तुम्ही चिडचिडे आहात का? चिंता नको, अशा स्वभावाचे फायदेही असतात

  • झारिया गोर्वेट
  • बीबीसी फ्युचर
खडूस

फोटो स्रोत, Getty Images

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत... कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती जगण्याचं सार मांडतात. पण आधुनिक संशोधन मात्र वेगळीच सत्यं समोर आणतात.

जास्त कमाई, दीर्घ आयुष्य आणि उत्तम वैवाहिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी तुमचा रागीट आणि निराशावादी स्वभाव मदत करतो. एखाद्या सुतकी चेहऱ्यावरही थोडेसं स्मित आणण्यासाठी हे बहुदा पुरेसं ठरेल. नाही का?

रंगभूमीवरचा तो म्हणजे एक प्रेमळ, देखणा राजपुत्रच जणू... पण कॅमेरा बंद होताच हे चित्र एकदम बदलतं - वैयक्तिक आयुष्यात त्याच्या दृष्टीनं त्याचं स्वतःचं अवकाश अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या 'सेलिब्रिटी' असण्याचा त्याला तिटकारा आहे. अभिनेता असल्याबद्दल चीड आहे. एलिझाबेथ हर्ली ही एकेकाळी त्याची प्रेयसी होती. तिची मित्रमंडळी तर याला 'ग्रम्पलस्टील्टस्कीन' म्हणूनच ओळखत असत. हा अभिनेता म्हणजे ह्यूज ग्रांट....

ह्यू ग्रांट हा कदाचित लहरी म्हणून प्रसिद्ध असेलही आणि त्याच्याबरोबर काम करणं थोडं आव्हानात्मकही असेल. पण त्याची ही चिडखोर वृत्तीच तर त्याच्या यशाचं गमक नसेल?

आशावाद बाळगण्याचा एवढा ताण यापूर्वी कधीच नव्हता. यश आणि आनंदाचा पाठलाग करा असं सतत मनावर बिंबवलं जात आहे. त्यातूनच सेल्फ हेल्प पुस्तकांची अब्जावधी डॉलर्सची इंडस्ट्री नावारुपाला आली आहे. प्रेरणादायी 'कोट्स'चं तर इंटरनेटवर पेवचं फुटले आहे.

आजकाल तर तुम्ही 'हॅपीनेस एक्सपर्ट'ची सेवाही घेऊ शकता. 'सजगता' या विषयावर प्रशिक्षण घेऊ शकता किंवा चक्क एखाद्या अॅपच्या माध्यमातून आत्मिक समाधान शोधू शकता.

अमेरिकेत सैनिकांना सध्या सकारात्मक मानसशास्त्र शिकवलं जात असून यामध्ये दहा लाखांहून जास्त सैनिकांचा समावेश आहे.

तर युकेमधल्या शाळांमध्येही आशावादाचं शिक्षण देण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात, जीडीपीची जागा 'हॅपीनेस इंडेक्स'नं घेतली असून, तोच आता राष्ट्रीय कल्याणाचा द्योतक बनला आहे.

खरं तर, सर्वांत वाईट गोष्टीचा विचार करण्याचे निश्चितपणे काही फायदे आहेत. वाटाघाटी करण्याची वेळ आल्यास विक्षिप्त लोक हे जास्त सरस ठरू शकतात, चाणाक्षपणे निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो.

तर शंकेखोर लोक वैवाहिक जीवनातील स्थैर्य, अधिक चांगली कमाई आणि दीर्घ आयुष्याची अपेक्षा करू शकतात - अर्थात त्यांचा अंदाज मात्र याच्या अगदी उलट असेल.

तर दुसऱ्या बाजूला चांगली मनस्थिती स्वत:बरोबर मोठ्या प्रमाणात जोखीम घेऊन येते - तुमच्यातील धडाडीचा ऱ्हास होतो, बारीकबारीक गोष्टींवरचं लक्ष काहीसं उडतं आणि अशी मनस्थिती तुम्हाला एकाच वेळी भोळसट आणि स्वार्थी बनवते.

