इंग्लिशची परीक्षा पास करा, लग्न फ्री फ्री फ्री...

IELTS Image copyright PUNEET BARNALA/BBC

"आता पहाटेचे चार वाजलेत. थोड्या वेळात उजाडेल, पण आमच्या आयुष्यातला अंधार काही संपायचं नाव घेत नाही."

"माझ्या हातावरती मेंदी अजून ताजी आहे, गावाकडे असते तर कोणी कामाला हातही लावू दिला नसता, पण आत्ता मी इथे एका शेतावर मजुरी करायला आलेय," ऑस्ट्रेलियात राहाणारी मनजीत कौर (नाव बदललं आहे) सांगते.

"ज्या नातेवाईकांच्या भरवशावर आम्ही इथे आलो होतो ते आम्हाला मेलबर्नच्या बाहेर शेताजवळ सोडून गेलेत. गेले सहा तास आम्ही भुकेशी झगडत काम शोधतोय, पण मला आणि माझ्या नवऱ्याला कोणी काम दिलं नाहीये. घरी जायचं म्हटलं तर कसं जायचं तेही आम्हाला कळत नाहीये."

2009 साली ऑस्ट्रेलियात गेलेल्या मनजीत कौरच्या मनावर तिथला पहिला दिवस कोरला गेला आहे. परदेशी राहाण्याची सुखस्वप्न घेऊन ते ऑस्ट्रेलियात आले खरे, पण परिस्थितीनं त्यांना वेगळेच दिवस दाखवले.

"माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते. माझ्या नवऱ्याच्या, हरमनच्या (नाव बदललं आहे) घरचे स्थळ घेऊन आले होते. त्यांनी सांगितलं की, तुम्हाला लग्नाचा काही खर्च करावा लागणार नाही. मुलीच्या परदेशी शिक्षणाचा आणि दोघांच्या परदेशी जाण्याचा खर्च आम्ही करू, मुलीनं फक्त मुलाला स्पाऊज व्हिसावर परदेशी घेऊन जायचं आहे."

Image copyright PUNEET BARNALA/BBC

"नवऱ्या मुलाकडचे इतके उदार झाले होते, कारण मला IELTS (The International English Language Testing System) परीक्षेत चांगले मार्क मिळाले होते. मला व्हिसा पटकन मिळणार होता. आणि हरमनला तीनदा इंग्लंडचा व्हिसा नाकारला होता."

हरमन आणि मनप्रीत कौरचे आतापर्यंत 36 लाख रुपयांहून जास्त पैसे खर्च झाले आहेत.

"मी जमीनदाराची मुलगी आहे, हरमनच्या घरचे पण सुस्थितीत आहेत. घरी नोकरचाकर आहेत आमच्या. पण इथे आम्ही काय करतोय? मोलमजूरी आणि कार धुणं. सलग बारा तास कार धुतल्या की आम्हाला 50 डॉलर मिळतात. सगळा पैसा इथेच खर्च होतो."

हे जोडप गेले अनेक वर्षं ऑस्ट्रेलियात राहूनही त्यांना कायम रहिवासी परवाना मिळालेला नाही. ती दोघं ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर तिथले इमिग्रेशनचे नियम बदलले. मनजीत कौरचे IELTS चे मार्क कायम रहिवासी परवाना मिळण्यासाठी पुरेसं नव्हतं.

"गेल्या 9 वर्षांत मी 6 वेळा IELTSची परीक्षा दिली आहे. इथे राहाता यावं म्हणून वेगवेगळ्या कोर्सला अॅडमिशन घेते आहे. आता तर आम्ही परतही जाऊ शकत नाही. जनावरापेक्षा वाईट आयुष्य जगतो आहोत. कधी कधी वाटतं, परदेशात येण्याचा हा अट्टाहास का केला आपण," मनप्रीत कौरच्या सगळ्या आशा मावळल्या आहेत.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आपली जवळची माणसं, सुखासीन आयुष्य, सगळंच मागे पडल्याची खंत तिच्या डोळ्यात साफ दिसते.

काय आहे IELTS परीक्षा?

IELTS (The International English Language Testing System) ही इंग्लिश भाषेची परीक्षा आहे. ज्या देशांमध्ये इंग्लिश प्रामुख्याने बोलली जाते, त्या देशांमध्ये शिक्षण वा कामानिमित्त जाण्यासाठी ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करणं गरजेचं असतं.

