डायबेटिस म्हणजे 5 वेगवेगळे आजार, नव्या संशोधनातून स्पष्ट

  • जेम्स गॅलाघर
  • आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
मधुमेह

फोटो स्रोत, Getty Images

मधुमेहासंदर्भात संशोधकांनी नवा दावा केला आहे. मधुमेह म्हणजे 5 स्वतंत्र आजार असून त्यानुसार उपचार पद्धतीत बदल केले जावेत, असं संशोधकांनी म्हटले आहे.

रक्तातील अनियंत्रित साखर अर्थात डायबेटिसच्या आजाराचे सर्वसाधारणपणे टाईप-1 आणि टाईप-2 असे दोन प्रकार पडतात.

परंतु स्वीडन आणि फिनलॅंड इथल्या संशोधकांना असं वाटतं की, त्यांनी मधुमेहाचं अधिक किचकट रूप शोधलं आहे. त्यातून मधुमेहग्रस्तांसाठी त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक औषधं देता येतील.

तज्ज्ञांचं मत आहे की, हे संशोधन मधुमेहाच्या उपचाराच्या भवितव्यासाठी मूलगामी असं आहे. पण उपचार पद्धतीतील बदल मात्र तातडीने शक्य नाही.

जगभरातील दर 11पैकी एका प्रौढ व्यक्तीला मधुमेह आहे. त्यातून हृदयविकार, अंधत्व, किडनी निकामी होणं आणि पाय कापावा लागणं असे इतर आजार आणि समस्या उद्भवतात.

फोटो स्रोत, Getty Images

टाईप 1 प्रकारचा मधुमेह हा रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे. युनायटेड किंगडममधील 10टक्के लोकांना या प्रकारचा मधुमेह आहे. शरीरातील इन्स्युलिन निर्मितीवर हा मधुमेह हल्ला करतो. त्यामुळे शरीरात इन्स्युलिनचं प्रमाण घटून रक्तातील साखर वाढते.

टाईप 2 प्रकारचा मधुमेह लाईफस्टाईलमुळे होतो. चुकीच्या लाईफस्टाईलमुळे शरीरातील फॅट्स वाढतात आणि इन्सुलिनच्या कार्यपद्धतीवर परिणाम करतात.

स्वीडनमधील लुंथ युनिव्हर्सिटी डायबेटिस सेंटर आणि इन्स्टिट्यूट फॉर मोलेक्युलर मेडिसिन फिनलॅंडम या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासात 14,775 पेशंटचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांच्या रक्तांच्या चाचण्यांच्या विश्लेषणाचाही समावेश आहे.

हा अभ्यास द लान्सेट डायबेटिस अॅंड एंडोक्रोनालॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये पेशंटना 5 गटात विभागता येतं हे दाखवण्यात आले आहे.

गट - 1 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. सध्या प्रचलित असलेल्या टाईप1 प्रकारसारखाच हा गट आहे. तरुण वयात हा आजार होतो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार होतात. इन्स्युलिन तयार करण्याची क्षमता यामध्ये नष्ट होते.

गट - 2 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. या गटातील पेशंटमध्ये तीव्र स्वरूपाचा इन्स्युलिनचा अभाव दिसून येतो. हा आजार सुरुवातीला टाईप 1 सारखाच दिसला. पण नंतर त्याचं वेगळं स्वरूप स्पष्ट झालं. या गटातले पेशंट तरुण होते. शिवाय त्यांचं वजनही योग्य प्रमाणात होतं, पण तरीही त्यांच्यात इन्स्युलिन निर्माण होण्यात अडचणी येत होत्या. पण त्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती जबाबदार नव्हती.

गट - 3 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. या गटातील पेशंट्स सर्वसाधारणपणे स्थूल असतात. त्यांचं वजन जास्त असतं. त्यांच्या शरीरात इन्स्युलिनचं प्रमाण पुरेसं असतं. पण शरीर या इन्स्युलिनला प्रतिसाद देत नाही.

