शी जिनपिंग यांचा अमर्यादित काळासाठी राष्ट्राध्यक्ष राहण्याचा मार्ग मोकळा

चीन, कम्युनिस्ट Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शी जिनपिंग यांचे संग्रहित छायाचित्र

शी जिनपिंग यांचा अमर्यादित काळासाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चीनच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यांना केवळ दोनदा हे सर्वोच्च पद भूषवता येत असे. या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे अमर्यादित काळासाठी शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष राहू शकतील.

नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत घटनादुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2964 सदस्यांपैकी फक्त दोन मतं विरोधात गेली तर तीन मतं रद्द करण्यात आली.

चीनमध्ये दोनदा राष्ट्राध्यक्ष पद भूषवण्याची मर्यादा 1990 मध्ये कायम करण्यात आली होती. चीनमध्ये माओ झेडाँगसारखं नेतृत्व तयार होऊन व्यक्तीस्तोम वाढू नये या कारणासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा २०१२मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शी जिनपिंग भ्रष्टाचार विरोधी अभियानाला सुरुवात केली.

गेल्या काही दशकांमध्ये शी जिनपिंग हे चीनमधले सर्वांत शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले. या निवडणुकीनंतर त्यांना आता कुणी आव्हानही देणार नाही, असं बीबीसीचे चीनचे प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनल्ड यांनी सांगितलं.

ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं संमेलन झालं होतं. त्या संमेलनात मावळत्या अध्यक्षांनी आपल्या राजकीय वारसदाराचं नाव घोषित करण्याची प्रथा होती. पण यावेळी शी जिनपिंग यांनी आपला वारस सादर केला नाही. तेव्हाच, घटनादुरुस्ती होऊन दोन वेळ अध्यक्षपदाचा नियम बदलेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

काय आहेत शी जिनपिंग यांचे विचार

18 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाच्या पूर्वार्धात जिनपिंग यांनी तीन तासांचं प्रदीर्घ भाषण केलं होतं. भाषणादरम्यान जिनपिंग यांनी नव्या युगात चीनच्या गुणवैशिष्ट्यांसह समाजवादाची संकल्पना मांडली.

कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी 'शी जिनपिंग विचारधारा' संविधानात समाविष्ट होईल, असे संकेत दिले होते. तेव्हाच जिनपिंग यांचं वाढतं प्रस्थ सिद्ध झालं होतं.

कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांचे स्वत:चे विचार होते. मात्र माओ यांचे विचार वगळता संविधानात कोणत्याही नेत्याच्या विचारांना स्थान देण्यात आलेलं नाही. माओ आणि डेंग जियाओपिंग या दोघांच्या विचारांना घटनेत समाविष्ट करण्यात आलं आहे.

जिनपिंग यांच्या विचारांसह चीनमध्ये नव्या धाटणीचा समाजवादाचं पर्व सुरू झालं आहे. शालेय मुलं, महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांच्यासह नऊ कोटी कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य शी जिनपिंग यांच्या विचारांचा अभ्यास करतील.

२०१२मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शी जिनपिंग भ्रष्टाचार विरोधी अभियानाला सुरुवात केली होती त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळेच चीन आशियातील एक महत्त्वाचा देश बनला आहे असं मानलं जातं.

कम्युनिस्ट पार्टीच्या नियमांचं उल्लंघन होत नाही, तोपर्यंत जिनपिंग यांना कुणीही आव्हान देऊ शकत नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)