परदेशी जाण्यासाठी सगळं काही पणाला

पंजाब म्हणजे हिरवीगार शेतं, लस्सीचा भलामोठा ग्लास आणि 'सरसो'च्या शेतात वावरणाऱ्या 'सोण्या कुड्या' असं चित्र आपल्या डोक्यात फिट्ट आहे.

थोडी यश चोप्रांची कृपा आणि खरी परिस्थिती जाणून घ्यायचा आपला आळस याला कारणीभूत. आताचं पंजाबचं चित्र बरंच बदललं आहे. आताची तरुण पिढी फक्त दोन गोष्टींमध्ये गुरफटलेलं आहे- एक तर ड्रग्स नाहीतर परदेशी जाण्याचं स्वप्न.

चोप्रांच्या सिनेमातल्या ललना जरी 'घर आजा परदेसी तेरा देस बुलाए रे' अशी हाळी देत असल्या तरी पंजाबातल्या तरुणाला मात्र 'परदेसी' व्हायचीच स्वप्नं पडत आहेत.

नुसती तरुण पिढीच नाही, त्यांच्या आईवडिलांचीही हीच इच्छा आहे. परदेशी जाण्याचं स्वप्न उराशी घेऊन इथले तरुण आणि त्यांचे आईवडील IELTS कोचिंग सेंटरचे आणि व्हिसा कन्सलटन्सीचे उंबरठे झिजवत आहेत.

तर काही परदेशी नोकरी मिळवून देऊ अशी जाहिरात करणाऱ्या संस्थांना भुलून त्यांच्या दाराशी पैशांच्या राशी जमा करत आहेत.

बरं, हे सगळे खूप पैसेवालेही नाही ना. आहे ती थोडी थोडकी जमीन विकून, घर गहाण टाकून परदेशी जाण्यासाठी पैसा जमा केला जातो आहे. एवढं करूनही परदेशी जायची संधी मिळेलच याची खात्री नाही.

Image copyright BBC/PUNEET BARNALA

इथल्या कोणालाच या हिरव्यागार धान्याच्या कोठारात आपलं भविष्य सुखकर असेल असं वाटतं नसेल का?

हरमन-मनप्रीत कौरसारखे अनेक जण भरडले जात असले तरी गेल्या तीन पिढ्यांपासून पंजाबमधल्या तरुणांचं परदेशी जाण्याच आकर्षण कमी झालेलं नाही. काहीही करून पंजाबच्या तरुणाला देश सोडायचा आहे.

ही परीक्षा पास केली तर टळणार वधुपित्याचं संकट

"त्यांनी काहीही म्हटलं तर आपल्याला ऐकून घेणंच आहे. शेवटी आपली मुलीची बाजू. आपणच पडती बाजू घ्याला हवी," अशा आशयाचे संवाद आपल्याला आजही अवतीभवती ऐकू येतात. शिकल्या-सवरलेल्या, नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा यातून सुटल्या नाहीत, तर गावखेड्याल्या मुलींची तर बातच नको.

भारतात आजही मुलींचं लग्न म्हणजे घरांच्यासाठी अग्निपरीक्षाच समजली जाते. तिच्या लग्नावर जो अफाट खर्च होणार असतो, तिच्या जन्मापासूनच तो साठवायला सुरुवात होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल किंवा घरात कोणी कमावणारा पुरुष नसेल तर मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांच्या गळ्याला तात.

या खर्चातून वाचण्यासाठी आणि परदेशात तरी आपली मुलगी 'सुखात' राहिल या आशेवर कित्येक वधूपिता आपल्या मुलींना IELTS परीक्षेला बसवत आहेत. कर्ज काढून, प्रसंगी घरदार विकून त्यांच्या क्लासची फी भरत आहेत.

दुर्दैवानं या सगळ्यांत मुलींच्या शिक्षणाला किंवा त्यांच्या कर्तृत्वला प्राधान्य नाही. त्या कितीही शिकल्या, उत्तम इंग्लिश बोलत असल्या, अगदी परदेशी विद्यापीठात त्यांना प्रवेश जरी मिळाला असला, हे सगळं करण्याचा हेतू एकच. चांगलं स्थळ मिळणं आणि कमी खर्चात मुलगी उजवता येणं.

म्हणजे समजा एखाद्या मुलीला भारतात राहायचं असलं तरी तिच्या मताला किंमत नाहीच.