त्याचबरोबर सकारात्मकतेमुळे मद्यपान, अतिखाणं आणि असुरक्षित लैंगिक संबंध या गोष्टींना प्रोत्साहन मिळत असल्याचं दिसून आलं आहे.

या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच संकल्पना आहे, ती म्हणजे आपल्या भावना या आसपासच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या असतात.

राग, दुःख आणि निराशावाद या भावना म्हणजे काही दैवाचा क्रूर खेळ किंवा फक्त खराब नशीब एवढेच नसतात, तर काही उपयुक्त कामांसाठी आणि आपली भरभराट होण्यात मदत म्हणूनही त्या विकसित होत जातात.

आता न्यूटनच्या रागाचंच बघा ना. मनात अढी धरून ठेवण्याच्या स्वभावापासून ते बीथोवेनच्या नखऱ्यांपर्यंत- जे कधीकधी हाणामारीवरही उतरले होते - असं वाटतं की, प्रतिभासंपन्न कलाकार हे बहुतेकवेळा अतिशय रागीटच असतात.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये अशी कितीतरी उदाहरणं मिळतील. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे त्यापैकीच एक... रागाचा उद्रेक आणि त्याभरात इतरांचे अपमान करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि असं असूनही त्यांनी 300 अब्ज डॉलर्सची कंपनी उभी केली आहेच की!

फोटो स्रोत, Rex Features

फोटो कॅप्शन,

ह्यूज ग्रांट यांना स्वत:चा एकही चित्रपट आवडत नसे.

पण गेली कित्येक वर्षं, या दोन गोष्टींमध्ये नक्की काय दुवा आहे हे एक गूढच होतं. मग २००९ मध्ये अॅमस्टरडॅम विद्यापीठातील मथिजस् बास यांनी या विषयावर अभ्यास करण्याचं ठरवलं.

त्यांनी इच्छुक विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला आणि विज्ञानाच्या नावाखाली त्यांना संतप्त करण्याचं काम केलं. या गटातील अर्ध्या विद्यार्थ्यांना अशी एखादी गोष्ट आठवायला सांगितली, ज्यामुळे त्यांना राग येईल आणि त्यावर एक लहानसा निबंध लिहिण्यास त्यांना सांगितलं गेलं.

बास सांगतात की, "त्यामुळे संतापाचा उद्रेक जरी नसला तरी रागाची थोडीशी भावना त्यांच्यात उत्पन्न झालीच." उर्वरित विद्यार्थ्यांच्या मनात दुःखाची भावना निर्माण केली गेली.

यानंतर त्यांच्या सर्जनशीलतेची चाचणी घेण्यासाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या एका खास खेळात दोन्ही गटांना समोरासमोर आणण्यात आलं.

त्यांना सोळा मिनिटांचा कालावधी देण्यात आला. मानसशास्त्र विभागातील शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी शक्य त्या सर्व कल्पनांवर विचार करण्यास सांगितलं गेलं.

बास यांना अपेक्षित होतं त्याप्रमाणेच संतप्त संघानं अधिक कल्पना मांडल्या - निदान सुरुवातीला तरी. त्यांचं योगदानही जास्त अभिनव असून अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी लोकांनी त्याची पुनरावृत्ती केली होती.

साधनांची जमवाजमव करण्यासाठी राग खरोखरच शरीराला तयार करतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेझॉस.

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, आकस्मिकपणे नवीन उपक्रम सुरू करताना किंवा तथाकथित चाकोरीबाहेरचा विचार करताना, रागावलेल्या स्वयंसेवकांची (विद्यार्थी) कामगिरी अधिक चांगली होती.

उदाहरणार्थ, तुम्हाला वीटेचा वापर कसा करता येईल असा प्रश्न विचारला गेला, तर पद्धतशीरपणे विचार करणारा माणूस दहा वेगवेगळ्या प्रकारच्या इमारतींमध्ये वीटेचा कसा वापर करता येईल, ते सुचवू शकतो, पण वीटेचे शस्त्रातही रुपांतर होऊ शकतं, यासारखा एखादा अभिनव उपाय सुचवण्यासाठी मात्र चाकोरीबाहेरचा दृष्टिकोन आवश्यक असतो.

