पुतिन यांचे अश्रू आणि त्यांच्या गुरूंच्या मृत्यूचे रहस्य

  • गॅबरिल गेटहाऊस
  • बीबीसी प्रतिनिधी
पुतिन

पुतिन यांची ओळख कणखर नेता अशी आहे, त्यामुळे पुतिन यांना भावूक झाल्याचे किंवा ते अश्रू ढाळताना कुणी पाहिलेलं नाही.

आपल्या राष्ट्राध्यक्षांना रडताना पाहण्याचा योग रशियन लोकांना फार क्वचितच येतो. पुतिन हे गेल्या 18 वर्षांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. या काळात त्यांनी अनेक दुःखद घटना अनुभवल्या आहेत पण ते आपल्या सार्वजनिक जीवनात फक्त एकदाच रडले आहेत. 24 फेब्रुवारी 2000 रोजी त्यांचे राजकीय गुरू अॅनाटोली सोबचॅक यांच्या अंत्यसंस्कारावेळी पुतिन रडले होते.

सोबचॅक हे त्याकाळातील राजकीय क्षेत्रातलं मोठं नाव होतं. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा गोर्बाचेव्ह आणि येल्स्टिन यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून सोबचॅक यांचं नाव घेतलं जात असे.

फोटो कॅप्शन,

अॅनाटोली सोबचॅक

अॅनाटोली यांच्यामुळेच व्लादिमीर पुतिन राजकारणात आले. राजकारणात येण्यापूर्वी पुतिन हे KGB या गुप्तहेर खात्याचे अधिकारी होते. त्यांच्यावर सोबचॅक यांची नजर पडली आणि त्यांनी पुतिन यांना राजकारणात आणलं. त्या वेळची नेमकी काय परिस्थिती होती? पुतिन यांना राजकारणात आणण्याचा निर्णय त्यांनी का घेतला हे कुणालाच माहीत नाही? पण त्या निर्णयाचे परिणाम अद्यापही दिसत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे सुरक्षा यंत्रणांचा प्रशासनावर इतका प्रभाव वाढला की रशियामध्ये आता लोकशाही ही नावापुरतीच उरली आहे.

2018 च्या निवडणुकीत आठ उमेदवार होते पण फक्त पुतिन यांनाच महत्त्वपूर्ण उमेदवार समजलं जात होतं.

"ही निवडणूक एखाद्या कॅसिनोतील जुगाराप्रमाणेच आहे," असा आरोप एका उमेदवाराने केला आहे. "जसं कॅसिनोत नेहमी कॅसिनो मालकच जिंकत असतो तसं रशियातल्या निवडणुकीत फक्त पुतिनच जिंकतात," असं एका उमेदवाराने म्हटलं आहे.

आणि या उमेदवाराचं नाव माहीत आहे का?

क्षणभर थांबा - त्या उमेदवाराचं नाव आहे... सेनिया सोबचॅक आणि त्या अॅनाटोली सोबचॅक यांच्या कन्या आहेत. हे तेच सोबचॅक आहेत ज्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पुतिन रडले होते.

फोटो कॅप्शन,

सेनिया सोबचॅक यांचे पोस्टर

सेनिया या 36 वर्षांच्या आहेत आणि राजकारणात येण्यापूर्वी त्या टीव्ही प्रेझेंटर आणि पत्रकार होत्या. या निवडणुकीतलं आणखी एक महत्त्वपूर्ण नाव आहे ते म्हणजे- अलेक्झाई नवालनी. अलेक्झाई यांना ही निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अलेक्झाई यांच्या समर्थकांचा असा आरोप आहे की सेनिया यांना पुतिन यांनीच उभं केलं आहे. ही निवडणूक एकतर्फी वाटू नये म्हणून पुतिन यांनी आपल्या राजकीय गुरूंच्या मुलीला निवडणुकीत उभं केलं आहे.

त्यांचं हे म्हणणं अंशतः खरं आहे, कारण सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना निवडणुकीला उभंच राहता आलं नसतं. आता ज्यांनी सेनियांना उभं राहण्याची परवानगी दिली ते नेते आणि अधिकारी पश्चाताप करत असतील.

कारण सेनिया सर्व टीव्ही चॅनेलवर जात आहेत आणि पुतिन यांचे सहकारी आणि त्यांच्याशी व्यावसायिक हितसंबंध असलेल्यांचं पितळ उघडं पाडताना दिसत आहेत. "सरकारनं क्रिमियावर मिळवलेला ताबा हा बेकायदेशीर आहे," असं त्या उघडपणे म्हणत आहे.

त्यांचा उद्देश ही निवडणूक जिंकणं नाही तर आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं आहे असं दिसत आहे.

रशियात नेमकं काय सुरू आहे?

आता आपण काही क्षणांसाठी सेनिया यांना विसरून जाऊ आणि त्यांच्या वडिलांसोबत काय घडलं यावर एक नजर टाकू. अॅनाटोली सोबचॅक हे त्यावेळी सेंट पीट्सबर्गचे महापौर होते आणि पुतिन हे उप-महापौर होते. सोबचॅक सीनियर यांच्यावर एकदा भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, तेव्हा तर त्यांना देशाबाहेर पळून जाण्यास पुतिन यांनीच मदत केली होती. काही काळानंतर ते रशियात परतले होते.

