हिड अॅस्टोरीचं वयाच्या 31 व्या वर्षी निधन झालं आहे. रविवारी दुपारी एका सामन्यात तो खेळणार होता आणि अचानक त्याच्या निधनाचं वृत्त आलं. त्यामुळे फुटबॉल विश्वास खळबळ उडाली आहे.

अचानक उद्भवलेल्या आजारामुळे डेव्हिडचं निधन झालं आहे, असं तो खेळत असलेल्या क्लबच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे.

फिओरेंटिना क्लबकडून डेव्हिड रविवारी दुपारी सिरी-ए स्पर्धेमध्ये खेळणार होता. पण त्याच्या अकस्मात निधनामुळे सीरी-एचे नियोजित सामने रद्द करण्यात आले आहेत.

डेव्हिड आतापर्यंत 14 वेळा इटलीकडून खेळला आहे. त्यानंतर त्यानं फिओरेंटिना या क्लबकडून खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत 58 सामने तो त्यांच्यासाठी खेळला आहे.

"कर्णधार डेव्हिड अस्टोरीचं अकस्मात निधन झाल्याचं जाहीर करताना फिओरेंटिनाला धक्का बसला आहे," असं फिओरेंटिना क्लबकडून सांगण्यात आलं आहे.

"या भयंकर आणि नाजूक परिस्थितीवेळी आम्ही प्रत्येकाच्या संवेदनशीलतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी डेव्हिडच्या कुटुंबीयांप्रती सांत्वन व्यक्त करू या," असं फिओरेंटिना क्लबनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

डेव्हिडच्या मागे पत्नी आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Image copyright Twitter

जानलुयीजी बुफन यांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली देताना म्हटलं आहे की, "तुझ्या निधनाचं दु:ख तरुण पत्नीला आणि मुलीला सोसावं लागणार आहे. आपला बाप हा एक उत्कृष्ट व्यक्ती होता, हे जाणून घेण्यासाठी तुझी लहानशी मुलगी पात्र आहे. मी पाहिलेल्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी तू एक होतास."

Image copyright Twitter

"आयुष्य मौल्यवान आहे आणि आपण त्यातला प्रत्येक दिवस आनंदानं जगायला हवा. डेव्हिडच्या कुटुंबीयांचं मी याप्रसंगी सांत्वन करतो. तसंच खेळाच्या मैदानावरचा उत्कृष्ट असा विरोधी खेळाडू म्हणून आणि खेळासाठी तू केलेल्या कार्याबद्दल तुला धन्यवाद देऊ इच्छितो. तुझ्या आत्म्याला शांती लाभो," या शब्दांत एसी मिलान क्लबचा माजी खेळाडू क्लेयरेन्स सीडोर्फ यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)