थोडक्यात सांगायचं तर, एका विचारापासून दुसऱ्या विचाराकडं तुमचं मन किती सहजपणे जाऊ शकतं यावर सर्जनशीलता अवलंबून असते. एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी अशा प्रकारची "बेभान प्रतिभाच" खऱ्या अर्थात तारक ठरत असल्याचं सहज दिसून येतं.

"साधनसामग्रीची जमावाजमव करताना राग खऱ्या अर्थानं शरीराला तयार करतो - तुमच्यावर आलेला प्रसंग हा वाईट असल्याचं तो (राग) तुम्हाला सांगतो आणि त्यातून बाहेर पडण्याची उर्जाही निर्माण करतो," बास म्हणतात.

हे एकूण कार्य समजून घेण्यासाठी सर्वांत प्रथम आपल्याला मेंदूत काय चाललं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. इतर सगळ्या भावनांप्रमाणेच रागाचीही सुरुवात अमिगडालामध्येच होते.

अमिगडाला ही आपल्याला असलेल्या धोक्याची घंटा वाजवणारी बदामाच्या आकाराची रचना असते. ती अत्यंत कार्यक्षम असते - याद्वारे संकटानं तुमच्या जागृत जाणीवेमध्ये प्रवेश करण्याच्या कितीतरी आधीच तुम्हाला सावध केलं जातं.

त्यानंतर तुम्हाला चीड आणणं हे मेंदूतील रासायनिक संकेतांवर सर्वस्वी अवलंबून असतं. जसा मेंदू अड्रेनलिनने भरून जातो, त्यामध्ये भावपूर्ण आणि तीव्र रागाचा स्फोट सुरू होतो, जो बराच काळ रहातो.

यादरम्यान श्वसन आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि रक्तदाबही खूप वाढतो. जेव्हा लोक रागावतात तेंव्हा रक्तप्रवाह अतिशय जोरात होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारची लाली येते आणि कपाळावरच्या शीरा थडाथडा उडू लागतात.

फोटो स्रोत, Wikimedia Commons

फोटो कॅप्शन,

बीथोवेन यांचा स्वभाव लहरी होता.

या यंत्रणेचा प्राथमिक हेतू हा शरीर आक्रमणासाठी तयार करणं हाच असल्याचं मानलं जात असलं, तरी प्रेरणा देणं आणि मानसिक धोके पत्करण्याचं सामर्थ्य निर्माण करणं, यांसारख्या इतर फायद्यांसाठीही ही यंत्रणा ओळखली जाते.

जोपर्यंत तुमच्या रागाला वाट मिळत असते तोपर्यंत हे सर्व शारीरिक बदल अत्यंत उपयुक्त असतात. मग ती वाट सिंहाशी कुस्ती करुन मिळो किंवा सहकामगारांवर आरडाओरडा करुन.

अर्थात त्यामुळे कदाचित काही लोक तुमच्यापासून नक्कीच दुरावतातही, पण त्यानंतर तुमचा रक्तदाब मात्र सामान्य व्हायला हवा. राग मनात धरून ठेवण्याचे परिणाम जास्त गंभीर असतात.

मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे मानणारा मतप्रवाह प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलचा कॅथरसिसवर ठाम विश्वास होता. (या शब्दाचा आधुनिक अर्थ त्यानेच शोधून काढला) त्याच्या मते, शोकांतिका पहाताना लोकांना राग, दुःख आणि अपराधीपणाचा अनुभव नियंत्रित वातावरणात घेता येतो. या सर्व भावना मोकळेपणानं व्यक्त केल्यानं त्यांना एकाच फटक्यात त्यापासून सुटल्यासारखं वाटतं.

