अमेरिकेबरोबर चर्चेसाठी उत्तर कोरियाकडून प्रतिसाद नाही

किम जोंग उन Image copyright KCNA

दक्षिण कोरियाकडून अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान होणाऱ्या नियोजित चर्चेसंदर्भातली महत्त्वाची माहिती सोमवारी पुढे आली. किम जाँग उन आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या बैठकीसंदर्भात उत्तर कोरियाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे.

शुक्रवारी झालेल्या धक्कादायक घडामोडीत ट्रंप यांनी उत्तर कोरियाचं चर्चेसाठीचं आमंत्रण स्वीकारलं होतं.

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी किम हे आण्विक शस्त्र मागे घेणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नव्हती.

नियोजित बैठकीची चर्चा सध्या तरी अधांतरी आहे. बैठकीची जागा आणि मुद्द्यांवर कोणतीही सहमती झालेली नाही, असं आज दक्षिण कोरियाकडून उघड करण्यात आलं.

मुद्द्याची गुंतागुंत बघता फक्त चर्चेनं या प्रश्नाचा तोडगा निघेल का असा प्रश्न विश्लेषकांना पडला आहे.

"आम्हाला उत्तर कोरियाच्या प्रशासनाकडून अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान होणाऱ्या या चर्चेसंदर्भात अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही," असं दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

"मला वाटतं या प्रकरणात ते सावधगिरीनं पावलं टाकत आहेत आणि त्यांची भूमिका निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ घेत आहेत", असंही ते म्हणाले.

ट्रंप यांच्याशी दक्षिण कोरियाच्या ज्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला ते आता चीन आणि जपानच्या मार्गावर आहेत. तिथल्या नेत्यांना या घडामोडींची ते माहिती देतील.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाई इन यांचे मुख्य सुरक्षा सल्लागार चुंग- युई-योंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. त्याचवेळी गुप्तचर विभागाचे मुख्य सूह उन जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेण्यासाठी टोकियोला जाणार आहे.

अभूतपूर्व पाऊल

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वर्षानुवर्षं असलेल्या तणावानंतर चर्चेचा हा आश्चर्यकारक प्रस्ताव समोर आला आहे. या सगळ्या घडामोडींआधी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांना भिडण्याची शक्यताही जागतिक पातळीवर व्यक्त केली जात होती.

उत्तर कोरियानं गेल्या काही वर्षांत अनेक अण्वस्त्र चाचण्या केल्या आहेत आणि दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रं तयार केली आहेत. अमेरिकेच्या भूमीवर ते अण्वस्त्र हल्ला करू शकतात, असंही त्यांचं म्हणणं आहे.

या दोन देशांमधील संवाद म्हणजे एक अभूतपूर्व घटना असेल. कारण आतापर्यंत अमेरिकेच्या कोणत्याच राष्ट्राध्यक्षानं उत्तर कोरियाच्या नेत्याची भेट घेतलेली नाही.

पण तरीही भेटीचे अधिक तपशील सध्या उपलब्ध नाही.

वॉशिंग्टनकडून हा प्रस्ताव कसा स्वीकारला जातोय याच्या प्रतिक्रियेची प्याँगयांगला कदाचित वाट बघायची असेल, असं CSIS (सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज) चे संशोधक अँड्रे अब्राहमियन यांनी सांगितलं.

निर्बंध शिथिल

जर ही चर्चा पुढे गेली तर ट्रंप यांना उत्तर कोरियाच्या नेत्यांची मे महिन्याच्या शेवटी भेट घेण्याची शक्यता आहे. त्याच वेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून आणि किम यांच्यात वेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्याँगयांग आपली अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा खरंच सोडून देणार की गेल्या अनेक वर्षांपासून लादले गेलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध शिथिल व्हावे आणि आपली प्रतिमा उजळ व्हावी यासाठीचा हा केवळ प्रयत्न आहे याबाबत विश्लेषकांमध्ये मतभेद आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्याँग योंग हे शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा धमकी देण्यात आघाडीवर आहे.

अब्राहमियन म्हणाले, "बंधनातून सुटका मिळवणं त्यांचं अल्पकालीन उद्दिष्ट आहे.".

अनेक तज्ज्ञांना असं वाटतं की, किम जाँग उन या चर्चेचा वापर प्रचारासाठी करतील. "पण त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. कारण, उत्तर कोरियाच्या राजकीय व्यवस्थेला, मानवी हक्कांच्या अहवालाला किंवा शस्त्रास्त्र कार्यक्रमांना ट्रंप यांचा पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होत नाही." ते पुढे म्हणाले.

CIA चे संचालक माईक पोम्पिओ यांनी ट्रंप यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. ट्रंप किम यांच्याशी बोलण्याचा धोका ओळखून आहे. उत्तर कोरियाशी बोलताना असणाऱ्या आव्हानाची त्यांना जाणीव असून त्यांनी आपले डोळे उघडे ठेवले आहे असंही ते म्हणाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी झालेल्या एका सभेत समर्थकांना सांगितलं की उत्तर कोरियाला शांतता हवी आहे पण अण्वस्त्र शस्त्रसंधीवर काही प्रगती न झाल्यास बोलणी अर्धवट सोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ट्रंप यांनी हा निर्णय प्रशासनातल्या उच्चाधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करताच घेतला. सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय स्वत: घेतला असल्याचं वार्ताहरांना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)