"पंजाबमध्ये मॅट्रिमोनीअल जाहिराती असतात ना, त्यातही लिहिलेलं असतं, मुलीला IELTS मध्ये अमुक इतके मार्क हवेत. कारण साधं आहे, मुली मुलांपेक्षा जास्त सिन्सिअर असतात. त्या जास्त अभ्यास करतात त्यामुळे त्यांना जास्त मार्क मिळतात. याच मुली पुढे आपल्या नापास नवऱ्यांना स्पाऊज व्हिसावर परदेशी नेऊ शकतात," बीबीसी पंजाबीच्या खुशबू संधू सांगतात.

म्हणजे जितके जास्त मार्क, तितकी लग्नाच्या बाजारातली मुलीची किंमत जास्त! मुलीला लग्न करायचं असेल तर ती नुसती गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष असून चालणार नाही. तिनं इंग्लिशही शिकलं पाहिजे आणि त्याबरोबरीनं उत्तम मार्कही मिळवले पाहिजेत.

'मुलीने या परीक्षेत बाजी मारली तर सगळा खर्च आमचा'

"माझी मुलगी या देशात राहावी असं मला वाटतं नाही. म्हणूनच मी तिला IELTS च्या क्लासला घालणार आहे. ती जास्तीत जास्त मार्क (ज्याला बॅण्डस असंही म्हणतात) मिळवेल मग तिच्या परदेशात जायच्या संधी वाढतील," पंजाबमधल्या एका लहानशा गावात राहाणारे मंगा सिंग सांगतात.

"तिला जितके जास्त मार्क मिळतील, तितकी चांगली स्थळं तिला येतील. मुख्य म्हणजे तिच्या लग्नासाठी मला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही."

प्रतिमा मथळा मंगा सिंग सध्या मुलीला IELTS कोचिंग क्लासला पाठवण्याच्या प्रयत्नात आहेत.

याच्या उलट परिस्थितीही असते कधीकधी. मुलगा हुशार असतो, पण त्याच्याकडे परदेशी जायला पैसे नसतात. अशावेळी श्रीमंत घरातल्या मुलीचं स्थळ येतं. बाकी सगळं सारखंच !

जातीपातीपेक्षा स्कोर महत्त्वाचा

लग्न करायचं म्हटलं की, जातीचीच असं मानणारा समाज आपला. त्याला पंजाब तरी कसा अपवाद असेल? जातीबाहेर लग्न केलं म्हणून ऑनर किलिंग सारख्या घटना आजही घडतात.

पण या IELTS परीक्षेनं तिथल्या लग्नाच्या बाजाराची सारी समीकरणं बदलली. आता चांगला IELTS स्कोर असणारा मुलगा किंवा मुलगी आपल्याच जातीत सापडण्याची काय गॅरेन्टी? म्हणून ज्यांना IELTS चांगले मार्क मिळाले आहेत त्यांच्या जातीकडे दुर्लक्ष करून पंजाबात लग्न ठरत आहेत.

कोचिंग क्लासेस बनलेत लग्नाचे मध्यस्थ

पंजाबातल्या 'लग्न जुळवणे' या उद्योगाचा चेहरा-मोहराच या परीक्षेनं बदलून टाकला आहे. पूर्वी स्थळं घेऊन मध्यस्थ जायचे, आता IELTS कोचिंग क्लासेस स्थळ सुचवतात.

IELTS च्या कोचिंग क्लासला येणारी 90 टक्के मुलं-मुली लग्नाळू असतात. त्यांना (त्यांच्या आईवडिलांना खरंतर) जोडीदारही ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होणारा हवा असतो. मग अशी स्थळ शोधायला कोचिंग क्लासपेक्षा उत्तम जागा कोणती? पंजाबमधल्या समस्त मध्यस्तांना घरी बसवण्याचा विडाच जणू या क्लासेसनी उचलला आहे.

Image copyright SUKHCHARAN PREET/BBC

भोला सिंग विर्क व्हिसा कन्सलटिंग आणि IELTS कोचिंग केंद्र चालवतात. "आमच्याकडे अनेक मुलंमुली आणि त्यांचे आईवडील सल्ला मागायला येत असतात."

"बऱ्याचदा असं लक्षात येतं की कोणाकडे परदेशी जायला पैसे नाहीयेत तर कोणाकडे आवश्यक तेवढे मार्क. मग दोन्ही बाजूंच्या संमतीनं आम्ही त्यांची भेट घालून देतो. पुढे काय करायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. पण बऱ्याचदा अशा भेटींमधून लग्न ठरतात," ते पुढे सांगतात.

पैसा नाही, भविष्य नाही मग इथे थांबून करायचं काय?