पुढे सिगमंड फ्रॉईडनंदेखील या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आणि एक पाऊल पुढे जात कॅथरॅटीकद्वारे थेरपिस्टसना उपचार करताना होणाऱ्या फायद्यांचाही तो खंबीर पुरस्कर्ता बनला.

पुढे २०१०मध्ये शास्त्रज्ञांच्या एका गटानं यावर अभ्यास करण्याचं ठरवलं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे विकार असणाऱ्या ६४४ रुग्णांचे त्यांनी सर्वेक्षण केलं.

त्यांच्यामधील राग, मनात धरून ठेवलेला राग आणि दुःख अनुभवण्याची प्रवृत्ती या भावनांची पातळी निश्चित करण्याच्या हेतूनं हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पाच ते दहा वर्षांच्या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं.

हा अभ्यास सुरू असताना, २० टक्के लोकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. राग आणि मनात धरून ठेवलेला राग या दोन्ही गोष्टींनी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढल्याचं सुरुवातीला वाटलं.

पण इतर घटक नियंत्रणात ठेवल्यानंतर मात्र संशोधकांच्या असं लक्षात आलं की, रागाचा यावर कसलाच प्रभाव नाही - उलट राग मनातच धरून ठेवल्यानं मात्र हृदयरोगाचा धोका सुमारे तीन पटींनी वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कधी काळ बिल गेट्स शीघ्रकोपी म्हणून ओळखले जात.

हे नक्की का होतं याचा उलगडा अजूनही झाला नसला, तरी इतर अभ्यासातून असे दिसून आलं आहे की, मनात धरून ठेवलेल्या रागामुळे तीव्र उच्च रक्तदाब होऊ शकतो.

रागाचे सगळेच फायदे काही फक्त शारीरिकच नसतात. वाटाघाटी करतानाही राग फायद्याचा ठरू शकतो. एखाद्याला तुमच्या हिताबाबत पुरेसे महत्त्व वाटत नसल्याची जाणीव ही आक्रमक होण्यामागचा सर्वांत महत्वाचा मुद्दा ठरू शकते.

अर्थात त्याची काही किंमतही चुकवावी लागतेच -शारीरिक हिंसेचा धोका - आणि त्याचबरोबर इतर काही फायद्यांना मुकावेही लागते - निष्ठा, मैत्री आणि पैसा - ज्यातून त्यांच्या चुका दाखवण्याच्या कामी मदत होते.

राग आल्यावर...

राग आल्यावर केली जाणारी वेडीवाकडी तोंडं ही या सिद्धांताला पुष्टी देणारी आणखी एक गोष्ट आहे.

संशोधनाअंती असं दिसून आलं आहे की, शारीरिक बदल म्हणजे केवळ अनियंत्रित हालचाली नसून ते विरोधकांना आपली शारीरिक ताकद दाखवण्याच्या विशिष्ट हेतूनं घडतात.

हे योग्यप्रकारे साध्य झाल्यास तुमचं हित साधण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आक्रमकता मदत करू शकते - सौदेबाजीचा हा अगदी प्राचीन मार्ग आहे.

खरं तर, चिडखोरपणाच्या इतरही फायद्यांची वाढती जाणीव आता शास्त्रज्ञांना होऊ लागली आहे. जसं की चिडखोरपणाचा फायदा हा भाषिक कौशल्य आणि स्मरणशक्तीत सुधारणा आणि आपल्याला अधिकाधिक आग्रही बनवणं यांसारख्या सामाजिक कौशल्यासाठीही होऊ शकतो.

"नकारात्मक मनस्थिती (मूडस्) आपल्याला आपण एका नवीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत असल्याचे सूचित करते आणि अधिक सावध, तपशीलवार आणि काळजीपूर्वक विचार करायला भाग पाडते," जोसेफ फोर्गास सांगतात.

