अमेरिका-उत्तर कोरिया चर्चा : पडद्यामागे काय घडलं?

ट्रंप आणि उन Image copyright AFP

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी चर्चा करण्याची तयार दर्शवली आहे. उत्तर कोरियाच्या अनुषंगाने निर्माण झालेला तणाव लक्षात घेता शुक्रवार हा ऐतिहासिक दिवस ठरला.

यामागे घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेताना 4 महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात.

उत्तर कोरियाचा प्रस्ताव ट्रंप यांनी मान्य केला. त्यामुळे दोन्ही नेते आता लवकरच भेटू शकतील.

यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी केली होती. 'लिटल रॉकेट मॅन' आणि 'डोटार्ड' अशा शब्दांत दोघांनी एकमेकांवर टीकाप्रहार केले होते.

कागदावर उत्तर कोरियाशी युद्धजन्य परिस्थितीत असणाऱ्या दक्षिण कोरियाने ही बातमी जादूसारखी आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

1. काय आहे महत्त्वाचं?

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या कार्यक्रमामुळे गेली काही दशकं जगाला काळजीत पाडलं आहे.

उत्तर कोरियाने जमिनीखाली 6 बेकायदेशीर अणू चाचण्या घेतल्या आहेत. शिवाय दूर अंतरावरील क्षेपणास्त्रांच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत. उत्तर कोरियाने अमेरिकेवर अणुहल्ला करण्याची धमकी दिली असली तरी उत्तर कोरियाकडे ही क्षमता आहे का याबद्दल अनिश्चितता आहे. पण शेजारी राष्ट्रांवर मात्र उत्तर कोरिया नक्कीच हल्ला करू शकतं.

त्यामुळे उत्तर कोरियाचा हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे.

2. उत्तर कोरियाचा हा प्रस्ताव आताच का?

उत्तर कोरियाने हा प्रस्ताव आताच का दिला याबद्दल निश्चित माहिती नाही. अनेक वर्षांपासूनच्या निर्बंधांचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. शिवाय डोनाल्ड ट्रंप यांचा फायदा उठवता येऊ शकतो, असाही विचार उत्तर कोरियाने केलेला असू शकतो. अणुशक्ती असणारा देश म्हणून गांभीर्याने घेतलं जावं, असंही उत्तर कोरियाला वाटत असण्याची शक्यता आहे.

3. पुढं काय घडेल?

ही मुस्तद्देगिरी गुंतागुंतीची ठरणार आहे.

ही चर्चा होणार का आणि या चर्चेत कोण सहभागी होणार, याचीही खात्री नाही. या बैठकीच्या बदल्यात उत्तर कोरियाला काय हवं, हेही माहीत नाही.

Image copyright AFP

उत्तर कोरियाने कोणतीही कमिटमेंट केलेली नाही. जर अण्वस्त्रे नष्ट करण्याची तयारी जरी उत्तर कोरियाने दाखवली तरी ते सिद्ध कसे होणार हा प्रश्न आहे.

यापूर्वीही उत्तर कोरियाने वचन फिरवलेलं आहे. बीबीसीचे प्रतिनिधी सांगतात की हा उत्तर कोरियाचा राजकीय जुगार आहे.

4. इतर देश सहभागी देश कोणते?

दोन्ही कोरियांचा शेजारी असलेला जपान याबद्दल आशावादी असला तरी दक्ष आहे. काही घडण्यापूर्वी उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत अशी जपानची भूमिका आहे.

चीन हा उत्तर कोरियाला आर्थिक पाठबळ देणारा मुख्य देश आहे. सर्वांनी चर्चा करावी, यासाठी चीनचा दबाव आहे. चीनने योग्य दिशेने घडामोडी घडत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरियाशी आणि रशिया यांच्यातील सीमा लहान आहे. रशियाने या घडामोडी योग्य दिशेनं पडलेलं पाऊल असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)