"मी BA करायला पहिल्यांदा पंजाब विद्यापीठाच्या इंग्लिश विभागात पाऊल टाकलं, तेव्हापासून ऐकतेय, 'इंग्लिश शिकणं म्हणजे तुम्हा मुलींसाठी लग्नाचा पासपोर्टच.' किंवा या विभागातल्या बहुतांश मुली लग्न करून कॅनडाला जातात. म्हणजे, एखाद्या मुलीला स्वतःसाठी शिकायचंय असेल तर त्याला महत्त्व नाही का," पंजाब विद्यापीठात इंग्लिशच्या अभ्यासक आणि प्राध्यापक असणाऱ्या अमनदीप कौर विचारतात.

"माझ्या नातेवाईकांमध्ये चर्चा असते, मुलगी इंग्लिश शिकली आहे ना, मग तिला कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या स्थळाकडून नक्कीच मागणी येईल. इंग्लिश येणाऱ्या मुलीने कसं लग्न करून परदेशी जावं. त्याच्यातच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे," अमनदीप कौर पुढे सांगतात.

"मी माझ्या आसपास हेच चित्र पाहाते. मुलं सतत परदेशी जाण्याच्या गोष्टी करत असतात. माझा विद्यार्थी बलविंदर सिंग. त्याला काहीही करून परदेशी जायचं आहे. शेतीचं काम किंवा अजून कुठलं पारंपारिक काम करण्यात काही राम राहिला नाही आहे. आणि मला ते करायचंही नाही असं तो ठामपणे सांगतो. या मुलांना आपल्या देशात काहीच भविष्य दिसत नाही."

Image copyright SUKHCHARAN PREET/BBC

"आपली सगळी वडिलोपार्जित मालमत्ता विकून तो आपल्या कुटुंबाला कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाला नेण्यासाठी धडपड करतो आहे. त्याचे आईवडिल जसं जगले तसं त्याला जगायचं नाही आहे. ही अशीच मुलं दिवस रात्र IELTS कोचिंग क्लासेसच्या वाऱ्या करत असतात."

'बस्स कनेड्डा जाणा है'

पंजाबमधल्या लहान मोठ्या कोणत्याही गावात गेलात की, 'बस्स कनेड्डा जाणा है' अशी वाक्य कानी पडतात. देश कदाचित बदलत असतील, पण परदेशी जायचं आकर्षण काही बदलत नाही.

तसं पाहायला गेलं तर भारतातल्या इतर राज्यांतल्या तरुणांपेक्षा पंजाबातल्या तरूणांचे प्रश्न काही फारसे वेगळे नाहीत. रोजगार, पारंपारिक व्यवसायात कमी कमाई, असमान संधी, परंपरांचं जोखड, स्वातंत्र्य नसणं हे प्रश्न कमी-अधिक फरकानं सर्वांचे आहेत.

पण पंजाबी तरुणांनाच याचं सर्वांत जास्त आकर्षण का आहे?

"70-80 च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ जोरात होती. आपल्या मुलांनी अतिरेकी बनण्यापेक्षा परदेशी गेलेलं चांगलं असं आई-वडिलांना वाटायचं. तिथं जाऊन मोलमजुरी का करेना, पण इतर काही धोका नाही ही सुरक्षितता त्यांना महत्त्वाची वाटायची," खुशबू माहिती देतात.

"दुसऱ्या बाजूला जे लोक परदेशात होते, ते भले कोणतही काम करो, पण डॉलर्समध्ये कमवत होते. त्या तुलनेत तेव्हा भारतात संधी कमी होत्या. असे परदेशी गेलेले लोक आपल्या गावी मोठी मोठी घरं बांधायचे तेव्हा इतर गावकऱ्यांना अप्रूप वाटायचं."

Image copyright BBC/PUNEET BARNALA

"तेव्हापासून ही परदेशी जाण्याची क्रेझ सुरू झाली. आता पंजाबला ड्रग्सचा विळखा पडला आहे. इथं राहून मुलांनी अंमली पदार्थांच्या नादी लागण्यापेक्षा परदेशी जाऊन गाड्या धुतलेल्या परवडल्या असंही आई-वडिलांना वाटतं."

"मुलांना परदेशी पाठवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. पंजाबी तरुणांच्या डोक्यात एक वेड असतं, बस्स परदेशी जायचं आहे," खुशबू शेवटी सांगतात.

(संकलन - अनघा पाठक)

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : इटलीतील भारतीय कामगार शोषणाला बळी पडत आहेत

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)