ग्राउंड रिपोर्ट : अदानींचा कोळसा प्रकल्प ऑस्ट्रेलियात सुरू होण्याआधीच बंद पडणार का?

गौतम अदानी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गौतम अदानी

भारतातील बहुचर्चित व्यापारी गौतम अदानी यांच्या ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित कोळसा उत्खनन प्रकल्पाला मागच्या वर्षी परवानगी मिळाली होती. पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या या प्रकल्पाला विरोध होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्वीन्सलँड इस्टेटमध्ये त्यांची ही प्रस्तावित कर्मिकेल कोळशाची खाण आहे. विरोधकांच्या मते हा प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते आणि त्यातून खूप सारा हरितवायू उत्सर्जित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पण या प्रकल्पामुळे अनेक लोकांना नोकऱ्याही मिळतील, असं या प्रकल्पाच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

मग नेमका वाद काय? ऑस्ट्रेलियातील या स्थितीचा बीबीसीने घेतेलेला आढावा.

कोण आहेत अदानी?

2014 मध्ये नरेंद्र मोदींचं भाजप सरकार केंद्रात येण्याआधी अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी कायम चर्चेत होते. 2014 च्या निवडणुकीच्या आधीसुद्धा नरेंद्र मोदींशी असलेल्या जवळीकीमुळे ते कायम बातम्यांमध्ये असायचे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी अनेकदा अदानींच्या चार्टर्ड प्लेनने प्रवास केला होता. पण भाजपनं त्याबद्दल रीतसर पैसै मोजल्याचं अदानी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. गुजरातमध्ये अदानी गटाचा मोठा व्यवसाय आहे. तिथल्या मुंदरा बंदराचं व्यवस्थापन अदानी ग्रुपतर्फे होतं.

भारतानंतर इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियात अदानींनी आपल्या व्यापाराचा विस्तार केला आहे. पण त्यांच्या या प्रकल्पांपैकी ऑस्ट्रेलियातील कोळसा प्रकल्प वादात सापडला आहे.

आंदोलनाची मालिका

उत्तर क्वीन्सलँड इस्टेटमध्ये ही कार्मिकेल कोळसा खाण आहे. या भागात छोट्या छोट्या टेकड्या आहेत, मोठी शेतं आहेत आणि या शेतांना चित्ताकर्षक नावं आहेत. आणखी लक्ष दिलंत तर वाटेत तुम्हाला काही कांगारूसुद्धा दिसतील. पण माणसं किंवा माणसांची वस्ती दिसत नाही.

मुख्य वाटेपासून काही अंतरावर अदानींविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांचा एक 'गुप्त' गट आहे. अदानी समर्थकांपासून त्रास होऊ नये म्हणून या गटाने आपली ओळख 'गुप्त' ठेवली आहे.

या कँपमध्ये वायफाय ची सुविधा आहे आणि 'Stop Adani' नावाचे टीशर्ट्स घातलेले लोक तंबूत जेवण बनवताना दिसतात.

"आम्ही इथेच पुढची योजना आखतो. देणग्यांवरच आमचं काम होतं. आम्हाला कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा नाही," असं स्कॉट डेयन्स सांगतात. ते 40 आंदोलकांपैकी एक आहे.

"कोळसा जिथे आहे, जमिनीखाली, तो तिथेच रहावा, असं विज्ञान सांगतं. आणि म्हणून त्याचं उत्खनन थांबवण्यासाठी आम्ही इथे आहोत."

जर अदानी एखादी पाश्चिमात्य कंपनी असती, भारतीय कंपनी नसती, तर काय? अनेक अदानी समर्थक असा प्रश्न विचारतात.

"जर ती ऑस्ट्रेलियाची कंपनी असती तर तिला कोणताच धक्का लागला नसता," असं स्कॉट म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचे संसाधन मंत्री मॅथ्यू कॅवान यांनी असाच प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, "इतर देशांसारखंच इथेही एक छोटा समूह आहे ज्याला बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप नकोय."

