पुढील महिन्यात किम जोंग-उनची दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांसोबत ऐतिहासिक भेट

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, शांतता प्रक्रिया Image copyright Reuters
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन दक्षिण कोरियाशी संबंध सुधारण्याबाबत प्रयत्नशील आहेत.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे नेते पुढील महिन्यात एक द्वपक्षीय बैठकीत भाग घेतील, असं दक्षिण कोरियाच्या राजदूताने म्हटलं आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची धुरा हाती घेतल्यानंतर गेल्या दहा वर्षांत होणारी ही अशा प्रकारची पहिलीच भेट असणार आहे.

दोन्ही देशांमधले संबंध सलोख्याचे करण्याची आवश्यकता आहे, असं किम जोंग-उन सोमवारी दक्षिण कोरियाच्या एक शिष्टमंडळाशी बोलताना म्हणाले होते.

दक्षिण कोरियाच्या राजदूतानुसार या बैठकीत किम जोंग उन यांनी अण्वस्त्रांचा त्याग करण्याचीही तयारी दर्शविली आहे, जर त्यांच्या देशाच्या सुरक्षेची हमी मिळणार असेल.

क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या ऑलिम्पिकपूर्वी त्यांच्यातील तणाव इतका की दोन्ही देशांनी एकमेकांचा विनाश करण्याची धमकी दिली होती.

मात्र हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्ताने दोन्ही देशातले संबंध सुधारण्याची संधी आली. उत्तर कोरियाचे खेळाडू दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले.

किम यांनी सोमवारी दक्षिण कोरियाच्या एका शिष्टमंडळासाठी मेजवानीचं आयोजन केलं होतं. सिओलहून आलेल्या शिष्टमंडळी बोलताना किम यांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारायला हवेत असं सांगितलं. या दोन देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आता जगाचं लक्ष किम आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांच्या भेटीवर असणार आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर कडक बंदोबस्तात ही ऐतिहासिक भेट आयोजित केली जाणार आहे. दोन्हा देशांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक हॉटलाईन प्रस्थापित करण्याची तयारी दर्शविली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर आणि दक्षिण कोरिया शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली.

दक्षिण कोरियाच्या दहासदस्यीय शिष्टमंडळात गुप्तचर विभागाचे प्रमुख सुह हून आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार च्युंग इयुई योंग यांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्ष मून जेइ इन यांनाही दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत असं वाटतं. दोन्ही देशातील तणाव बाजूला होऊन संबंध नीट व्हावेत, असं च्युंग यांनी पत्रकारांनी सांगितलं.

किम यांनी आमचं चांगलं आदरातिथ्य केलं. अनेक विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं शिष्टमंडळ प्रतिनिधींनी केसीएनए या वृत्तसंस्थेला सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष मून जेई दोन्ही देशांदरम्यानच्या परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात किम यांनी समाधानकारक पावलं उचलली. ही परिषद व्यवहार्य आणि फलदायी ठरावी यासाठी किम यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या.

उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब निशस्त्रीकरणासंदर्भात तसंच अमेरिका आणि दक्षिण कोरियात चर्चा होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

अणुबॉम्ब सोडून देण्याचा प्रस्ताव तूर्तास उत्तर कोरियाने फेटाळला आहे.

च्युंग आणि सुह हे दोघेही या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार आहेत. उत्तर कोरियाशी झालेल्या चर्चेचा तपशील ते अमेरिकेसमोर सादर करतील.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून हे उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात स्थलांतरित झालेल्या दांपत्याचे चिरंजीव. गेल्यावर्षीच त्यांनी देशाची सूत्रं स्वीकारली. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी उत्तर कोरियाशी संवाद वाढवण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)