भावनांचा वागणुकीवर होणारा परिणाम या विषयावर त्यांचा चार दशकांपासून अभ्यास सुरू आहे. थोडेसं खिन्न वाटत असल्याची जाणीव सामाजिक संकेतांविषयीची जागृती वाढवत असल्याचेही संशोधनातून दिसून आले आहे. गंमत म्हणजे, यातून लोकांना इतरांप्रती जास्त - कमी नाही- प्रमाणात निष्पक्षपाती बनवले आहे.

कठोर, पण निष्पक्षपाती

सहसा 'आनंद'ही चांगली भावना मानली जात असली, तरी तिचे तसे फारसे फायदे काहीच नाहीत. एका अभ्यासादरम्यान स्वयंसेवकांच्या एका गटाला उबगवाणे, दुःखी, रागावलेले, भयभीत, आनंदी, आश्चर्यचकीत किंवा तटस्थ वाटायला लावले आणि त्यांना "अल्टीमेटम गेम" खेळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं.

या खेळात, पहिल्या खेळाडूला काही पैसे देण्यात येतात आणि त्याला या पैशाचे वाटप तो स्वतः आणि इतरांमध्ये कसे करेल, हे विचारण्यात येते. तर त्याचा निर्णय मान्य किंवा अमान्य करण्याचा अधिकार दुसऱ्या खेळाडूला देण्यात येतो.

त्यांच्यात सहमती झाल्यास पहिल्या खेळाडूनं सांगितल्याप्रमाणे पैशाचं वाटप होतं. सहमती न झाल्यास मात्र कोणालाच पैसे मिळत नाहीत.

आनंदात असलेल्या खेळाडूंनी स्वतःसाठी जास्त बक्षीस ठेवलं तर दुःखी मनस्थितीतील खेळाडू मात्र लक्षणीयरित्या कमी स्वार्थी दिसले.

अल्टीमेटम गेमचा वापर हा बहुतेकदा आपल्या निष्पक्षपातीपणाची चाचणी म्हणून केला जातो. ज्यातून हे दाखवले जातं की तुम्ही ५०-५० टक्के वाटा मिळण्याची अपेक्षा करता की प्रत्येकजण स्वतःकरता खेळत आहे, यावर खूश असता.

आश्चर्य म्हणजे, नकारात्मक भावनांमध्ये दुसऱ्या खेळाडूकडून जास्त प्रमाणात नकार येतो, ज्यातून असेही सुचित होऊ शकते की या भावना निष्पक्षपातीपणा आणि सगळ्यांना सारखीच वागणूक देण्याची भावना वाढवतात.

याच्या बरोबर उलट्या सेट-अपमधून असे दिसून आले की, हा काही कोल्ह्याला द्राक्षे आंबट असण्याचा प्रकार नाही. हा खेळ म्हणजे 'डिक्टेटर गेम'. या खेळाचे नियम अगदी तसेच असतात, फरक फक्त इतकाच की यामध्ये दुसऱ्या खेळाडूला निर्णय घेण्याचा अधिकार नसतो-पहिला खेळाडू ठरवेल तितकेच दुसऱ्याला मिळतं. यामधूनही हेच दिसून येते की आनंदी मनस्थिती असलेले खेळाडू स्वतःकडे जास्त बक्षीस ठेवतात, तर जे दुःखी आहेत ते मात्र लक्षणीयरित्या कमी स्वार्थी असतात.

"ज्या लोकांची मनस्थिती थोडीशी दुःखी असते ते सामाजिक नियम आणि अपेक्षांकडे जास्त लक्ष देतात आणि म्हणूनच ते इतरांप्रती जास्त निष्पक्षपाती आणि न्याय्य असतात," फोर्गास सांगतात.

काही प्रसंगी, आनंदी भावना आपल्याबरोबर कितीतरी गंभीर धोके घेऊन येते. कडल हार्मोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसीनशी हे निगडीत असून, त्यामुळे धोका ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याचं काही अभ्यांसांती दिसून आलं आहे.

