पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनिएल यांची ट्रंप यांच्याविरोधात कोर्टात धाव

ट्रंप आणि स्टॉर्मी डेनिएल Image copyright Getty Images

अमेरिकी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

2006 पासून ट्रंप यांचे माझ्याशी लैंगिक संबंध होते, असा गौप्यस्फोट स्टॉर्मी डेनिएल यांनी 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रंप आणि त्यांच्यात करार झाला होता.

डोनाल्ड ट्रंप यांनी 'त्या' करारावर सही न केल्यानं तो वैध राहिला नसल्याचा आरोप स्टॉर्मी डेनिएल यांनी केला आहे. या लैंगिक संबंधाची चर्चा करू नये यासाठी डेनिएल यांना वैयक्तिक पातळीवर 1,30,000 डॉलर्स दिल्याचं ट्रंप यांचे वकील मायकल कोहन यांनी स्पष्ट केलं होतं.

लॉस एंजलिसमधल्या दिवाणी न्यायालयात मंगळवारी स्टॉर्मी डेनिएल यांनी खटला दाखल केला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी डेनिएल आणि कोहन यांनी "गुपचुप करारावर" सह्या केल्या, पण डोनाल्ड ट्रंप यांनी त्यावर सही केली नाही. "त्यामुळे हा करार बेकायदेशीर आहे," असं या खटल्यात त्यांनी म्हटलं आहे.

आपण गप्प राहावं यासाठी ट्रंप यांचे खासगी वकील मायकल कोहन यांनी दमदाटी केल्याची तक्रार सुद्धा डेनिएल यांनी केली आहे.

"डेनिएल यांच्याशी कोहन यांनी वैयक्तिक पातळीवर पैसे देऊन करार केला होता, त्यामुळे त्यांना याविषयी उघडपणे बोलता येणार नाही," अशी बातमी जानेवारी 2017 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रसिद्ध केली होती. दरम्यान, ट्रंप यांनी मात्र आरोपाचं जोरदार खंडन केल्याचं त्यांचे वकील कोहेन यांनी सांगितलं आहे.

Image copyright Getty Images

"ट्रंप यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, म्हणून गप्प राहाण्यासाठी दमदाटी करण्यात आली," असं कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात डेनिएल म्हटलं आहे.

दरम्यान, मायकल कोहन यांनी डेनिएल यांना पैसे दिल्याचं कबुल केलं आहे. पण ते पैसे कशासाठी दिले हे मात्र सांगितलं नाही. ट्रंप किंवा त्यांच्या संस्थेचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं कोहन यांचं म्हणणं आहे.

डेनिएल यांना दिलेला पैसा प्रचारनिधी नसल्याचा किंवा प्रचारनिधीतून दिला नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)