काठमांडू विमान अपघात : 'विमान हेलकावे घेत खाली आलं अन् दणकन आपटलं'

काठमांडू विमान अपघात Image copyright AFP

विमान कोसळायच्या अगोदर ते हवेत हेलकावे घेत होतं. मग जोरात हादरलं आणि जमिनीवर आदळलं, असं काठमांडू विमान अपघातातून बचावलेले बसंत बोहरा यांनी यांनी या भीषण अपघाताचं वर्णन केलं आहे.

सोमवारी झालेल्या या अपघातात 49 प्रवासी मृत्युमुखी पडले. बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालेलं यूएस बांग्ला एअरलाईन्सच्या या विमानात 71 जण होते. काठमांडूच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला.

अपघातानंतर विमानाची काच तोडून बाहेर निघालेले बसंत बोहरा यांनी विमान कोसळताना आडवं-तिडवं फिरत होतं असं सांगितलं.

विमान कोसळायच्या अगोदर ते जोरानं हादरले आणि जमिनीवर आदळलं. प्रवाशी घाबरून ओरडू लागले होते, असं या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं. अपघाताचं कारण मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही.

नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांतील ही एक दुर्दैवी विमान दुर्घटना आहे. हिमालयाच्या कुशीतल्या या देशाला विमान अपघाताचा मोठा इतिहासच आहे. 1940 साली नेपाळमध्ये पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून या ठिकाणी 70 विमान अपघात झाले आहेत.

या मधील बहुतेक अपघात हे खराब हवामान, कमी अनुभवी वैमानिक आणि विमानाची अपुरी देखभाल या कारणांमुळं झाले आहेत.

काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर कोसळेलं विमान हे 17 वर्षं जुने होते. 'बंबार्डिएर डॅश-8 Q400 टर्बोप्रॉप' हे विमान बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालं होते. ते US-Bangla या बांग्लादेशी विमान कंपनीचं होतं.

"एकाएकी विमान जोरानं हेलकावे घेऊ लागलं आणि मोठा आवाज झाला," असं या अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बीबीसीशी बोलताना सांगितलं. "मी खिडकीशेजारी बसलो होतो म्हणून काच तोडून बाहेर निघालो," असं ते पुढे म्हणाले.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा विमान अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

"विमान वरती खाली, उजवीकडे, डावीकडे फिरत होतं. पहिल्यांदा ते खाली उतरण्याची वाट पाहत आहे, असं वाटलं," असं यातून वाचलेल्या 22 वर्षीय सनम शाक्या यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं. विमान एकाएकी खाली आल्यावरच हा अपघात असल्याचं मला समजलं, असं त्या पुढं म्हणाल्या.

श्रद्धा गिरी या आपल्या मुलीबरोबर अपघाताच्या वेळीच दुसऱ्या एका विमानात चढत होत्या. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता, सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी ताबडतोब धाव घेतली. माझ्या मुलीसोबत अशी दृश्यं पाहताना मला धक्का बसला होता. डोळ्यासमोर हे सगळं घडल्यामुळं सगळेच हादरून गेले होते."

घटनास्थळी पोहोचलेले फोटो जर्नालिस्ट सरोज बासनेत सांगतात, "अपघातानंतर 15 मिनिटांत मी घटनास्थळी पोहोचले. विमान जळत होतं आणि आतमधील प्रवाशी अक्षरश: रडत, ओरडत होते."

मृत आणि जखमींचे नातेवाईक मंगळवारी नेपाळमध्ये पोहचतील अशी माहिती त्रिभूवन विमानतळाचे जनरल मॅनेजर, राज कुमार छेत्री यांनी दिली. अपघातातून वाचलेल्यांपैकी 11 नेपाळी आणि 11 बांग्लादेशी नागरिक आहेत.

Image copyright BISHNU SAPKOTA

अजूनपर्यंत अपघाताचं कारण स्पष्ट झालं नाही. विमान कंपनीनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दोष दिला आहे. तर, विमान चुकीच्या दिशेनं उतरत होतं, असं विमानतळ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अपघाताच्या काही क्षण अगोदर पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात गैरसमज झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यांच्या दरम्यानचं संभाषण यूट्यूबूवर जाहीर झालं आहे. धावपट्टीच्या कोणत्या बाजूने विमान उतरावं याबाबत हा गैरसमज होता.

धोकादायक विमानतळ

बांग्लादेशमधील माजी एअर फोर्स अधिकारी इक्बाल हुसेन यांनी काठमांडू विमानतळावर विमान उतरवण्यातील अडचणी बीबीसीशी बोलताना सांगितल्या.

त्याच्या मते, "धावपट्टी संपली की लगेच पर्वत सुरू होतो. विमान उतरवताना बऱ्याच उंचीवर थेट खाली यावं लागत असल्यानं दक्षता घ्यावी लागते आणि उड्डाणाच्या वेळीदेखील चहूबाजूनं पर्वतीय प्रदेश असल्यानं लगेच वरती चढवावे लागते."

ते पुढे म्हणाले, "धावपट्टीच्या डावीकडे सपाट जमीन आहे, पण उजवीकडे मोठी दरी आहे. म्हणजे विमान धावपट्टी सोडून धावू लागलं की ते सरळ त्या दरीमध्ये पडू शकतं. जगातील 10 सर्वांत धोकादायक विमानतळात याचा समावेश होतो."

या अगोदर 1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाइन्सचं विमान या विमानतळावर कोसळलं होतं. यामध्ये 167 प्रवाशी मृत्युमुखी पडले होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)