पुढल्या वर्षी मंगळाच्या यानाची वारी : इलॉन मस्क यांचं नवीन उद्दिष्ट

टेस्ला मोटर्स आणि SpaceX चे जनक इलॉन मस्क Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टेस्ला मोटर्स आणि SpaceX चे जनक इलॉन मस्क यांना अर्ध जग वेडं मानतं तर अर्ध जग त्यांच्या स्वप्नांच्या मागे वेडं आहे. हे आता काय नवीन?

आपल्या अशक्यप्राय प्रकल्पांसाठी ओळखले जाणारे टेस्ला मोटर्स आणि SpaceX चे जनक इलॉन मस्क यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची डेडलाइन जगासमोर मांडली आहे - पुढच्या वर्षी मंगळाच्या यानांची उड्डाण चाचणी घेणार!

"मला वाटतं की 2018च्या पूर्वार्धात आम्ही मंगळासाठीच्या अंतराळयानांच्या छोट्या फ्लाइट्स आणि राउंड ट्रिप फ्लाइट्स सुरू करू," असं मस्क यांनी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं.

आपले प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही, हे आता त्यांनाही कळून चुकलं आहे. म्हणून याप्रसंगी त्यांनी आवर्जून हे सांगितलं - "माझी कामं कशी वेळेत पूर्ण होतात, याबद्दल तुम्हाला माहिती आहेच."

टेस्लाची मॉडेल 3 इलेक्ट्रिक कार अजूनही बऱ्याच ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि टेस्ला मोटर्स अजूनही आपल्या उत्पादनात मागे आहे. तसंच त्यांचे SpaceX मधले यापूर्वीचे प्रकल्पही काही न काही कारणाने वेळेत मार्गी लागले नव्हते.

पण मंगळावर वसाहतीचा एवढा आग्रह आणि ते इतक्या लवकर साध्य करण्याची चढाओढ का?

मस्क म्हणाले की, "येत्या काळात तिसरं महायुद्ध होणार आणि त्यात अणवस्त्रांचा वापर होणार. त्यात पृथ्वीवर सर्वनाश होणार. त्यापूर्वी माणसाने मंगळावर पोहोचणं आवश्यक आहे. वेळेपूर्वी मंगळावर वसाहत प्रस्थापित केली तर काही प्रजातींचं रक्षण करता येईल."

लोकांना अशक्य वाटतील अशा प्रकल्पांसाठी ओळखले जाणारे इलॉन मस्क नक्कीच जगातल्या मोठ्या तंत्रज्ञांच्या मांदियाळीत जाऊन बसले आहेत. पण त्यांचं यश सहज आलं नाही.

आधी त्यांच्या SpaceXचे काही रॉकेट्स अपयशी झाले, ज्यामुळे त्यांच्यावर जवळजवळ दिवाळखोरीची वेळ आली होती. पण गेल्या काही उड्डाणांमध्ये आलेलं यश आणि फेब्रुवारीमध्ये त्यांनी अंतराळात सोडलेलं 'फाल्कन हेव्ही' रॉकेट सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं. गंमत म्हणजे या रॉकेटमधून मस्क यांनी टेस्लाची सर्वांत नवीन स्पोर्ट्सकार टेस्ला रोडस्टर अंतराळात पाठवली होती.

मंगळावरचं जीवन कसं असेल?

आता त्यांचं ध्येय आहे मंगळावर मानवी वसाहतीची पायाभरणी करणं. मस्क यांनी तर तिथल्या जीवनाचं एक कल्पनाचित्रही या कार्यक्रमात लोकांसमोर मांडलं. ते म्हणाले, "मला वाटतं तिथे थेट लोकशाहीचं सरकार असेन. म्हणजे तिथली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विषयावर आपलं मत देऊ शकेल."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीचं सादरीकरण

मस्क यांच्या मते मंगळावर माणसाने आपलं नवं जग प्रस्थापित करणं खूप आवश्यक आहे. त्यानेच माणसाची पुढची पिढी तिसऱ्या महायुद्धानंतरही जगू शकेल. "तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही. याआधीही असंच वाटत होतं, पण ते युद्ध झालेच ना!"

पण मंगळावरची वस्ती फक्त मानवी अस्तित्व वाचवण्यासाठीच नाही. आपण कशी पिझ्झा सेंटर्सची व्यवस्था अगदी नव्याने आखू शकतो, याबद्दलही मस्क उत्साहीत आहेत.

'AI चा धोका अधिक मोठा'

आणि जेव्हा अख्ख्या जगाचं लक्ष अमेरिका आणि उत्तर कोरियामधल्या संभाव्य अणुयुद्धाकडे लागलं आहे, तेव्हा इलॉन मस्क म्हणतात, "यापुढचा मोठा धोका अणवस्त्र नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence किंवा AI) असणार आहे."

याआधीही मस्क यांनी हे वक्तव्य केलं होतं तेव्हा काही विश्लेषकांनी त्यांचं म्हणणं खोडून "मस्क यांनी कुठल्याही विषयावर वाद करण्याऐवजी त्याचा अभ्यास करावा", असा सल्ला दिला होता.

"मी सहसा कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण आणण्याच्या, त्याचं नियमन करण्याच्या फार काही पक्षात नसतो. पण AI चा धोका इतका मोठा आहे की यावर लगेच एक समिती स्थापन व्हावी जेणेकरून सर्वांची माहिती सुरक्षित असेन. हे खूप महत्त्वाचं आहे."

"आपण कुणालाही असं मनमर्जीने अण्वस्त्रांची निर्मिती करू देत नाही ना? तशीच ही AI ची समस्या आहे. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था लगेच नेमणं आवश्यक आहे," असं ते म्हणाले.

अर्ध जग मस्क यांना वेडं मानतं तर अर्ध जग त्यांच्या स्वप्नांच्या मागे वेडं आहे. पण आता मस्क मंगळावर घराची स्वप्नं पाहत आहेत. त्यांच्या या स्वप्नांच्या जगाविषयी तुम्हाला काय वाटतं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)