लक्षात घ्या, तो काळ होता 1990चा. त्यावेळी रशियाची दुरावस्था झालेली. रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरीस येल्त्सिन हे नेहमी मद्यधुंद अवस्थेत असायचे आणि कामाकडे त्यांचे फारसे लक्ष नसे.

फोटो कॅप्शन,

सेनिया सोबचॅक, पुतिन आणि नारुसोव्हा

येल्त्सिन यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी विचार केला की आपण येल्त्सिन यांचा राजकीय वारस म्हणून पुतिन यांची निवड करू. कारण त्यावेळी पुतिन यांच्याबद्दल कुणालाच फारसं काही माहीत नव्हतं आणि पुतिन यांची प्रतिमा अगदी उजळ होती.

पुतिन हे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच 62 वर्षांच्या अॅनाटोली सोबचॅक यांचा कालिनीग्राड येथे मृत्यू झाला. अॅनाटोली यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असं वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं पण हृदयविकाराची कुठलीच चिन्हं दिसत नव्हती म्हणून अॅनाटोली यांच्या पत्नीने पुन्हा एकदा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी पोस्टमार्टम केलं देखील.

अॅनाटोली यांच्या पत्नीचं नाव आहे ल्युडिमिला नारुसोव्हा. मी त्यांची नुकतीच भेट घेतली. "तुम्हाला वाटतं का तुमच्या पतीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर तो घातपात होता?" असा प्रश्न मी त्यांना केला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी जवळपास 10 मिनिटं घेतली. आधी त्या "हो" म्हणाल्या आणि नंतर त्या म्हटल्या, "मला माहीत नाही?"

काही जणांना वाटतं सोबचॅक यांच्या मृत्यूचे धागेदोरे हे पुतिनपर्यंत पोहोचतात तसेच त्यांच्या मृत्यूमागे पुतिन यांचा हात आहे.

"या अशा विधानांमागे काही सत्य आहे का?" असा प्रश्न मी नारुसोव्हा यांना विचारला. नारुसोव्हा यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

मी पुन्हा जुनी फुटेज तपासून पाहिली. त्या व्हीडिओत पुतिन यांचे डोळे रडून लाल झालेले दिसतात. त्यांना आवंढा गिळण्यास त्रास होताना दिसतो. पुतिन हे काही कसलेले अभिनेते नाहीत आणि लोकांसमोर आपल्या भावनांचे प्रदर्शन करण्याची त्यांना सवयही नाही. तेव्हा व्हीडिओ पाहून असं वाटतं की पुतिन यांना खरोखरचं दुःख झालं आहे. एक दुसरीही गोष्ट मनात येते, त्यांना कशाचा पश्चाताप तर होत नाही ना? असाही प्रश्न पडतो.

"पुतिन यांना राजकारणात पुढं आणण्यासाठी त्यावेळी काही जण प्रयत्न करत होते," असं नारुसोव्हा सांगतात.

पुतिन यांच्या राजकीय उत्कर्षासोबत आपलाही उत्कर्ष होईल असं अनेकांना त्यावेळी वाटत होतं, अद्यापही परिस्थिती तीच आहे.

आपण क्षणभरासाठी मानलं की सोबचॅक यांची हत्या झाली, तर त्यामागे काय कारण असेल? पुतिन यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे प्राण गेले असावेत असं समजणाऱ्यांचा एक गट आहे. अर्थात हा केवळ संशय आहे. पण मी यावर आता विचार करतोय.

मी नारुसोव्हा यांना विचारलं, "तुम्ही तुमच्या पतींचे पोस्टमार्टम व्हावे अशी मागणी केली होती. त्याचं काय झालं?"

नारुसोव्हा यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती पण हा अहवाल त्यांनी कधीच जाहीर केला नाही. त्यांनी या अहवालाची कागदपत्रं रशियाबाहेर एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आहेत. या कागदपत्रांबाबत आपल्याला काही बोलायचं नाही असं त्या वारंवार सांगतात.

फोटो कॅप्शन,

व्लादिमीर पुतिन

मी त्यांना फार आग्रह केला. मी त्यांना म्हणालो, "असं वाटतंय तुमच्याकडे एखादी इन्श्युरन्स पॉलिसी आहे?"

"तुम्ही या गोष्टीकडे तसंही पाहू शकतात," असं त्या म्हणतात.

"तुम्हाला कशाची भीती वाटते का? असं मी त्यांना विचारलं, तुमचं किंवा तुमच्या मुलीच्या जीवाचं बरंवाईट होईल असं तुम्हाला वाटतं का?"

काही क्षणासाठी त्या थांबल्या आणि म्हणाल्या...

"या देशात राहणं खूप भीतीदायक आहे, आणि जेव्हा तुम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात असतात तेव्हा तर ती भीती अधिकच वाढते.... हो खरं आहे मला भीती वाटते... "

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)