"मला वाटतं की पर्यावरणाशी निगडीत आंदोलनं हे परदेशी लोकांविरुद्ध भावना भडकवण्यासाठी उभारले जात आहेत. हे दुर्दैवी आहे. हे पर्यावरणाच्या चळवळीसाठी अशोभनीय आहे. पण या लोकांनी ते केलं आहे," असंही ते पुढे म्हणाले.

या ठिकाणाहून जवळच राहतात केन पीटर्स डॉड. ते बिर्री विडी गटाचे वयस्क सदस्य आहेत.

या ठिकाणी झाडं झुडुपं, पर्यावरणाचं संरक्षण करण्यास सांगणारे बॅनर आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचं घर आहे.

मागच्या खोलीत मोठमोठाले बॅनर, लोकांचे पेंटींग्स, जवळच एक लाकडी स्टूल आहे, ज्यावर पेंटचा डबा आणि एक जुना ब्रश आहे.

"आम्ही आमच्या पारंपरिक जागेचं, नदीचं, पाण्याचं, खाणीचं, नुकसान होताना बघितलं आहे," ते सांगत होते.

"या खाणीमुळे भूजल पातळीवर परिणाम होईल. ही पातळी मग भरून निघायला दहा हजार वर्षं लागतील. हा खूप मोठा प्रश्न आहे."

खाणीची जागा नक्की कशी आहे?

आम्ही खाणीजवळ पोहोचलो तेवढ्यात एक कार आमच्याकडे येताना दिसली. ती जवळ येऊन थांबली तेव्हा तिच्यातून एक माणूस बाहेर आला. त्यानं त्याचा मोबाईल कॅमेरा आमच्यावर रोखला आणि आमचे फोटो घेण्यास सुरुवात केली.

आम्ही त्याला त्याची ओळख विचारली तेव्हा तो पळून गेला आणि थोड्या वेळाने परत आला.

हा प्रस्तावित कार्मिकेल कोळसा प्रकल्प म्हणजे एक खूप मोठ्या परिसरावर पसरलेली खुली जागा आहे. आजूबाजूला गायी आणि कधी कधी कांगारूही दिसतात. इतक्या रिकाम्या जागेसाठी संपूर्ण ऑस्ट्रेलियात इतका गोंधळ का निर्माण झाला आहे, असा प्रश्न मला पडला.

प्रतिमा मथळा केन पीटर्स डॉड

1.25 कोटी डॉलरच्या या प्रकल्पातून कोळसा खणणं, एवढंच अदानींपुढे आव्हान नाही. इथून हा कोळसा नेण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणंही एक मोठं आव्हान आहे. आणि त्याहून कठीण काम म्हणजे इथून हा कोळसा 400 किमी दूर असलेल्या बंदरापर्यंत पोहोचवणं, जिथून तो भारत आणि इतर देशांना निर्यात होणार आहे.

कंपनी एक रेल्वे रूळ टाकण्याच्या बेतात आहे, ज्यासाठी शेतजमिनी संपादन करण्यात आल्या आहेत.

प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारे म्हणतात की जर रेल्वे बांधली तर आसपासचे रखडलेले प्रकल्पांना पुन्हा चालना मिळेल. याने आणखी कोळशाचं उत्खनन होईल, त्याची वाहतूक होईल आणि त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल. या खाणीमुळे भूजल प्रदूषित होईल आणि या भागातल्या एकदम शुद्ध अशा समुद्रकिनाऱ्यांचं नुकसान होईल.

"तयार झाल्यावर या रेल्वे लाईनची क्षमता प्रतिवर्ष 100 मिलियन टन असेल. या रेल्वे रुळावर जास्तीत जास्त 3.97 किमी लांबीची आणि 31,964 टन वजनाचं सामान नेऊ शकेल, अशी ट्रेन धावण्यास परवानगी मिळाली आहे," अशी माहिती अदानी ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर आहे.

कोळसा धुण्यासाठी तिथे पाण्याची गरज भासेल.

अदानी काय म्हणतात?