प्रागैतिहासिक काळात आपल्या पूर्वजांना सातत्यानं हिंस्त्र पशूंचा सामना करावा लागत होता. त्याकाळात या आनंदी भावनेनं त्यांना चांगलंच संकटात टाकले असते. तर आधुनिक काळात हीच भावना आपल्याला अतिमद्यपान, अतिखाणं आणि असुरक्षित लैंगिक संबंध यांसारख्या धोक्यांकडे पुरेसे लक्ष देण्यापासून रोखते.

"आनंद हा एखाद्या शॉर्टहॅंड संकेताप्रमाणे काम करतो, ज्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि आसपासच्या वातावरणाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असं आपल्याला वाटतं," ते सांगतात.

जे सतत आनंदी भावनेत तरंगत असतात त्यांच्याकडून कदाचित महत्त्वाचे संकेत निसटतात. त्याऐवजी ते कदाचित त्यांच्या वर्तमान ज्ञानावरच जास्त अवलंबून असू शकतात- परिणामी त्यांच्याकडून निर्णय घेताना गंभीर चुका होऊ शकतात.

चांगल्या मूडमध्ये असलेल्यांची संशयी वृत्तीनं विचार करण्याची क्षमता कमी झाली आणि ते लक्षणीयरित्या जास्त भोळसट होते.

एका अभ्यासादरम्यान, फोर्गास आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी काही स्वयंसेवकांना त्यांच्या प्रयोगशाळेत चित्रपट दाखवून आनंदी किंवा दुःखी केले.

त्यानंतर त्यांना शहरी दंतकथांच्या सत्यतेविषयी प्रश्न विचारले गेले, जसे ल्युकेमिया होण्यासाठी वीजवाहिन्या कारणीभूत ठरतात का? किंवा अध्यक्ष केनेडी यांच्या हत्येमागे सीआयए असू शकते का? आनंदी मूडमध्ये असणाऱ्या व्यक्तींची संशयी वृत्तीनं विचार करण्याची क्षमता कमी होती आणि ते लक्षणीयरीत्या अधिक भोळसट होते.

चांगली मनस्थिती लोकांना साचेबंद गोष्टींवर विसंबून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते का, हे जाणून घेण्यासाठी फोर्गास यांनी पुढे फर्स्ट पर्सन शुटर या खेळाचा वापर केला. त्यानं भाकीत केल्याप्रमाणेच चांगल्या मनस्थितीतील लोकांनी पगडीधारकांना लक्ष्य करण्याची शक्यताच अधिक होती.

सर्व सकारात्मक भावनांपैकी भविष्यातल्या आशावादाचे परिणाम सर्वात जास्त उपरोधिक असू शकतात. आनंदाप्रमाणेच, भविष्याविषयी सकारात्मक स्वप्न पहात राहिल्यास आपल्यातली प्रेरणा कमी होऊ शकते.

"लोकांना उद्दिष्ट साध्य झाल्यासारखं, चिंतामुक्त किंवा निश्चिंत वाटतं, आणि या कल्पना किंवा दिवास्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक प्रयत्नच ते करत नाहीत," न्यूयॉर्क विद्यापीठाच्या गॅब्रिएल ओटींगेन सांगतात.

उदाहरणार्थ, जे पदवीधर कामातील यशाबद्दल कल्पना करत बसतात ते अंतिमतः कमी कमाई करतात. जे रुग्ण बरे होण्याबाबत दिवास्वप्न बघतात, त्यांच्यातील सुधारणेचा वेग कमी असतो. अनेक अभ्यासांमधून ओटींगेन यांनी हे दाखवून दिले आहे की जितकी जास्त दिवास्वप्नं तुम्ही बघता, तितकी ती खरी होण्याची शक्यता कमी होते.

"तुम्ही स्वप्न बघा आणि ते प्रत्यक्षात येईल, असे लोक तुम्हाला सांगत असतात - पण हे अडचणीचं असतं," त्या सांगतात. आशावादी विचारानं लठ्ठ व्यक्ती कदाचित वजन कमी करण्याचे प्रयत्न कमी करते आणि ध्रूमपान करणारे ते सोडण्याची प्रत्यक्ष योजना करतील, ही शक्यताही कमी होते.

