ब्रिटनमधल्या माजी गुप्तहेरावरील हल्ल्यात रशियाचा हात - थेरेसा मे

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे

रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीवर झालेल्या विषप्रयोगाच्या प्रकरणात रशियाचा हात असल्याचा खुलासा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केला आहे. त्यांनी ब्रिटनच्या संसदेत सांगितल्याप्रमाणे या हल्ल्यात वापरण्यात आलेला विषारी पदार्थ हा मानवी मज्जासंस्थेवर परिणाम करणारा 'नर्व्ह एजंट' असून त्याचा वापर रशियाच्या सैन्याकडून नियमित केला जातो.

साल्सबरीमध्ये झालेल्या या हल्ल्यामागे रशियाचा हात असण्याची शक्यता अधिक असल्याच्या निष्कर्षाप्रत सरकार पोहोचल्याचं मे यांचं म्हणणं आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणी रशियन राजदूतांकडे खुलासा मागितला आहे.

मंगळवारपर्यंत याप्रकरणी रशियाकडून ठोस प्रतिक्रिया मिळाली नाही तर, ब्रिटन रशियानं आपल्या शक्तीचा गैरवापर केल्याचं मानेल असंही मे यांनी स्पष्ट केलं.

नर्व्ह एजंट

पंतप्रधान मे यांनी ज्या रसायनाचा विष म्हणून वापर केला आहे ते एक प्रकराचं 'नर्व्ह एजंट' आहे असं पुढे सांगितलं. या नर्व्ह एजंटमुळे मानवी मज्जासंस्था आणि स्नायूंवर परिणाम होतो. याप्रकरणी वापरण्यात आलेलं नर्व्ह एजंट हे 'नोविचोक' नावानं ओळखलं जातं.

"हा प्रकार म्हणजे रशियानं आमच्या देशावर केलेला थेट हल्ला आहे किंवा रशियन सरकारनं नर्व्ह एजंटवरचं आपलं नियंत्रण गमावलं आहे. तसंच रशियानं हे दुसऱ्या लोकांच्या हाती दिल्याची परवानगी दिल्याचंही दिसत आहे," असंही मे यांनी सांगितलं.

Image copyright MOSCOW DISTRICT MILITARY COURT/TASS

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉनसन यांनी रशियन राजदूतांना नोविचोक कार्यक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती रासायनिक शस्त्र निषेध संघटनेला देण्यास सांगितलं आहे. तसंच या प्रकरणानंतर अधिक व्यापक उपाययोजना करण्याची तयारी ब्रिटन करणार असल्याचंही मे यांनी स्पष्ट केलं.

६६ वर्षीय माजी सैन्य अधिकारी स्क्रिपल आणि त्यांची ३३ वर्षीय मुलगी साल्सबरी सिटी सेंटरमध्ये एका बेंचवर बेशुद्धावस्थेत आढळलं होते. अजूनही त्यांची परिस्थिती गंभीर आहे.

काय आहे नोविचोक?

नोविचोकचा रशियन भाषेतला अर्थ 'नव-आगुंतक' असा आहे. १९७० ते १९८० या काळात सोव्हिएत रशियानं गुप्तपणे या नर्व्ह एजंटची निर्मिती केली होती. यात वापर करण्यात आलेलं एक रसायन ए-२३० हे वीएक्स या नर्व्ह एजंटपेक्षा पाच ते आठपट विषारी आहे. याचा वापर करून एखाद्याला काही मिनिटांत मारता येऊ शकतं.

या रसायनाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यातल्या एका प्रकाराला रशियन सैन्यानं कथित रासायनिक हत्यार म्हणून वापरण्यास मान्यता दिली आहे. हे नर्व्ह एजंट द्रव, वायू किंवा स्थायू रुपात असतात.

काही नर्व्ह एजंट हे धोकादायक असतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया केली गेली तर, त्यातून गंभीर परिणाम करणारे विषारी पदार्थ निर्माण होतात.

'मे यांचं मत म्हणजे परिकथा'

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या आरोपांनंतर रशियन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी त्यांची बाजू मांडली आहे. मे यांचं हे मत व्यक्त करणं म्हणजे, ब्रिटनच्या संसदेतला सर्कसच्या कार्यक्रमासारखं आहे. आम्हाला उकसवण्यासाठीचं हे एक राजकीय अभियान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Image copyright PA

मे यांनी कथन केलेली ही एक परिकथा असल्याचं रशियाच्या परराष्ट्र सचिवांचं मत आहे. परंतु, युरोपीयन महासंघ आणि अमेरिकेनं ब्रिटनची बाजू उचलून धरली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं कार्यालय व्हाईट हाऊसनं सुद्धा या हल्ल्याची निंदा केली आहे. तर, युरोपीय संघाचे उपाध्यक्ष फ्रांस टिमरमॅन्स यांनी या प्रकरणी ब्रिटनबरोबर असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)