क्वीन्सलँडच्या या मागास भागात हा प्रकल्प अनेक नोकऱ्या निर्माण करेल, असं या प्रकल्पाच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

"कार्मिकेल कोळसा प्रकल्पावर ऑस्ट्रेलियातील आतापर्यंतचे सगळ्यांत जास्त कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 112 मंजुरी मिळाल्या आहेत. या मंजुरी मिळवण्यासाठी 12 वेळा न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांना तीन वेळा आव्हान देण्यात आलं,"असं अदानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

अशा कठोर टीका आणि अडथळ्यांमुळे बँकांकडून अर्थसहाय्य मिळण्यास अडचण झाली. इतकंच काय तर क्वीन्सलँड सरकारनेही कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनी स्वत:चा पैसा गुंतवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पैशाचं तर सोडा, पण सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे अदानींसमोर आणखीच अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लोकांना आता पॅरिस हवामान बदलाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती आहे. भारताचे कोळसा मंत्री पीयूष गोयल म्हणाले की भारताकडे आता पुरेसा कोळसा आहे आणि सध्यातरी कोळसा आयातीची गरज नाही. जागतिक गुंतवणूक गट असलेल्या ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंटच्या मते कोळशाला भविष्य नाही.

पर्यावरणतज्ज्ञ लान्स पेएन यांनी मकाय शहरात आम्हाला कोळशाने भरलेले बॉक्स दाखवले. हे कोळशाचे छोटे तुकडे त्यांना समुद्र किनारी सापडले होते. कोळशानं भरलेले ते बॉक्स दाखवत पेएन सांगतात, "समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी ही सगळ्यांत घाणेरडी गोष्ट आहे."

"मध्य क्वीन्सलँडमध्ये आमच्याकडे बॅरियर रीफ आहे. तिथं एक बाथ टबसारखं तयार झालं आहे. म्हणून तुम्ही तिथे जे समुद्रात फेकता ते तिथेच राहतं. त्याचप्रमाणे कोळशाच्या वेगळ्या बंदरातून कोळसा निघाला तर तो तिथेच राहणार,"असं ते पुढे म्हणाले.

"द ग्रेट बॅरियर रीफची विविधता ही सॅव्हानाइतकीच आहे. भारतात तुम्हाला बंगालचा वाघ दिसतो. हा प्रकार त्यांना ठार मारण्यासारखाच आहे. हे आज होणार नाही, कदाचित उद्याही होणार नाही. पण 2030 पर्यंत जहाजाची होणारी वाहतूक पाहता ही परिस्थिती नक्कीच उद्भवेल."

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अदानींना कर्ज देण्यास नकार

जगातल्या सगळ्यांत मोठ्या आश्चर्यांपैकी एक असलेला ग्रेट बॅरियर रीफ आपल्या विशिष्ट प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.

विश्लेषक विचारतात की जर भारत आणि चीन अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करत असेल, तर अदानी कार्मिकेलमधला कोळसा कुठे जाईल? आणि ज्या प्रकल्पाचं भवितव्य असं अंधारात असेल, अशा प्रकल्पांत गुंतवणूक करण्यात काय अर्थ आहे?

या प्रस्तावित जागेतून निघणारा बहुतांश कोळसा भारतात निर्यात होण्याची शक्यता होती. पण ना अदानींची कंपनी ना या प्रकल्पाचे समर्थक पुढे काय होणार याबद्दल स्पष्ट बोलण्यास तयार नाही.

"अदानींनी हा प्रकल्प करण्याचं ठरवलं आहे आणि यासाठी लागणारा निधीसुद्धा ते नक्कीच उभा करतील," असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. पण हे इतकं विश्वासानं ते कसं सांगत आहे, हे कळायला मार्ग नाही.

ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय संसाधन मंत्री मॅथ्यू कॅनव्हन यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "गॅलिली बेसिन नक्कीच उघडेल, असा मला विश्वास आहे. कारण अशा दर्जाचा कोळसासाठा इतर कुठेही नाही."

"आमचा अदानींवर विश्वास आहे आणि आमच्या देशात आम्ही त्यांचं स्वागत करतो. दोन्ही देशांना त्यामुळे फायदाच होईल, असं मला वाटतं."