बचावात्मक निराशावाद

ओटींगेन यांच्या मते सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे सामाजिक स्तरावरसुद्धा हा धोका असू शकतो. त्यांनी युएसए टुडे या वर्तमानपत्रातील लेखांची तुलना आठवडा किंवा महिन्यानंतरच्या प्रत्यक्ष आर्थिक कामगिरीशी केली.

तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की, मजकूर जितका जास्त आशावादी तितकी कामगिरी अधिक खालावलेली होती.

पुढे त्यांनी राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणांचाही अभ्यास केला - आणि त्यांच्या लक्षात आलं की, ज्या ज्या अध्यक्षांनी सकारात्मक भाषणे केली होती, त्या त्या अध्यक्षांच्या कार्यकाळात रोजगारनिर्मितीचा दर आणि जीडीपी कमी असल्याचेच पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images

आशावादाबद्दलचे हे सर्व निष्कर्ष एकत्र केल्यास असं दिसतं की, जर इतर लोकांच्या तुलनेत आपल्याला कमी धोका आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्वतःहूनच समस्येला आमंत्रण देत आहात.

त्याऐवजी, आशावादाचा हा चष्मा फेकून, ग्लास अर्धा रिकामा आहे, असा दृष्टीकोन ठेवण्याची इच्छा कदाचित तुमच्यात निर्माण होईल.

"बचावात्मक निराशावादामध्ये" मर्फी'ज लॉ चा समावेश आहे, ज्यानुसार जे काही चुकीचे होऊ शकते ते चुकीचे होईलच ही वैश्विक अनिवार्यता आहे. सर्वाधिक वाईटाचा अंदाज बांधून तुम्ही स्वतःला प्रत्यक्ष त्या संकटासाठी तयार करु शकता.

उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी भाषण देणार आहात. त्यावेळी तुम्ही शक्य त्या सर्व वाईट परिणामांचा विचार केला पाहिजे - व्यासपीठावर जात असताना तुमचा पाय सटकेल, आपल्या स्लाईडस् असलेलं मेमरी कार्ड हरवेल, संगणाकाशी संबंधित समस्या येतील, अवघड प्रश्न विचारले जातील (खरा निराशावादी तर यांसारख्या इतर कितीतरी गोष्टींचा विचार करू शकतो) - आणि ते लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही त्यावरील उपायांवर विचार करणे आवश्यक आहे.

मॅसेच्युसेट्सच्या वेलस्ली महाविद्यालयातल्या मानसशास्त्रज्ञ जुली नॉरम या निराशावाद संदर्भातील तज्ज्ञ आहेत.

"मी थोडीशी गबाळी आहे, खास करून जेव्हा मी अस्वस्थ असते, त्यामुळे मी जास्त उंच टाचांचे बुट घालत नाही, व्यासपीठाची माहिती करून घेण्यासाठी म्हणून लवकर पोहचते आणि तिथं मी घसरून पडेन असं काही पडलेले नाही याची खात्री करून घेते."

"विशेषतः माझ्याकडे माझ्या स्लाईडस् चे बरेच बॅक अप असतातः गरज पडल्यास मी त्याशिवायही भाषण देऊ शकते, मी आयोजकांना त्याची एक कॉपी मेल करते, एक कॉपी फ्लॅशड्राईव्हवर ठेवते आणि वापरण्यासाठी माझा स्वतःचा लॅपटॉप बरोबर आणते..." त्या सांगतात. म्हणतात ना फक्त विचित्र माणसंच तग धरू शकतात.

त्यामुळे यापुढे जेव्हा कोणी तुम्हाला म्हणेल, "चीअर अप"- तेव्हा तुम्ही त्यांना असं का सांगत नाही की तुम्ही तुमच्यातील निष्पक्षपातीपणाची भावना वाढवत आहात, बेरोजगारी कमी करत आहात आणि जागतिक अर्थव्यवस्था वाचवत आहात म्हणून? त्यामुळे शेवटी बाजी तुम्हीच माराल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)