अणुबॉम्बवरून तणाव निवळला; डोनाल्ड ट्रंप घेणार किम जाँग-उन यांची भेट

ट्रंप आणि किम Image copyright AFP
प्रतिमा मथळा ट्रंप आणि किम

अणु चाचण्यांवरून अमेरिका आणि उत्तर कोरियातला तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम-जाँग-उन यांची भेट घेण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर कोरियानं अणुबॉम्बच्या चाचण्या थांबवाव्यात यासाठी अमेरिकेतर्फे दबाव आणण्यात येत होता. मात्र उत्तर कोरियानं अमेरिकेच्या आक्रमणासमोर न झुकता अणुबॉम्बच्या चाचण्या सुरूच ठेवल्या.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
Chung Eui-yong addresses news conference

यादरम्यान ट्रंप आणि किम यांनी एकमेकांवर सातत्यानं आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या दोघांच्या शाब्दिक चकमकीमुळे जगासमोर अणुयुद्धाचं सावट असल्याचंही चित्र होतं.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार च्युंग इयुई याँग यांनी ट्रंप यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. मे महिन्यात ट्रंप आणि किम भेटण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.

मागच्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळानं किम यांची भेट घेतली होती. त्यानंतर चक्रं फिरली आहेत. किम यांनी यापुढे अणुबॉम्ब तसंच क्षेपणात्र चाचण्या करणार नसल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती च्युंग यांनी दिली.

"आम्ही किम यांची भेट घेतली. अणुबॉम्ब चाचण्यांसंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अण्वस्त्र निशस्त्रीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं किम यांनी सांगितलं. या सगळ्याची ट्रंप यांना कल्पना देण्यात आली," अशी माहिती च्युंग यांनी दिली.

ट्रंप यांनी किम यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. कायमस्वरुपी निशस्त्रीकरण व्हावं याकरता मे महिन्यात किम यांची भेट घेणार असल्याचं ट्रंप यांनी सूचित केलं.

अणु चाचण्यांच्या मुद्यावरून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातले संबंधही ताणले गेले होते. मात्र गेल्या महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्तानं दोन देशांमधील तणाव निवळला. उत्तर कोरियाचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)