पुढे काय?

पण सिडनीमधील उर्जा तज्ज्ञ टीम बकली म्हणाले, "जर अदानींचा हा प्रकल्प यावर्षी पुढे सरकला नाही, तर त्याचं पुढे काही होईल, असं मला वाटत नाही. गॅलिली जसं आहे तसंच राहील. हा अब्जाधीश हे करू शकत नाही, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण त्यांना एखादा प्रकल्प उभा करायचा असेल तर ते कसंही करू शकतात."

प्रतिमा मथळा केंद्रीय संसाधन मंत्री मॅट कॅनवन

टाउन्सविल शहरवासियांना विश्वास आहे की हा प्रकल्प पुढे जाईल. नोकऱ्यांअभावी या शहरात अनेक प्रतिष्ठानं बंद पडली आहेत. म्हणून रोजगाराच्या प्रश्नाने पर्यावरणाची काळजी झाकोळून गेली आहे.

"आम्हाला नोकऱ्या हव्या आहेत, म्हणून आमचा अदानींना पाठिंबा आहे," असं टाउन्सविलमधले एक रहिवासी सांगतात. "मला वाटतं की खाणीचं काम पुढे गेलं पाहिजे, कारण पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आधीच बरेच नियम कायदे आहेत," असं दुसऱ्या एका रहिवाशानं सांगितलं.

क्वीन्सलँडच्या अनेक टॅक्सी ड्रायव्हर आणि रहिवाशांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियातील मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नोकऱ्यांच्या अभावामुळे आमच्या आर्थिक विवंचना कळणार नाही.

अनेकांनी या पर्यावरणवाद्यांचा निषेध केला.

"जे आंदोलन करतात त्यांचे काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण त्यांनी अर्थव्यवस्था आणि कोळशामुळे तयार होणाऱ्या विजेचा मुद्दासुद्धा लक्षात घ्यावा. केवळ अक्षय ऊर्जासारख्या गोष्टींवरच ते अवलंबून राहू शकत नाही. जर त्यांना ऑस्ट्रेलियात कोळसा मिळाला नाही तर त्यांना तो दुसऱ्या बाजारपेठांमधून तो विकत घ्यावा लागेल. पण इथे जे मिळेल तितका तो कोळसा नक्कीच चांगला नसेल," असं टाउन्सविल एन्टरप्राईजेसचे मिशेल मॅकमिलन सांगतात. टाउन्सविल एन्टरप्राईजेस या प्रकल्पाला पाठिंबा देणारा एक लॉबी ग्रुप आहे.

पण किनारपट्टीच्या मकाय शहराचे रहिवाशी आणि Stop Adani प्रकल्पाचे माजी समर्थक क्लेअर जॉन्सटन यांचं मत थोडं वेगळं आहे.

"इतकी मोठी कंपनी चालू ठेवण्यासाठी नैतिकतेचे धडे घ्यावे लागतील, असं मी गौतम अदानींना सांगेन. त्यांनी भारतात आणि एकूणच जगात ज्याप्रकारे गोंधळ घातला आहे तसा गोंधळ ऑस्ट्रेलियात नक्कीच खपवून घेतला जाणार नाही. इथे माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे तुम्हाला हे करू देणार नाही," ते पुढे सांगतात.

"कोळसा एक डायनासोर आहे आणि त्याला जमिनीच्या खालीच ठेवायला हवं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा STOP ADANI

अदानी म्हणतात की, "परदेशी निधीतून चालणारे अनेक कोळसाविरोधी गट या प्रकल्पाच्या वाटेत अडथळे तयार करत आहेत, समाजातल्या अनेकांच्या इच्छेविरुद्ध वागत आहेत."

एक विश्लेषक सांगतात की जेव्हा एखादा प्रकल्प इतका रेंगाळतो तेव्हा कंपनी नक्कीच अन्य पर्यायांचा विचार करते. आणि यावर काहीही निर्णय झाला तरी त्याचे परिणाम भारतात नक्कीच प्रभाव पाडतील, आणि त्यांची नक्कीच चर्चा होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)