गट - 4 : मध्यम स्वरूपाचा डायबेटिस. स्थूलतेशी संबंधित मधुमेहाचा हा प्रकार आहे. अतिवजन असलेल्या पेशंटमध्ये दिसून येतो. चयापचयाच्या दृष्टीने हा मधुमेह गट 3च्या जवळ जाणारा आहे.

गट - 5 : मध्यम स्वरूपाचा डायबेटिस. वयाशी संबंधित असा हा मधुमेह आहे. या पेशंटमध्ये उतार वयात मधुमेहाची लक्षणं दिसू लागतात. त्यांच्यातील आजार हा मध्यम तीव्रतेचा असतो.

या संशोधकांपैकी एक असलेले प्रा. लीप ग्रूप बीबीसीशी बोलताना म्हणाले, "हे अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे. याचं कारण म्हणजे यामुळे डायबेटिसची उपाचार पद्धती अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे."

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "निदानाच्या पातळीवर याचा वापर झाला तर अधिक अचूक उपचार करता येतील. इतर 2 मध्यम तीव्रतेच्या मधुमेहांपेक्षा उर्वरित 3 तीव्र स्वरूपाच्या मधुमेहांवर अधिक तीव्रतेचा उपचार करणं आवश्यक आहे."

गट 2 मधल्या पेशंटना आता टाईप 2 डायबेटिसचे पेशंट म्हणता येईल.

पण हा अभ्यास असं दाखवतो की, त्यांच्यातील आजार हा स्थूलतेपेक्षा बीटा पेशींतील दोषांमुळे होतो. त्यामुळे त्यांच्यावरची उपचार पद्धती टाईप 2 प्रकारच्या मधुमेहांना दिल्या जाणाऱ्या उपचाराशी जवळ जाणारी हवी, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

गट 2मधील पेशंटना अंधत्वाचा धोका अधिक असतो तर गट 3 मधील पेशंटना किडनीशी संबंधित आजार अधिक होतात.

अधिक अचूक वर्गीकरण

लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील क्लिनिकल सायंटिस्ट डॉ. व्हिक्टोरिया सालेम म्हणाल्या, "टाईप 1 आणि टाईप 2 हे वर्गीकरण अगदी अचूक नाही हे या क्षेत्रातील तज्ज्ञांना माहीत आहे."

त्या म्हणाल्या, "मधुमेहाकडे एक आजार म्हणून आपण कसं पाहतो, या दृष्टीने या अभ्यासाकडे भविष्य म्हणून पाहता येईल."

पण या अभ्यासातून तातडीने काही बदल होईल, याबद्दल त्या साशंक आहेत.

हा अभ्यास स्कॅंडिनेव्हिएन देशांपुरता असून जगभरात मधुमेहाचा धोका वेगवेगळ्या प्रकारचा आहे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः दक्षिण आशियात लोकांमध्ये डायबेटिसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

डॉ. सालेम म्हणाल्या, "जगभरात जनुकीय पातळीवर आणि स्थानिक पर्यावरणाच्या परिणामांमुळे डायबेटिसचे जवळपास 500 उपगट असू शकतील. हा अभ्यास 5 गटांत करण्यात आला असला तरी नंतर वर्गीकरण वाढू शकतं."

वॉरिक मेडिकल स्कूलमधील मेडिसिनचे प्रा. सुदेश कुमार म्हणाले, "अगदी स्पष्ट सांगायचं तर हे पहिलं पाऊल आहे. या गटातील पेशंटना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार दिल्याने चांगले परिणाम दिसतील का, हेसुद्धा समजलं पाहिजे."

फोटो स्रोत, SPL

डायबेटिस यूकेमधील डॉ. इमिली बर्नस म्हणाल्या, "हा आजार समजून घेतल्याने रुग्णनिहाय वैयक्तिक उपचार पद्धती विकसित करणं आणि भविष्यातील मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करणं यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

त्या म्हणाल्या, "विशेष करून टाईप 2 डायबेटिसमधले उपगट शोधून अधिक सविस्तर विश्लेषण करावं लागेल. या प्रकारच्या मधुमेहावर उपचार करण्यासाठी याची आवश्यकता आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)